– अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘एक होता राजा. मोठा न्यायी व कर्तबगार असा. एके दिवशी अवचितच राज्याच्या पुढय़ात बिकट पेच उभा राहिला. राजा विचारात पडला. त्याला काही मार्ग सुचेना. त्याने लगोलग सांगावा धाडला त्याच्या मंत्र्याला. राजाचा मुख्य प्रधानमंत्री होता विलक्षण चाणाक्ष, चतुर आणि तितकाच हिकमती..’’, अशी अथवा अशा आशयाची सुरुवात असणाऱ्या गोष्टी ऐकतच आपण सगळे जण मोठे झालो. कोणत्याही राज्याचे अथवा देशाचे भवितव्य त्या प्रदेशाची मंत्रणा ज्यांच्या हातात असते ते राजाचे मंत्रिगण कितपत कर्तव्यनिष्ठ आणि प्रजाहितदक्ष असतात त्यावरच निर्भर राहते. देहपुरीचे राज्य हाकणारा ‘मन’नामक राजा कृपाळू असल्यामुळेच माझ्या जगण्याची लय आणि जीवनप्रवासाची दिशा बिघडली नाही, असे तुकोबारायांचे धाकटे बंधू कान्होबाराय जेव्हा म्हणतात तेव्हा या ‘मन’राजाचा मंत्री विलक्षण न्यायी, सुबुद्ध आणि सुचरित असला पाहिजे असा कयास सहजच बांधता येतो. मनु राजा एक देहपुरी। असे नांदतु त्यासि दोघी नारी। पुत्र पौत्र संपन्न भारी। तेणें कृपा केली आम्हांवरी गा अशा शब्दांत महिमा गातात कान्होबाराय त्या कृपावंत ‘मन’राजाचा आणि त्याच्या कृपादृष्टीपायी पदरी पडलेल्या अनेकविध लाभांचा. ‘मन’राजाचा तसा मंत्री तो कोण असेल, ही जिज्ञासा मनामध्ये दाटणे मग स्वाभाविकच ठरते. ती जिज्ञासापूर्ती करतात बहेणाबाई. बहेणि म्हणे मंत्री विवेकासारिखा। जोडिला हा निका निश्चयाचा हे बहेणाबाईंचे उद्गार कमालीचे सूचक व तितकेच मार्मिक होत या संदर्भात. मंत्री समतोल बुद्धीचा व नि:स्पृह असेल तरच राज्याची मंत्रणा लोकाभिमुख राहणे शक्य बनते. ‘मंत्र’ या शब्दाला ‘गुप्त सल्ला’, ‘मसलत’, ‘युक्ती’, ‘विचार’ असे नाना अर्थ आहेत. त्या शब्दापासूनच उद्भवलेल्या ‘मंत्रणा’ या शब्दाचा अर्थ होय ‘राज्यकारभार’. राज्य व्यवस्थित चालावयाचे असेल तर लोकव्यवहाराचा पोत नासविणाऱ्या अनिष्ट वृत्ती-प्रवृत्तींचा बीमोड ठामपणे करावाच लागतो मंत्रणा पेलणाऱ्या मंत्र्यांना. राज्यातील सुव्यवस्थेला मारक ठरणाऱ्या घटकांना व त्यांच्या मनसुब्यांना राजसत्तेचे पाठबळ असेल तर सगळे लोकजीवनच उद्ध्वस्त बनते. त्याच न्यायाने, देहपुरीचे घटकावयव बेबंदपणे वागायला लागले तर बळाने वठणीवर आणावे लागते बाह्य़ेन्द्रियांना. पारमार्थिक परिभाषेत यालाच संज्ञा आहे ‘दम’ अशी. विवेकासारखा मंत्री लाभला तर इंद्रियांचे दमन बनते सुकर, असा आपला रोकडा स्वानुभव दमुनी इंद्रिये आणिला विवेक। दाखविल सुख आत्मयाचे अशा निरपवाद शब्दांत विशद करतात बहेणाबाई. सारासारविवेकामुळेच इंद्रियांना नियमबद्ध करता येते, हे रहस्य इथे विवरून सांगतात बहेणाबाई. विवेकरूपी मंत्री कार्यक्षम आणि कर्तव्यतत्पर असेल तर बहिर्मुख बनून बेबंदपणे वागणाऱ्या देहेन्द्रियांना जेरबंद करून अंतर्मुख बनवता येते, असा नि:संदिग्ध दाखला धरूनी आणीन करीन ध्यानस्थ। होईल तो अस्त इंद्रियांचा इतक्या नितळ शैलीमध्ये देतात बहेणाबाई. राजा प्रसंगी मनमानीसही प्रवृत्त होणे असंभव नसते. अशा वेळी, राज्याच्या हिताहिताची सर्वोच्च काळजी वाहावी लागते प्रधानांनाच. परमार्थाच्या प्रांतातही, म्हणूनच, सर्वाधिक महत्त्व बहेणाबाई बहाल करतात ते विवेकरूपी मंत्र्याच्या कार्यकुशलतेलाच. मनरूपी राजावर अंकुश चालू शकतो विवेकरूपी मनाचाच. बहेणि म्हणे मना विवेक हा खरा । तुझिया व्यापारा कोण पुसे हे त्यांचे या संदर्भातील उद्गार पुरेसे बोलके नाहीत का!

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak compassion happiness zws
First published on: 10-11-2021 at 02:02 IST