अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कार्तिक पौर्णिमा हा नानकदेवांचा जन्मदिवस. तिथी दोन असल्या तरी वैकुंठ चतुर्दशी आणि कार्तिक पौर्णिमा या दोहोंमध्ये सूत्र आहे ते सामरस्याचे आणि सर्वसमावेशक जीवनदृष्टीचे. वैकुंठ चतुर्दशी हा दिवस शिव आणि विष्णू यांच्या भेटीचा. हरिहरैक्याचा तो अनुपम्य सोहळाच. वैकुंठ चतुर्दशीला प्रथम विष्णूंचे आणि त्यानंतर शिवशंकरांचे पूजन करायचे ते ‘शिव’ आणि ‘विष्णू’ या उभय तत्त्वांचे सामरस्य मनीमानसी मुरवूनच. तर, नानकदेवांचे स्मरण म्हणजे जबाबदार, सर्वसमावेशक, द्वैत-द्वंद्वविहीन व विशुद्ध मानवतावादी प्रवृत्तिपर जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा जागरच. भागवतधर्म, नाथसंप्रदाय आणि नानकदेवांनी प्रवर्तन घडवून आणलेला एकेश्वरी मताचा धर्मपंथ या तीन तत्त्वधारांचे परस्परांशी निखळ व नैसर्गिक एकरूपत्व. सोवळे-ओवळे, स्पर्शास्पर्श, सत्त्वहीन कर्मकांडे यांसारखी ऐहिक मानवी लोकव्यवहार नासवणारी द्वैत-द्वंद्वे या तीनही विचारपरंपरांनी एकसारखीच त्याज्य मानली. तीनही उपासनापंथांचा एकसमान भर अंत:शुद्धीवर आणि सदाचरणावर. ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये नामदेवरायांची ६१ पदे समाविष्ट असण्यामागील तत्त्वमूल्यांचे सूत्र हे असे आहे. निखळ प्रवृत्तिपरता हा शैवागम, भागवतधर्म आणि नानकदेवांचा एकेश्वरी शीख धर्म या तिघांचा गाभा. शुद्ध आचरण आणि अनन्यभक्ती हे सर्वव्यापक असणाऱ्या परतत्त्वाची प्राप्ती करून घेण्याचे मुख्य साधन यांवर भर भागवतधर्माचा आणि नानकदेवांच्या शिकवणुकीचाही. शैवाद्वयाची जीवनदृष्टी आणि परतत्त्वाच्या सगुण-निर्गुण अभिव्यक्तीचे समरूपत्व पंजाबापर्यंत पोहोचले ते नामदेवरायांच्या माध्यमातूनच. परमतत्त्वाची प्राप्ती करून घेण्यासाठी प्रपंचाचा त्याग करावा लागत नाही, ही नामदेव आणि नानकदेव या दोघांचीही समसमान धारणा व जीवननिष्ठा. अंजन माहि निरंजन रहीऐ । जोग जुगति इव  पाईए हे नामदेवरायांचे अनुभवसिद्ध कथन ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये विराजमान असावे, हे सहज-स्वाभाविक ठरते ते या दोन विभूतिमत्त्वांच्या विचारविश्वात नांदणाऱ्या आंतरिक साम्यापायीच. ‘अंजन’ म्हणजे ‘डाग’. तर ‘निरंजन’ म्हणजे ‘निर्मळ’, डाग अथवा कलंकरहित. कोणत्याही उपाधीचा डाग चिकटलेला नाही अशा निरंजन परतत्त्वाची प्राप्ती उपाधीमध्ये राहूनच करून घेणे ही खरी योगसाधना, हा नामदेवरायांच्या हिंदीतील कथनाचा मुख्य गाभासंदेश. अद्वयदर्शनामध्ये, म्हणूनच, दृश्यमान जग आणि जगदीश्वर यांच्या नात्याचा उलगडा करण्यासाठी रज्जू-सर्पाच्या नव्हे तर पाणी आणि पाण्याच्या लाटेचा दृष्टान्त योजलेला आहे ज्ञानदेवांनी. जलतरंग अरू फेन बुदबुदा । जलते भिन्न न होई । इहू परपंचु पारब्राहृ की लीला। बिचरत आन न होई हे ‘गुरू ग्रंथसाहिब’मध्ये समाविष्ट नामदेवरायांचे पद उच्चारण करते त्याच अद्वयबोधाचा. पाण्याच्या पृष्ठभागावर उफाळणाऱ्या लाटा, डोलणारा फेस, बुडबुडे यांना पाण्यापेक्षा वेगळे अस्तित्व असते का? त्याच न्यायाने प्रपंचाचा प्रगट पसारा हा परब्रह्माचाच लीलाविलास होय, हा आहे नामदेवरायांचा अनुभव. तर, नाना कल्लोळ परंपरा। संतति जैसी सागरा। आम्हां आणि चराचरां। संबंधु तैसा अशा शब्दांत विश्व आणि विश्वात्मक परमशिव यांच्या समरूपत्व ज्ञानदेव विशद करतात. ‘ज्ञानदेव-नामदेव-नानकदेव’ या ज्ञानदीपांनी उजळलेली अद्वयबोधरूपी मूल्यविचारांची त्रिपुरी पौर्णिमा ही अशी चिरंतन तेजोमय आणि अम्लान आहे.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak human behavior gods of knowledge zws
First published on: 19-11-2021 at 01:25 IST