– अभय टिळक agtilak@gmail.com

नामसंकीर्तन भक्ती म्हणजे देव आणि भक्त यांच्यादरम्यानची जणू शिडीच होय, असा अनोखा दाखला देतात सांवतामहाराज. वैकुंठींचा देव आणूं या कीर्तनीं। विठ्ठल गाऊनी नाचों रंगी हे सांवतामहाराजांचे उद्गार अधोरेखित करतात कीर्तनभक्तीचे नेमके तेच आगळेपण. व्यवहारात शिडीचा उपयोग दुहेरी असतो. उंचावर असलेल्या व्यक्तीला खाली आणणे आणि खाली उभा असलेल्याला उच्च स्थानी जाण्यास साधनभूत होणे, अशी दुहेरी भूमिका शिडी पार पाडते. देवत्वाचे ‘अवतरण’ होते याचा तत्त्वश: अर्थही तोच. ‘उतरणे’, ‘खाली येणे’ हे होत ‘अवतरण’ या शब्दाचे अर्थ. ‘देव अवतार धारण करतो’ अशी जी आपल्या परंपरेची धारणा आहे तिचाही गाभा हाच. गुणातीत, निराकार, निरवयव, निरुपाधिक असणारे परतत्त्व ज्या वेळी सगुण, साकार, सावयव आणि सोपाधिक बनते त्या वेळी, एका अर्थाने, ते त्याच्या श्रेष्ठ-वरिष्ठ अशा स्थानावरून खाली उतरत असते. आपल्या व्यवहारातील परिचित शब्द वापरायचा तर, ‘अवतार घेणे’ ही परतत्त्वाच्या संदर्भात पदावनतीच गणायला हवी! भक्ताच्या हट्टाखातर परमतत्त्व तशी पदावनती प्रेमाने स्वीकारतो, हे प्रमेय भक्तीच्या प्रांतात प्रतिष्ठित झालेले दिसते ते याच कार्यकारणसंबंधाद्वारे. नाहीं या आनंदासी जोडा। सांगतां गोष्टी लागती गोडा। आला आकारा आमुच्या चाडा। तुका म्हणे भिडा भक्तीचिया हे तुकोबांचे कथन साक्ष पुरवते भक्तीच्या सामर्थ्यांची. हरिदासांच्या प्रेमळ हट्टाखातर निरुपाधिक देवत्वाला उपाधी जडवून घेणे भाग पडते, असा हरिभक्तांच्या सामर्थ्यांचा पवाडा आणिला रूपाहीं बळें। करूनि खळें हरिदासीं अशा गौरवपूर्ण शब्दांत गातात तुकोबाराय. निरुपाधिक अवस्थेमधून उपाधिजडित स्थितीमध्ये अवतीर्ण होण्यास देवत्वाला कीर्तनरूपी शिडी पुरवतात हरिभक्त. जनाबाईंची या संदर्भातील साक्ष कमालीची मार्मिक आणि तितकीच अर्थपूर्ण होय. पंढरी क्षेत्रामध्ये गजबजलेल्या संतमेळ्याने आरंभलेल्या कीर्तनघोषामध्ये देव तिष्ठत उभा आहे, असा जो सांगावा संतभार पंढरींत। कीर्तनाचा गजर होत। तेथें असे देव उभा। जैशी समचरणांची शोभा अशा शब्दांत जनाबाई देतात तो या संदर्भात मननीय ठरतो. मनुष्यत्वाच्या पातळीपर्यंत देवत्वाला खाली आणणे हे झाले कीर्तनभक्तीरूपी शिडीच्या भूमिकेचे एक अंग. तर, उपाधीने सर्वागी व्यापलेल्या उपासकाला क्रमाक्रमाने निरुपाधिक बनवत देवत्वापर्यंत उन्नत बनविणे ही ठरते कीर्तनभक्तीरूपी शिडीची दुसरी महत्त्वपूर्ण भूमिका. परतत्त्वप्राप्तीचे एक सक्षम साधन म्हणून साधक कीर्तनभक्तीचा अवलंब करतो त्यांद्वारे आंतरिक उन्नतीची प्रक्रिया तिथे साकारू लागते. अंत:शुद्धी साध्य बनते कीर्तनाद्वारे असा निर्वाळा देत त्याचसाठी नामसंकीर्तनाचा पाठपुरावा अविरत करत राहावा, असे आवाहन अंतर शुद्धीचें कारण। वाचे करा हरिकीर्तन अशा शब्दांत नाथराय करतात त्यांमागील कारण हेच. कीर्तनाद्वारेच अंत:करण शुद्ध बनण्याची जी हमी ठाम शब्दांत नाथराय देतात तिच्यात अनुस्यूत असणारा कार्यकारणभावही तितकाच रम्य आहे. मनबुद्धीमध्ये सदैव वास करणारे द्वंद्व-द्वैत आणि त्यांतून निपजणारी भेदकारक विषम वृत्ती यांचे निराकरण कीर्तनभक्तीद्वारे घडून येण्यामागील सूक्ष्मतम असे अंत:सूत्र द्वंद्व द्वैत भेद नुरेचि ठाव। कीर्तनीं तिष्ठे उभाचि देव अशा प्रत्ययकारी शब्दकळेद्वारे प्रगट करतात नाथराय. कीर्तन हा ‘परफॉमर्न्‍स’ नसून ती शिडी होय, याचा जणू घाऊक विसरच पडलेला दिसतो आज!