अभय टिळक agtilak@gmail.com

कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशी हा नामदेवरायांचा जन्मदिवस. आज कार्तिक शुद्ध एकादशीस नामदेवरायांचा ७५१वा जन्मोत्सव सोहळा. ज्ञानोबाराय प्रणीत अद्वयबोध शब्दश: जगून दाखविला नामदेवरायांनी. ‘सखा विरळा ज्ञानेश्वर। नामयाचा जो जिव्हार’ हे  जनाबाईंचे उद्गार सार्थ ठरतात ते याच अर्थाने. प्रगट दिसणारा विश्वव्यापार हा परमशिवाचा विलास होय, हे शांभवाद्वयाचे प्रमेय व्यवहारात उतरावयाचे तर कशी जीवनरहाटी अवलंबावी याचा वस्तुपाठ म्हणजे नामदेवरायांचा आयुष्यक्रम. ‘बालभक्त’ ही त्यांची ओळख खऱ्या अर्थाने आम्हाला समजलेलीच नाही. त्यांच्या विराट व्यक्तिमत्त्वाचे आमचे आकलन आजही कमालीचे अप्रगल्भच.  नामदेवरायांच्या निरागस बालहट्टाखातर विठ्ठलदेवाने नैवेद्य प्रेमाधिकाराने ग्रहण केला या कथितामध्ये दडलेले अद्वयभारित जीवनदृष्टीचे सघन- सखोल रहस्य आम्हाला आकळलेलेच नाही. ते पुरते उमगायचे तर हात धरायला हवा तुकोबांचा. अवघे ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव। प्रतिमा तो देव कैसा नोहे  हा तुकोबारायांचा प्रश्न विलक्षण सूचक आणि तितकाच मार्मिक. विश्वातल्या अणुरेणूमध्ये देवत्व अंतर्बाह्य़ व्यापून उरलेले आहे, हे अद्वय  दर्शनाचे आद्य प्रमेय सम्यकपणे अनुभवलेल्या नामदेवरायांनी विटेवरील विठ्ठलमूर्तीमध्ये त्याच देवत्वाची प्रचीती अनुभवली.  ‘जड’ आणि ‘चेतन’ हे द्वंद्व बालमनाला कधीच जाणवत नसते. त्याच निरागसतेने नामदेवरायांनी त्या मूर्तीमध्ये वास करणाऱ्या देवत्वाला समरसून आवाहन करावे यात नवल ते काय? बाह्य़ाकार कसाही आणि कोणताही असला तरी तिथे दर्शन आहे ते शिवत्वाचेच, हे रहस्य उमगलेल्या नामदेवरायांनी तुपाची वाटी हाती घेऊन कुत्र्यामधील विठ्ठलतत्त्वाच्या मागे धाव घेतली नसती तरच नवल! अद्वयाचा परीसस्पर्श घडलेल्या दृष्टीला घडणारे  विश्वदर्शन अलौकिकच असते. तो अधिकार नामदेवरायांचाच. विठ्ठलाच्या विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक रुपांचे दर्शन एकाच मूर्तीमध्ये अनुभवायचे, तर दृष्टी हवी नामदेवरायांचीच. विठ्ठल उभा भीमातीरीं कर ठेवूनि कटावरी। विठ्ठल भक्तकाज कैवारी । विठ्ठल हरी महादोष असे त्या समसुंदर एकदेशी पंढरीनिवासाचे इंद्रियग्गोचर स्थूलस्वरूप वर्णन मनोभावे गाताना, त्याच ‘विठ्ठल’ तत्त्वाचे विश्वोत्तीर्ण रूप अंत:करणात स्थिरावलेले आहे नामदेवरायांच्या. अहिक्य विठ्ठल परम विठ्ठल निरंतर विठ्ठल तारीता  हे त्यांचे अनुभूतीसंपन्न उद्गार द्योतन करतात त्याच वास्तवाचे. अद्वयदर्शनाचे सारतत्त्व असे उभ्या अस्तित्वाशी एकरूप झालेले असल्यामुळेच, भागवतधर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तितत्त्वाची नामचिंतन आणि लोकसंग्रह ही उभय अंगे पूर्णत्वाने प्रतिष्ठित झाली नामदेवरायांच्या ठायी. १३-१४ व्या शतकाच्या आगेमागे मराठी भूमीमध्ये अंकुरलेल्या प्रबोधनपर्वाचे आद्य आचार्य बनण्याची कळीची जबाबदारी सहज पेलली नामदेवरायांनी. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशीच या प्रबोधनपुरुषाचा अवतार व्हावा यात एक अलौकिक संकेत दडलेला आहे. ज्ञानोबाराय समाधिस्त झाल्यानंतर जीवनाचे उत्तरपर्व नामदेवरायांनी वेचले ते लोकसंग्रहार्थ. त्यासाठी भरारी घेतली ती पंजाबातील घुमानपर्यंत. मानवतावादाची पताका त्रिखंडात फडकविण्यासाठी नामसंकीर्तन भक्तीला परिवेश चढवला प्रबोधनाच्या मुक्त विद्यापीठाचा. अविरत नामचिंतनाद्वारे चित्त अनासक्त बनलेल्या लोकाभिमुख संतत्वाने समाजप्रबोधनासाठी अखंड भ्रमणशील राहायचे, याचा वस्तुपाठ  समकालीन समाजपुरुषाच्या पुढय़ात साकारला त्यांच्या जीवनाद्वारे. ‘आद्य प्रबोधनपुरुष’ हे बिरुद शोभायमान बनले ते नामदेवरायांमुळेच!