अभय टिळक agtilak@gmail.com

सापेक्षतेचे संपूर्ण विसर्जन हा होय ज्ञानदेवांनी पुरस्कारलेल्या अद्वयदर्शनाचा गाभा. परिणामी, तिथे वावच नाही कोणत्याही द्वंद्वाला. ज्ञानदेवांच्या तत्त्वविश्वाचा केंद्रबिंदू असलेल्या या दर्शनाचे सम्यक आणि अचूक भान होते नामदेवरायांना. तेच प्रतिबिंबित होते ज्ञानदेवांचा समाधिमहिमा वर्णणाऱ्या अभंगसंभारात. ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे सारसर्वस्व नामदेवराय विलक्षण जिव्हाळ्याने मांडतात तिथे. द्वैत-द्वंद्वांचे सर्वंकष उच्चाटन हा ज्ञानदेवप्रणीत तत्त्वदर्शनाचा सत्त्वांश होय, हे सिद्धान्तन करणें न करणें सांगितला पंथ। तिहीं लोकीं कीर्त वाढविली अशा शब्दांत स्पष्ट करतात नामदेवराय. ज्ञानदेवांना अभिप्रेत असलेली जीवनरहाटी कर्म-अकर्म या द्वंद्वापासून सर्वस्वी अलिप्त, अ-स्पर्शित असल्याचे नामदेवरायांचे हे कथन ठाव घेते ते अद्वयदर्शनाच्या गाभ्याचाच. द्वंद्व-द्वैतनिरपेक्ष जगण्याची अ-लौकिक रीत हस्तगत करायची तर त्यासाठी तशीच जीवनदृष्टीही हवी. ती प्रदान करणे हा ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष दृश्यअदृश्याच्या दूर केल्या गोष्टी। उघडिली दृष्टी ज्ञानदेवें अशा मार्मिक शब्दकळेद्वारे विदित करतात नामदेवराय. या विश्वाचे आदिकारण असणारे परमतत्त्व दृश्यमान असणाऱ्या भौतिक-लौकिक सृष्टीच्या पल्याड अव्यक्त स्वरूपात स्थित असल्याने दृश्य जगताचा पसारा दूर केल्याखेरीज त्याचे दर्शन-आकलन होणे अशक्य ही तत्त्वधारा शांभवाद्वयाच्या विचारविश्वात अप्रस्तुत असल्याचे ज्ञानदेवांचे कथन नामदेवराय किती खुबीने निर्देशित करतात पाहा. जे जे काही म्हणून उघडय़ा डोळ्यांना दिसते आहे ते ते सारे परमशिवाचेच दर्शन असल्याने शिवमय जगाच्या अशा या दृश्य दर्शनापेक्षा वेगळे व श्रेष्ठ असे काही सृष्टीमध्ये विद्यमानच नसते ही ज्ञानदृष्टी प्रदान करणे हा ज्ञानराजांच्या कार्यकर्तृत्वाचा चरमबिंदू होय, हेच आहे नामदेवरायांचे प्रतिपादन. परमतत्त्वाच्या प्राप्तीसंदर्भात शब्दरूपाने सर्वत्र सतत नांदणाऱ्या विद्या आणि अविद्या या द्वंद्वाचाही निचरा होतो मग समूळ. अविद्या मायेचा लागों नेदी वारा। ऐसें जगदोद्धारा बोलियेलें हे नामदेवरायांचे वचन सूचन करते त्याच वास्तवाचे. अविद्यारूप मायेचा वारादेखील ज्ञानदेवांच्या विचारविश्वाकडे चुकूनसुद्धा फिरकत नाही, हे नामदेवरायांचे प्रतिपादन कमालीचे सूक्ष्मतमही होय. नामदेवराय इथे निर्देश करत आहेत ज्ञानदेवांच्या ‘अनुभवामृता’तील सहाव्या प्रकरणाकडे. अविद्येचा नाश घडून आल्याखेरीज परतत्त्वाचे ज्ञान होणे असंभव, या सिद्धान्ताच्या, अद्वयानंदाच्या चौकटीसंदर्भातील मर्यादा, कां जे बोलें अविद्या नाशे। मग आत्मेनि आत्मा भासे। हें म्हणतखेवीं पिसें। आलेंचि की अशा मार्मिक शब्दांत उघडय़ा पाडतात ज्ञानदेव ‘अनुभवामृता’च्या सहाव्या प्रकरणामध्ये. अविद्येचा नाश घडून येतो ज्ञानाद्वारे. शब्द हे तर ज्ञानाचे वाहक. आता, ज्या आत्मवस्तूच्या प्रांगणातदेखील शब्द पाऊल घालू शकत नाहीत त्या आत्मवस्तूचे ज्ञान झाले की अविद्येची उचलबांगडी आपसूकच होईल असे म्हणणे याला खुळेपणाखेरीज अन्य कोणते नाव देणार, असा प्रश्नच विचारतात ज्ञानदेव. अविद्यानामक स्थितीला तिचे स्वायत्त असे अस्तित्व आहेच कोठे? ज्ञानाचा, विद्येचा अभाव हीच अविद्या. पण, ज्ञानमय शिवाचे विलसन असलेल्या या विश्वात ज्ञानाचा अभाव संभवतो का कधी तरी? एकादशीचा उपवास झाल्यानंतर द्वादशीच्या दिवशी करावयाच्या भोजनाला म्हणतात ‘पारणे’. हरिदिनी केलेल्या ‘उप-वासा’चे साध्य हस्तगत झाले की द्वादशीच्या दिवशी पारणे साजरे करायचे निर्द्वद्वतेचे ते असे!