अभय टिळक agtilak@gmail.com
अद्वयदर्शनाच्या तत्त्वचौकटीमध्ये गजाननाचे रूप गुणवर्णन करताना ज्ञानदेव आणि नाथांच्या ठायी वसणारे संतत्व, कवित्व आणि रसिकत्व अक्षरश: बहरून येते. दैवतमंडलातील एक बुद्धिदाते दैवत एवढय़ा पुरते भागवतधर्मी संतमंडळकृत गणेशस्तवन सीमित नाही. दृश्य जगाचे अधिष्ठान असणारे अंतिम, सत्य, चिन्मय असे आदितत्त्वच गणनायकाच्या रूपाने प्रगटलेले आहे, अशी नाथ-ज्ञानदेवांची श्रद्धा त्यांनी मांडलेल्या गणेशस्तवनाच्या अक्षरा-अक्षरामधून प्रगटते. सृजन आणि विलय या दोहोंचे आदिकारण गणराजच होय, असे सांगत ज्ञानदेव आणि नाथराय ‘गजानन’ हे तत्त्व शैवागमाच्या परिभाषेत मंडित करतात. एकमात्र असणारे परतत्त्व स्वेच्छेने प्रगट होते, विलसते आणि निखळ स्वयंप्रेरणेनेच पुन्हा स्वत:चे प्रगट रूप आवरून घेत केवळ स्पंदरूपाने विश्वोत्तीर्ण अवस्थेत नांदत राहते ही सारी गणरायाचीच क्रीडा होय, असे नाथ-ज्ञानदेवांचे प्रतिपादन होय. इथे ‘विलय’ याचा अर्थ ‘नाश’ अथवा ‘विसर्जन’ नव्हे. नट संबंधित नाटकामध्ये त्याच्या प्रवेशावेळी  विंगेमधून रंगमंचावर येतो आणि त्याची भूमिका झाली की पुन्हा विंगेमध्ये अंतर्धान पावतो, तसेच असते परतत्त्वाचे अवस्थांतर. बाप्पांच्या मोठय़ा पोटाचे स्पष्टीकरण देताना नाथराय अप्रत्यक्षपणे सूचन घडवतात ते याच नाटय़ाचे. तुजमाजीं वासु चराचरा। म्हणौनि बोलिजे लंबोदरा। यालागीं सकळांचा सोयरा। साचोकारा तूं होसी ही नाथांची ‘एकनाथी भागवता’च्या आरंभीच्या गणेशवंदनेतील ओवी म्हणजे त्याचाच दाखला. अवघी चराचर सृष्टी गणनायकाच्या उदरामध्ये सामावलेली असल्यामुळेच त्याला विशाल आकार प्राप्त झालेला आहे, हे नाथांचे बाप्पांच्या लंब-उदरासंदर्भातील स्पष्टीकरण, एका अर्थाने, शैवागमाला अभिप्रेत असणाऱ्या शिवतत्त्वाच्या विश्वोत्तीर्ण अवस्थेकडे निर्देश करते. विश्वाचा दृश्य आकार लयाला नेत निव्वळ स्पंदरूपाने विराजमान असणारे परमशिव हे आदितत्त्व आणि आकाररहित अवस्थेमध्ये केवळ ॐकार ध्वनीद्वारे प्रगटन घडविणारे गजानन हे आद्य तत्त्व या दोहोंतील आंतरिक साम्य अपेक्षित व अध्याहृत आहे नाथरायांना या ठिकाणी. अक्षर, आनंद आणि एकमेव असणारे आदितत्त्वच श्रीगुरू निवृत्तिनाथांच्या रूपाने मानवी आकारात  अवतरले आहे, अशी धारणा ज्ञानदेव व्यक्त करतात, ‘अमृतानुभवा’च्या सुरुवातीच्या संस्कृत नमनामध्ये. तर, ‘निवृत्ती’ असे अभिधान धारण करून वावरणारे तेच तत्त्व माझ्या माध्यमातून गीताटीका प्राकृतामध्ये सिद्ध करून घेत आहे, अशी भावना ते मुखर करतात ‘ज्ञानेश्वरी’मध्ये. अगदी नेमकी तीच भावना नाथरायांनी गणराजांना सन्मुख ठेवून शब्दबद्ध केलेली दिसते ती ‘एकनाथी भागवता’च्या पहिल्या अध्यायातील नमनाच्या ओव्यांमध्ये. प्रत्यक्ष भगवान नारायणांनी सूत्ररूपाने विदित केलेल्या श्रीमद्भागवतातील ११व्या स्कंदाचे प्राकृतामधील टीकारूप सिद्ध करण्यापूर्वी गणनायकाला नमन करण्यास मी सरसावलो आहे, अशी समजूत, तुम्ही श्रोतेहो, करून घेऊ नका; कारण, या शब्दाकृतीचा कर्ता मी नसून प्रत्यक्ष गणनाथच माझ्या माध्यमातून ती साकारत आहेत, अशी विनवणी नाथराय ग्रंथारंभी करतात. ऐशिया जी गणनाथा । मीपणें कैचा नमिता । अकर्ताचि जाहला कर्ता । ग्रंथकथाविस्तारा हे नाथांचे विनम्र कथन गणाधीशाकडे बघण्याची त्यांची अद्वयदृष्टीच अधोरेखित करते. लंबोदराचे दर्शन अशा अद्वयदृष्टीने घेणे जमेल का यंदा आपल्यालाही?