अभय टिळक agtilak@gmail.com

‘भक्ती’ हे साधन मानायचे की साध्य ? की, भक्ती हे साधनाबरोबरच साध्यही ठरते ? हे दोन्ही प्रश्न मोठे मार्मिक होत. त्यांचे निरपवाद उत्तर देणेही सोपे नाही. श्रीमद्भागवतामध्ये नमूद नवविध भक्तीची संकल्पना बघावी तर परतत्त्वाच्या प्राप्तीचे साधन म्हणूनच भक्तीचा निर्देश तिथे आहे. भक्तीपासी ज्ञान वैराग्य आंदणे। सर्वही साधने लया जाती हे बहेणाबाईंचे उद्गारही भगवद्प्राप्तीचे सर्वसंपन्न साधन म्हणूनच भक्तीचा गौरव गातात. नवविध भक्तीपैकी सर्वात सुलभ आणि सर्वसमावेशक असणारे नामसंकीर्तन हे भक्तिसाधन तर भागवतधर्मविचाराने सर्वतोपरी शिरोधार्य मानले. किंबहुना, अखंड नामसाधनेद्वारे उपासकाच्या अंत:करणात उन्मळून येणाऱ्या विशुद्ध प्रेमाच्या झऱ्यालाच निखळ भक्तीचा प्रत्यय मानतात बहेणाई. नामसंकीर्तन सदा सर्वकाळ। अखंड प्रेमळ देह ज्याचे। तयासीच भक्ति म्हणावी निर्धार। जाणती उत्तर ज्ञानवंत हे त्यांचे शब्द अधोरेखन करतात तेच सारतत्त्व. नामसंकीर्तनाची परिणती निर्मळ, निरामय प्रेमाच्या उद्भवामध्ये घडून येणे अपेक्षित आहे, हा कमालीचा सूक्ष्म आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दाही त्या इथे मार्मिकपणे सूचित करतात. ही बाब चिरंतन स्मरणात ठेवण्यातच नामसाधनेचे गाभासूत्र आहे. आता, उपासना म्हटल्यानंतर काही क्रिया-उपचार स्वाभाविकच ठरतात. गंमत आहे ती इथेच. कारण, ज्ञानदेवांच्या अद्वयदर्शनाला आपण अनुसरलो तर ‘देव’ आणि ‘भक्त’ ही दोन्ही एकाच परमतत्त्वाची विलसने असल्यामुळे तिथे साधना कोणी, कोणाची व कशी करावयाची, हा मुद्दा उपस्थित होतो. इतकेच नाही तर, उपास्य दैवत आणि उपासक हे निमित्तमात्र का होईना परंतु, भक्तिसुखाच्या देवाणघेवाणीतील द्वैतही अद्वयावस्थेमध्ये संभवत नसल्याने उपासनेशी संलग्न पूजोपचारांसारख्या क्रियाही तिथे सपशेल अप्रस्तुतच ठरतात. तैसी क्रिया कीर न साहे । तऱ्ही अद्वैतीं भक्ति आहे । हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोलाऐसे हे ‘ज्ञानदेवी’च्या १८व्या अध्यायातील ज्ञानदेवांचे कथन कमालीचे नि:संदिग्ध आणि थेट आहे. ‘खचित’, ‘खरोखर’ हे अर्थ होत ‘कीर’ या शब्दाचे. अद्वैतस्थितीमधील भक्तीला कोणत्याही साधनक्रियेचे खरोखरच वावडे आहे, असा नितळ सांगावा आहे ज्ञानदेवांचा. हे वास्तव बोलून-ऐकून नव्हे तर रोकडय़ा अनुभवांतीच ज्याने त्याने जाणून घ्यायचे असते, हेही सांगून ज्ञानदेव मोकळे होतात. अद्वैतभावामधील ते अ-साधारण भक्तिसुख ही केवळ आणि केवळ एकांती अनुभवण्याचीच बाब होय, हे सांगायचे आहे ज्ञानदेवांना. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ज्ञानदेवांच्या लेखी भक्ती हे साध्यही नाही, भक्ती हे साधनही नव्हे तर भक्ती ही आहे एक अवस्था ! परमतत्त्वाशी परमैक्याची जी स्थिती त्या स्थितीलाच अद्वय-अद्वैताच्या प्रांतात ‘भक्ती’ असे म्हणतात, हा आहे ज्ञानदेवांचा सांगावा. सगळ्या प्रकारच्या द्वैताचे विसर्जन हा होय त्या परमैक्याच्या स्थितीचा स्थायीभाव. ‘भक्ती’ आणि ‘अ-भक्ती’ या परस्परसापेक्ष संज्ञांनाही काही अर्थवत्ता उरत नाही मग तिथे. आतां भक्ति अभक्ति । ताट झाले एके पांतीं । कर्माकर्माचिया वाती । माल्हावूनियां हे ज्ञानदेवांचे कथन म्हणजे अद्वयाच्या प्रांतातील क्रियानिरपेक्ष भक्तीचे सम्यक-समग्र सारकथनच.