अभय टिळक agtilak@gmail.com

कथाकीर्तनांमध्ये सांगितली जाणारी अशीच एक कथा. ‘मला देवाचे दर्शन घडवा’, असा हट्ट धरला एका मुमुक्षूने त्याच्या आचार्यापाशी. ‘देव असा एकदम, सहज भेटणार नाही. त्यासाठी साधना करावी लागेल..’, असे गुरुजींनी बरेच समजावूनही शिष्य त्याचा हेका काही केल्या सोडेना. एके दिवशी तर तो साधक पार हट्टालाच पेटला. मग, आता त्याची काहीतरी समजूत घालायची म्हणून त्याचे आचार्य त्याला म्हणाले, ‘बाळा, एकान्तामध्ये समाधी लावलीस तर तुला परतत्त्वाची अनुभूती नक्कीच येईल बरे..’. झाले! साधकाने तिथून धरली वाट थेट अरण्याची. चार दिवसांनी परत आला गुरुजींकडे आश्रमात. ‘लागली का समाधी परिपूर्ण त्या एकान्तामध्ये?’, प्रश्न विचारला गुरुजींनी मग त्या साधकाला. साधक त्यांना म्हणाला, ‘हो. गुरुजी. पूर्ण एकान्त होता त्यांमुळे लागली ध्यानसमाधी’. ते ऐकल्यावर गुरुजी अंमळ हसले. त्याला त्यांनी विचारले, ‘तुला कसे कळले बाबा की तिथे संपूर्ण एकान्त होता म्हणून?’. शिष्य बुचकळ्यात पडला. म्हणाला, ‘मी सावध होतो ना गुरुजी सतत. माझ्याखेरीज अन्य कोणीही नव्हते तिथे. सर्वत्र पूर्ण एकान्तच होता’. गुरुजी आता मात्र मोठय़ाने हसले. उद्गारले, ‘‘अरे, तिथे दुसरा कोणी नाही हे दक्षपणे बघणारा ‘तू’ तिथे होतास. ‘मी’ बघतो आहे, माझ्याखेरीज अन्य इथे कोणीच नाही ही जाणीव तर तुझ्या ठायी चांगली जागृत होती. हा कसला म्हणायचा एकान्त! ‘मी’ या मूलभूत जाणिवेचा अंत म्हणजे खराखुरा एकान्त. ‘मी’ची जाणीव समूळ लोपली की खाली जी अवस्था उरते तिला म्हणावे समाधी. लागली का तिथे तशी समाधी तुला खरोखरच?’’. उत्तर देण्याचेही भान आणि त्राण उरले नव्हते त्या मुमुक्षू साधकाच्या अंगी गुरुजींचे ते सारे बोलणे ऐकून. संपली गोष्ट! ‘एकान्त’ आणि ‘समाधी’ या दोन्ही संज्ञांचे मर्म आता आपल्याला व्यवस्थित आकळावे. ‘मी’च्या जाणिवेचा अंत हाच ‘एकान्त’. आणि, ‘मी’ची जाणीव हरपल्यानंतर जी अवस्था विद्यमान असते तिलाच म्हणावे ‘समाधी.’ हे वर्म नेमकेपणाने ज्ञात होते आमच्या नामदेवरायांना. कार्तिक महिन्यातील वद्य त्रयोदशीला समाधिस्थ होणाऱ्या ज्ञानदेवांसभोवती अगत्याने आणि परम जिव्हाळ्याने एकवटलेल्या संतमेळ्याच्या त्या अनुपम भाग्याचे वर्णन, त्यांमुळेच, नामा म्हणे धन्य भाग्याचे हे संत। झाला पहा एकान्त ज्ञानोबाचा अशा विलक्षण अन्वर्थक शब्दांत करत असतानाच, ‘समाधी म्हणजे एकान्त’ हे सूत्र आपल्या मनावर बिंबवतात नामदेवराय. ‘मी आणि माझे’ या संकुचित द्वंद्वाच्या फेऱ्यातून एकदा का मुक्तता झाली की अनुभूती येते ती विराट, अनुपमेय, असीम अशा विश्वव्यापक अस्तित्वाची. तिलाच म्हणावे एकान्तातील समाधी अथवा एकान्ताद्वारे साधणारी समाधी. परिपूर्ण निर्द्वद्व असे ते अस्तित्व. सर्व प्रकारच्या द्वैत-द्वंद्वांचा सम्यक् लय घडून आल्यानंतरची अवशिष्ट अशी ती अवस्था. चिरंतन टिकणारी. ‘साध्य-साधन-साधक’ ही त्रिपुटी आणि ‘देव व भक्त’ हे द्वैत यांचा समूळ विलय घडवून आणणारी अशी ती अस्तित्वाची विशुद्ध जातकुळी. झाला देवोचि भक्तु। ठावोचि झाला पंथु। होऊनि ठेला एकान्तु। विश्वचि हें अशा अ-लौकिक शब्दकळेद्वारे ज्ञानदेव विदित करतात समाधिस्थ योग्याची ती अस्तित्वरीत ‘अनुभवामृता’च्या नवव्या प्रकरणामध्ये. ‘संजीवन समाधी’ म्हणतात ते त्याच स्थितीला. तीच समाधिवस्था ज्ञानदेव अलंकापुरीमध्ये अनुभवत आहेत गेली तब्बल ७२५ वर्षे.