अभय टिळक agtilak@gmail.com

‘भग:’ या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे ‘सर्वशक्तिमत्व’ अथवा ‘ऐश्वर्य’. तर, ‘ऐश्वर्ययुक्त’ हा अर्थ होय त्यातूनच रूढलेल्या ‘भगवत’ या शब्दरूपाचा. भगवंत हा पूज्य, पराक्रमी, कीर्तीमान, ऐश्वर्यपूर्ण गणला जातो तो याच अर्थनिष्पत्तीमुळे. कोणत्या गुणसमुच्चयापायी परतत्त्व ऐश्वर्यसंपन्न गणले जाते याचा मनोज्ञ उलगडा ‘ज्ञानदेवी’च्या सहाव्या अध्यायात आइका यश श्री औदार्य। ज्ञान वैराग्य ऐभर्य । हे साही गुणवर्य। वसती जेथ अशा रसमय वाणीद्वारे केलेला आहे ज्ञानदेवांनी. या षड्गुणश्वर्यसंपन्नतेमुळेच म्हणोनि तो भगवंतु । जो नि:संगाचा सांगातु अशा शब्दांत ‘भगवंत’ या अभिधानाचे अर्थांतरंग पुढे स्पष्ट करतात ज्ञानदेव. अखिल जगताचे अधिष्ठान असणारे परतत्व गुणनिधी होय, हाच आहे ज्ञानदेवांच्या या साऱ्या कथनाचा इत्यर्थ. आता, इथे एक मोठी रम्य व तितकीच रोचक मौज आहे. ती अशी की, मी ज्याचे पूजन-अर्चन करतो तो माझा देव नेमका कसा आहे, याचे विवरण ज्ञानदेवांनीच त्यांच्या एका अभंगात आमुचियां देवा नाहीं नाम गुण । नाही थानमान रूपरेखा अशा अ-साधारण शैलीमध्ये विदित केलेले आहे. आहे की नाही गंमत ! म्हटले तर गंमत आणि म्हणले तर विरोधाभास. या वरपंग विरोधाभासाची उपपत्ती लावायची तर आपल्याला पुन्हा वळावे लागते नाथांकडे आणि ज्ञानदेवांकडेही. परतत्त्व स-गुण असो अथवा अ-गुण, ही दोन्ही रूपे एकाच अस्तित्वाची होत या अनुभूतीपूर्ण श्रद्धेने समर्पणयोगाचे आचरण अविरत करत राहणे, हा ‘पूजन’ या संकल्पनेचा गाभा होय असे स्पष्टीकरण हो कां सगुण अथवा निर्गुण । दोहीं रू पें मीचि जाण । तेथ जो करी निजभोग अर्पण । शुद्ध पूजन तें माझें अशा शब्दांत विदित करत नाथराय त्यांच्या परीने तुकडा पाडून टाकतात. तर, विश्वोत्तीर्ण आणि विश्वात्मक अशी उभय रूपे स्वेच्छेने धारण करणारे परमशिव, वस्तुत:, या दोन्ही रूपांच्या अतीतच आहे असे सांगत ज्ञानदेव ही सगळी चर्चा नेऊन भिडवतात ती थेट अद्वयदर्शनाच्या गाभ्याशी. रखुमादेविवरू साकारू निराकारू नव्हे। कांहीं न-होनि होये तोचि बाईये वो हे ज्ञानदेवांचे कथन या संदर्भात विलक्षण मार्मिक ठरते. परतत्त्वाचे जे रूप ज्याला रुचेल, पचेल व झेपेल ते त्याने स्वीकारावे व आपापल्या परीने अखंड साधनारत राहावे, याची जणू सोयच करू न ठेवलेली आहे नाथ-ज्ञानदेवांनी या भूमिकेद्वारे. संतांनी प्रवर्तित केलेल्या आध्यात्मिक लोकशाही व्यवस्थेशी सुसंगत आणि सुसंवादी अशीच ही उपासना सुलभता होय. ‘सगुण-साकार’ आणि ‘निर्गुण-निराकार’ या दोन जोडय़ांची सगुण-साकार, सगुण-निराकार, निर्गुण-साकार अथवा निर्गुण-निराकार अशी कोणतीही फेरजुळणी करून आपापल्या रुचिवैचित्र्यानुसार कोणत्याही रूपात परतत्त्वाची अर्चना करण्याचे स्वातंत्र्य भागवतधर्मी संतविचार साधकांना बहाल करतो तो असे. कारण, कोणत्याही रूपात विराजमान राहून आपली क्रीडा अविरत चालू ठेवायची हा तर त्या परतत्त्वाचा स्व-भाव होय. सगुण निर्गुण जयाचीं हीं अंगें । तो चि आह्मां संगें क्रीडा करी हे तुकोबारायांचे या संदर्भातील अनुभवजन्य वचन म्हणजे त्याच शाश्वत वास्तवाचे निरपवाद सूचन. प्रार्थना समाजाला तुकोबा जवळचे वाटले ते याचमुळे.