देव-भक्त

तुका म्हणे नाहीं भिन्न अशा शब्दांत तुकोबाराय अधोरेखित करतात त्याच भूमिकेशी असलेले त्यांचे अनुभूतीपूर्ण सुसंवादित्व.

अभय टिळक agtilak@gmail.com

भगवंताची भक्तवत्सलता गायन करणाऱ्या आपल्या एका अभंगाच्या पहिल्याच चरणात तुकोबारायांनी विलक्षण वेल्हाळपणे वर्णन केलेला आहे नामदेवरायांचा पारमार्थिक अधिकार. वरकरणी पाहता, आजच्या काही कडव्या बुद्धिजीवींना त्या कथांमध्ये भाबडेपणाची लयलूट भासेलही कदाचित. मात्र, अद्वयबोधाच्या चौकटीमध्ये ती कथानके समजावून घेण्याचा प्रयत्न केला तर दिशाभूल होण्याची शक्यता मावळून जावी. फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला अशा शब्दांत तुकोबारायांनी गुंफलेले आहेत नामदेवरायांच्या जीवनचरित्रातील दोन प्रसंग. उभय प्रसंग चांगल्यापैकी ज्ञात-विख्यात होत. औंढय़ा नागनाथाच्या मंदिरात कीर्तनासाठी आडकाठी केल्यामुळे मंदिराच्या पिछाडीस नामदेवरायांनी नामघोष आरंभताच संपूर्ण देऊळच १८० अंशांमधून फिरून नामदेवरायांसन्मुख प्रतिष्ठित झाले, असा तो कथाभाग भाविकांच्या भावविश्वात नांदत आलेला आहे. कथाभागांचे आवरण घटकाभर अंमळ बाजूला ठेवू. तुकोबारायांना इथे निर्देश करावयाचा आहे तो अद्वयाधिष्ठित भक्तीशास्त्राच्या गाभासूत्राकडे. ‘देव’ आणि ‘भक्त’ हे दोन्ही एकाच शाश्वत तत्त्वाचे अभिन्न कवडसे होत, हे ते गाभासूत्र. जिथे ‘भक्त’पण विराजमान आहे तिथेच अस्तित्व नांदते ‘देवत्वा’चे, हा होय तुकोबांच्या कथनाचा सत्त्वांश. एकाच अधिष्ठानाची ती होत दोन रूपे. त्यांचे पृथक अस्तित्व मुदलातच संभवत नाही. अद्वयाच्या प्रांतातील भक्तीच्या व्यवहाराचे हे आगळेपण विदित करणारा खुद्द नामदेवरायांचाच एक विलक्षण अभंग आहे त्यांच्या गाथ्यात. तूं अवकाश मी भूमिका । तूं लिंग मी साळुंका । तूं समुद्र मी द्वारका । स्वयें दोन्ही असा आहे त्या अभंगाचा पहिला चरण. देव आणि भक्त यांचे परिपूर्ण समरूपत्व आणि एकमेवाद्वितीय अशा परमतत्त्वाचेच दोन अवस्थांमधील अवतरण नामदेवरायांनी परोपरीने मांडलेले आहे अभंगाच्या पुढील चरणांत. अखेरच्या चरणात ‘देव’ आणि ‘भक्त’ या सामरस्याची परिसीमा नामा म्हणे पुरुषोत्तमा । स्वयें जडलों तुझ्या प्रेमा । मी कुडी तूं आत्मा । स्वयें दोन्हीं अशा प्रतीतीपूर्ण शब्दकळेद्वारे विदित करतात नामदेवराय. पंचमहाभूतांचे बनलेले शरीर आणि त्यांत वास करणारे आत्मतत्त्व ही दोन्ही पुन्हा एकाच चिरंतन तत्त्वाची आविष्करणे होत असे निरपवादपणे सांगत ‘‘शरीर ही आत्मतत्त्वाला चिकटलेली उपाधी होय’’, ही भूमिकाच अप्रस्तुत ठरवतात नामदेवराय. सर्वाघटीं राम देहादेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मीं या ‘हरिपाठा’मध्ये ज्ञानदेव विशद करत असलेल्या जीवनदृष्टीशी पूर्णपणे संवादी अशीच होय नामदेवरायांची अनुभूती. कीर्तन ही तर नवविध भक्तीमधील दुसऱ्या क्रमांकावरील उपासना. नामसंकीर्तन देवळात आहे की बाहेर हे इथे म्हणूनच ठरते गौण. जिथे ‘भक्त’ ही अवस्था विराजमान आहे तिथेच बिंब-प्रतिबिंब न्यायाने, ‘देवत्व’ही प्रतिष्ठित असावे हे अद्वयबोधानुसार सहज-स्वाभाविकच ठरते. फारकत केवळ असंभवच या दोन तत्त्वांची. मंदिर फिरण्याच्या लोकधारणेचा तात्त्विक धागा गुंफलेला आहे तो इथेच. देव देऊळ परिवारू । कीजे कोरोनि डोंगरू । तेवि भक्तीचा व्यवहारू । केवीं न व्हावा अशा शब्दांत ज्ञानदेव निर्देश करतात त्याच गाभासूत्राकडे ‘अनुभवामृता’मध्ये. देव, त्याचा उपासक असणारा भक्त, उपासनेची उपकरणे या अवघ्यांचे मूलतत्त्व एकच एक होय हेच परोपरीने सांगत आहेत ज्ञानदेव आणि नामदेवराय. तर, देवभक्तपण। तुका म्हणे नाहीं भिन्न अशा शब्दांत तुकोबाराय अधोरेखित करतात त्याच भूमिकेशी असलेले त्यांचे अनुभूतीपूर्ण सुसंवादित्व.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak devotee zws

Next Story
द्वैताची झाडणी..
ताज्या बातम्या