चारित्र्य

शब्दविद्या असते सिद्धान्तनस्वरूप तर, प्रज्ञेचा अनुबंध असतो सिद्धान्तनांच्या व्यावहारिक उपयोजनाशी.

– अभय टिळक agtilak@gmail.com

चातुर्वण्र्य ही केवळ व्यवस्था नव्हे तर ती मुळात आहे चिवट आणि बलिष्ठ वृत्ती. अधिकारभेदाधिष्ठित उतरंडप्रधान मानसिकता आणि जीवनदृष्टी यांची ती होय कूस. अगदी संशोधनासारख्या ज्ञानक्षेत्रातदेखील विशिष्ट प्रकारचे चातुर्वण्र्य अनुभवास येते ते त्यामुळेच. निखळ सैद्धान्तिक संशोधनाला वाहून घेतलेले अभ्यासक स्वत:ला समजतात श्रेष्ठवर्ण दशग्रंथी ब्राह्मण. तर, उपयोजित संशोधनामध्ये रस असणाऱ्यांना गणले जाते कनिष्ठतम शूद्र. सिद्धान्त आणि व्यवहारातील त्याचे उपयोजन यांच्यादरम्यान नांदणाऱ्या निसर्गसिद्ध जैविक अनुबंधाबाबतची पूर्ण अनभिज्ञता प्रदर्शित होते अशा रोगट मनोवृत्तीद्वारे. शांभवाद्वयासारखे ऐहिक जीवनसन्मुख तत्त्वसिद्धान्तन गीताटीकेच्या माध्यमातून प्रस्फुटित करण्यामागे ज्ञानदेवांची प्रेरणा आहे सम्यक आणि एकात्म. अद्वयदर्शनाचे सैद्धान्तिक आकलन पायाशुद्ध बनलेल्या प्रत्येक व्यक्तीने चारित्र्यसंपन्न ऐहिक जीवन जगण्यास प्रवृत्त व्हावे आणि त्यायोगे, क्रमाक्रमाने उभे समाजजीवनच निकोप निरामय बनावे, ही होय अद्वयबोधामागील आद्य ऊर्मी. म्हणजेच, अद्वयबोधाच्या व्यावहारिक उपयोजनाद्वारे चारित्र्यसंपन्न समाजपुरुष निर्माण व्हावा, हा ठरतो ज्ञानदेवादी संतांच्या मांदियाळीने मांडलेल्या खटाटोपामागील पायाभूत उद्देश. ज्ञानसिद्धान्तांच्या अध्ययन-अध्यापनाद्वारे सुचरित, शीलसंपन्न, कर्मोपासक समाज उत्क्रांत होण्यात शब्दब्रह्माच्या उपासनेची परिपूर्ती दडलेली आहे, हे वर्म अचूक उमगलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे महापुरुष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. ‘‘विद्या, प्रज्ञा, करुणा, शील व मैत्री या पंचतत्त्वांनुसार मिलिंद महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांने आपले चारित्र्य बनविले पाहिजे आणि या मार्गाने एकटय़ानेच जावे लागले तरी मनोधैर्य व निष्ठा राखून गेले पाहिजे.’’ हे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात १२ डिसेंबर १९५५ रोजी आयोजित व्याख्यानामध्ये त्यांनी काढलेले उद्गार या संदर्भात मर्मग्राही ठरतात. बारकाईने विचार केल्यास विद्या, प्रज्ञा, करुणा, शील आणि मैत्री या पंचतत्त्वांमध्ये भागवत, बौद्ध आणि जैन या तीन धर्मविचारतत्त्वांचा संगम असल्याचे ध्यानात येईल. जैन आणि बौद्ध या दोन तत्त्वधारांचे प्रवाह भागवत धर्मविचाराशी जोडले जातात ते नाथ संप्रदायाच्या माध्यमातून. ज्ञानाइतके या विश्वात पवित्र अन्य काहीच नाही, असा उद्घोष भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये करतात. तर, अन्नाइतकीच विद्येचीही जरुरी सर्वाना आहे, या भूमिकेचा अंगीकार-प्रसार भगवान बुद्धांनी प्रथम पुरस्कारिला, असे बाबासाहेबांचे प्रतिपादन आहे. परंतु, केवळ विद्येने भागणारे नाही तर, ज्ञानाला जोड हवी प्रज्ञेची हे भगवान बुद्धांचे कथन मार्मिक ठरते ते अर्जित शब्दज्ञानाच्या व्यावहारिक उपयोजनासंदर्भात. विद्या आणि प्रज्ञा यांच्या परस्परनात्याचा प्रगल्भ उलगडा करून देतात ज्ञानदेव. शब्दविद्या असते सिद्धान्तनस्वरूप तर, प्रज्ञेचा अनुबंध असतो सिद्धान्तनांच्या व्यावहारिक उपयोजनाशी. त्यासाठी गरज असते समताधिष्ठित सर्वसमावेशक जीवनदृष्टीची. ऐसा हरिखशोकरहितु। जो आत्मबोधभरितु। तो जाण पां प्रज्ञायुक्तु। धनुर्धरा हे ज्ञानदेवांचे कथन उद्बोधक शाबीत होते इथे. समत्वयुक्त बुद्धी म्हणजे प्रज्ञा, हेच सुचवायचे आहे ज्ञानदेवांना. तर, अशा प्रज्ञावंतांच्या  अध्ययन-अध्यापन व्यवहाराद्वारेच शील, करुणा आणि मैत्री ही मूल्यत्रयी जोपासणारा सुचरित सुशिक्षित समाज निर्माण होणे शक्य बनते, ही बाबासाहेबांची दृढधारणा. ज्ञानदेव आणि बाबासाहेबांचे वैचारिक नाते हे असे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak character lord krishna in gita zws

Next Story
विचरे विश्व होऊनि। विश्वाचि माजीं..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी