– अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकविध भक्तीचा अवलंब केला की अवघी वरकड साधने आपसूकच हस्तगत होतात ही बाब आश्वस्त करणारी अशीच आहे, परंतु त्यामुळे साधनापथावरील मार्गक्रमण एकदम सुकर होते असे थोडेच म्हणता येते? कारण, इथे मग अतिशय मूलभूत  प्रश्न उभा राहतो की मुदलात भक्ती आपलीशी कशी करायची! साधनापथावरील वाटचालीदरम्यान तो तुकोबारायांच्या पुढय़ात कोणत्या तरी एका टप्प्यावर उभा ठाकला होता याचा स्पष्ट संकेत मिळतो त्यांच्या एका अभंगात. वारकरी सांप्रदायिक अभंगमालिकांमध्ये ‘शनिवारचे अभंग’ या शीर्षकाखाली अभंगांचे जे संकलन आढळते त्यात दास्यभक्तीचे आदर्श प्रतीक गणल्या जाणाऱ्या मारुतीरायांचे गुणवर्णन करणारे तुकोबारायांचे अभंग आहेत. भक्तीशास्त्राचे सर्वंकष मर्म आकळावे यासाठी महाबळी हनुमंतरायाला सर्वतोपरी शरण जात काय भक्तीच्या त्या वाटा। मज दावाव्या सुभटा अशी आर्त आळवणी करतात तुकोबाराय एका अभंगात. संतत्वाला प्राप्त झालेल्या तपस्वी विभूतींचा आश्रय केल्यानेच भक्तीचे अंतरंग उलगडेल, हे सुचवायचे आहे तुकोबांना इथे. या तुकोक्तीमधील ‘सुभट’ हा शब्द कमालीचा मार्मिक व अर्थगर्भ होय. ‘भव्य’, ‘चांगले’, ‘सुरेख’, ‘मोठे’, ‘प्रशस्त’ असे अर्थातराचे विविध पदर लाभलेले आहेत ‘सुभट’ या शब्दाला. श्रीमद्भागवतामध्ये कथन आलेले आहे नवविधा भक्तीचे. उपासनेच्या या नऊ मार्गापैकी तुलनेने अधिक चांगला, प्रशस्त व भव्य पर्याय कोणता ते कृपा करून आपण मला सांगा, अशी विनंती करतात तुकोबाराय रामभक्त अंजनीसुताच्या पायी. समाजाच्या सर्व थरांतील साधकांना पाऊल घालणे सुलभ वाटावे इतपत आणि असा भक्तीचा हा पंथ विशाल व सर्वसमावेशक असला पाहिजे, ही तुकोबांच्या अंत:करणातील तळमळ ‘सुभट’ या शब्दामध्ये प्रतिबिंबित झालेली आहे. भागवतधर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तीतत्त्वाचे गाभासूत्रच जणू तुकोबा अधोरेखित करतात ते असे. किंबहुना, नवविध भक्तीची परिणती ज्या अनुभूतीमध्ये अपेक्षित आहे तिच्या गाभ्यापर्यंत नेऊन पोहोचविण्यासाठी तुकोबाराय अनन्यभावाने विनवणी करतात संतविभूतींची. नवविधा काय बोलिली जे भक्ती। द्यावी माझ्या हातीं संतजनीं हे महाराजांचे उद्गार मननीय ठरतात या संदर्भात. तुकोबारायांचे तर्कशास्त्र विलक्षण नेमके आणि अचूक आहे. भक्तीचा गाभा हातवटी आला की अवघ्या साधनेचे अधिष्ठान असणारी चित्तशुद्धी त्यांद्वारे साधते, अशी तुकोबांची निरपवाद साक्षच होय. तुका म्हणे नवविध। भक्ति जाणे तो चि शुद्ध ही तुकोक्ती थेट निर्देश करते त्याच चिरंतन वास्तवाकडे. आता, भक्तीचे हृदगत आत्मसात होण्यासाठी संतांची जवळीक का साधायची, असा पुढचा मुद्दा उपस्थित होतो या टप्प्यावर. बहेणि म्हणे भक्ति साधावया एक। पाहिजे विवेक पूर्ण देही अशा सूचक शब्दांत त्याचा खुलासा करू न ठेवलेला आहे तुकोबाशिष्या बहेणाबाईंनी. कशी मौज आहे पहा! भक्ती साधायची तर विवेकाची साधना अपरिहार्यच ठरते, असा नि:संदिग्ध सांगावा आहे बहेणाईंचा. आणि, चंद्र तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका । संत तेथें विवेका । असणें कीं जी अशा नितळ शब्दकळेद्वारे ज्ञानदेव विशद करतात विवेकाचे संतांशी असलेले परमैक्य. भागवतधर्मरूपी मंदिराचा पाया आणि पताका यांचे समरूपत्व हे असे व इतके प्रगाढ होय.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak devotion warakari zws
First published on: 09-11-2021 at 01:04 IST