अभय टिळक

अभय टिळक agtilak@gmail.com

‘‘बुद्धाने एकदा म्हटले आहे की बुद्ध धर्म हा शुद्ध धर्म आहे. येथे भेदभाव नाही. श्रमण, भिक्षु, ब्राह्मण, भंगी मग तो कोणीही असो, सारे एक आहेत. माझ्या संघात येण्यापूर्वी नदी, नाला, मग नाव कोणतेही असो, यमुना असो, ब्रह्मपुत्रा असो, गंगा, गोदावरी कोणतीही नदी असो, या सर्व नद्या आपल्या प्रांतातून सागरात गेल्या, त्यांचं पाणी एक झालं की हे पाणी मग सांगता येणार नाही की हे यमुनेचं की हे गंगेचं, की हे गोदावरीचं! तेव्हा माझा संघ हा महासागरासारखा आहे. जातपात नाही…’’  हे उद्गार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. इथे स्पष्ट निर्देश आहे तो भगवान बुद्धांनी उत्कटतेने पुकारा केलेल्या समतेच्या प्राणतत्त्वाचा.

    काळाच्या एका टप्प्यावर नाथ, बौद्ध आणि जैन या तीन परंपरांमध्ये सघन आदानप्रदान झाल्याचे अनुमान बांधण्यास पुरेसा अवकाश गवसतो. नाथयोग्यांच्या अष्टांगयोगामधील ‘यम’ या पहिल्याच योगांगापैकी अहिंसा, अस्तेय आणि अपरिग्रह या तीन अंगांचा धागा घट्टपणे विणलेला आहे जैन आणि बौद्ध तत्त्वदर्शनांशी. तर, समतेच्या पुरस्कारासंदर्भात नाथ आणि बौद्ध या दोहोंत नांदते सघन एकवाक्यता. त्याच वेळी, समता हे तर भागवत धर्माने शिरोधार्य मानलेल्या पायाभूत मूल्यांपैकी एक. समाजव्यवस्थेत भागवत धर्माला अभिप्रेत आहे संगोपन-संवर्धन साधुत्वाचे. नितळ साधुत्व हे गंगाजलाप्रमाणे निर्मळ आणि सर्वसमावेशक असते, असा आहे दाखला नाथरायांचा. साधुत्वाची एकंदर ३० लक्षणे भगवान श्रीकृष्ण स्वमुखाने उद्धवांना कथन करतात असा एक गोड व मनोज्ञ प्रसंग ‘एकनाथी भागवता’च्या ११व्या अध्यायात चितारलेला आहे नाथांनी. उजवीकडून येत एखादी विख्यात महानदी आणि डावीकडून येत गावातील लहानसा ओहोळ, समजा, गंगेला मिळाले तर त्या दोघांच्याही गुणदोषांचा विचार न करता गंगा त्यांना आपल्या प्रवाहात सामावून घेत पुनीत करते. अगदी तशीच लौकिक जीवनरहाटी असते समत्व अंगी पुरेपूर मुरलेल्या विभूतीची, हे वास्तव तेथ पवित्र अपवित्रता । बोलूंचि न ये सर्वथा । गोडकडूपणांची वार्ता । निजांगें समता करी गंगा या दाखल्याद्वारे विशद करतात नाथराय तिथे कृष्णमुखातून. ‘साधू असणे’ आणि व्यक्तिमत्वात ‘साधुत्व नांदणे’ या दोहोंत गुणात्मक फरक प्रचंड आहे. साधुत्वाचा धागा जुळलेला असतो समतेशी, हे चिरंतन तत्त्व तैसें सुखदु:खांचें भान । साधूंसी समत्वें समान । सदा निजबोधें संपन्न । हें अगाध लक्षण संतांचें अशा अनुभूतीपूर्ण शब्दकळेद्वारे विदित करतात नाथराय. बाह््य आकार कसाही व कोणताही असला तरी, विश्वामधील प्रत्येक अस्तित्वाद्वारे चैतन्याचेच आविष्करण घडत असते हे वर्म अचूक आकळणे हे प्रज्ञावंतांचे केंद्रवर्ती लक्षण होय, असे ज्ञानदेवांचे नि:संदिग्ध प्रतिपादन आहे ‘ज्ञानेश्वरी’च्या १८व्या अध्यायात. तेंवी विविध अवस्था । पातलिया जिणौनि पार्था । प्रज्ञा फळतया अर्था । वेझ देणें ही ज्ञानदेवांची ओवी म्हणजे त्याच सिद्धान्ताचे शब्दांकन. ‘केंद्र’, ‘लक्ष्य’, ‘वर्म’ या अर्थच्छटा लाभलेल्या आहेत ‘वेझ’ या शब्दाला. समता आणि प्रज्ञा यांचे नाते उभयदिश आहे. बुद्धीला समत्व लगडले की तिचे रूपांतर घडून येते प्रज्ञेमध्ये. तर, प्रज्ञा फलद्रुप झाली की व्यवहारात प्रगटते समता. कृत्रिम बुद्धिमत्तेचा पायरव गाजणाऱ्या विद्यमान युगातही प्रज्ञेचे महत्व स्वयंसिद्ध शाबीत होते ते असे.