अभय टिळक agtilak@gmail.com

वेणीचे तीन पदर परस्परांत गुंफल्याप्रमाणे गंगा, यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर वसलेल्या प्रयागतीर्थाचा महिमा उदंड असाच आहे. त्रिवेणी संगमात स्नान घडल्याने मोक्षप्राप्ती होते, ही धारणाही अतिशय पुरातन अशीच आहे. परंतु, गंगा-यमुना-सरस्वती यांच्या संगमात डुबकी मारल्याने लगोलग मोक्ष मुठीत येतो, असे समजण्याचा भाबडेपणा करू नका, असा सावधगिरीचा सल्लावजा उपदेश ज्ञानदेव करतात त्यांच्या ‘हरिपाठा’त. त्रिवेणी संगमीं नाना तिर्थे भ्रमी। चित्त नाहीं ‘नामीं’ तरि तें व्यर्थ, हा त्यांचा इशारा गंभीरपणे घ्यायचा तो त्याचसाठी. त्रिवेणी संगमात अंग घुसळत असताना मुखात नामाचा उच्चार नसेल तर सगळेच व्यर्थ, असे बजावत ज्ञानदेव आपल्या मनीमानसी माहात्म्य बिंबवतात ते नामसंकीर्तनाचे. नामोच्चरणाखेरीज केलेले तीर्थाटन निर्रथकच होय, असे सांगत एका परीने, नामसंकीर्तन हेच सर्वश्रेष्ठ असे मोक्षदायक तीर्थ होय, असेही मोठय़ा खुबीने सूचित करतात ज्ञानदेव. तर, कथा त्रिवेणी संगम। देव भक्त आणि नाम। तेथींचें उत्तम। चरणरज नंदितां, अशा थेट शैलीत आमचे तुकोबाराय निरुपवाद धाटणीत स्पष्ट करतात ज्ञानदेवांचे सूचक कथन. तुकोबांनी योजलेले हे रूपक आहे मोठे अन्वर्थक. प्रयागातील त्रिवेणी संगमात गंगा आणि यमुना आहेत प्रगट तर सरस्वती तिथे विद्यमान आहे अप्रगट स्थितीत. अगदी त्याच धर्तीवर, हरिकथेमध्ये भगवंताचे नाम आणि नामधारक भक्त असतात प्रगट तर परमात्मा असतो अप्रगट अशी साक्ष आहे तुकोबांची. कीर्तनादरम्यान परतत्त्व अप्रगट असले तरी तिथे ते अनुपस्थित मात्र नसते, असा नि:संदिग्ध निर्वाळा श्रीकृष्णमुखातून ज्ञानदेव आपल्याला देतात ‘ज्ञानदेवी’च्या नवव्या अध्यायात.

परी तयांपाशीं पांडवा। मी हारपला गिंवसावा। जेथ नामघोषु बरवा। करिती ते माझे, ही श्रीकृष्णोक्ती स्वच्छ सूचन करते त्याच वास्तवाचे. कीर्तनामध्ये अव्यक्तपणे विराजमान आपल्या अनुभूतीस का येत नाही, असा प्रश्न मग अगदी स्वाभाविकपणेच कोणाच्याही मनात उद्भवावा. ‘मन आणि पर्यायाने दृष्टी निर्मळ नसल्यामुळे हरिकथेत रंगलेल्या परतत्त्वाची अनुभूती आपल्याला येत नसते’ हे आहे संतांचे त्या प्रश्नाला सरळ आणि थेट उत्तर!

कीर्तनभक्तीचे अवघे मर्म आणि वर्म पुरते एकवटलेले आहे ते इथेच. श्रोत्यांच्या ठायी नसणारे सर्व प्रकारचे मालिन्य कथा प्रथम दूर करते आणि अंतर्बाह्य़ विमल बनलेल्या साधकांना अप्रगट अवस्थेत तिथे भजनानंदात रंगलेल्या श्रीरंगाची अनुभूती येते, असा कार्यकारणभाव तुकोबा आपल्या पुढय़ात उलगडून मांडतात. जळती दोषांचे डोंगर। शुद्ध होती नारी नर। गाती ऐकती सादर। जे पवित्र हरिकथा, हे तुकोबांचे अनुभूतीपूर्ण कथन मननीय ठरते या संदर्भात. भौतिकातील त्रिवेणीत सचैल स्नान केल्याने काया निर्मळ बनते तर कथारूप  त्रिवेणी संगमात सुस्नात होण्याने अंतर्मळाचे पुरते क्षालन होते, असा दाखला आहे पैठणवासी नाथांचा. करिंता कीर्तन श्रवण। अंतर्मळाचें होत क्षालन, असा निर्वाळाच देतात ते! चित्तशुद्धी हे कीर्तनाचे तर परतत्त्वाशी ऐक्य हे कीर्तनभक्तीचे अंतिम असे सर्वोच्च फळ. तुका म्हणे उरला देव। गेला भेद त्या काळे, अशी होते मग त्या मुमुक्षू उपासकाची अवस्था. देवत्वाची ती प्रचीती मग एकदेशी उरत नाही. नवलावो तयाचा भावो। सर्वा ठाईं देखे देवो, अशी होते का आपली स्थिती कीर्तनश्रवणाने?