फलश्रुति

कीर्तनीं स्वधर्म वाढे। कीर्तनीं जोडे चित्तशुद्धि  हे नाथरायांचे वचन खणखणीत उच्चार करते त्याच बीजसूत्राचे.

– अभय टिळक – agtilak@gmail.com

अज्ञान व पंथीय अभिनिवेश यांचा मी संत परंपरेबाबत विचार करताना, अनेक वेळा, ‘प्रवृत्तिमार्गी संत’ आणि ‘निवृत्तिमार्गी संत’ असे द्वैत मुखर होते. मुदलात ‘भक्ती’ या संकल्पनेचे सदोष आकलन या धारणेच्या मुळाशी दृढपणे नांदत असते. भजन-कीर्तनाची साधने अवलंबणे म्हणजे परमार्थाला लागणे, पर्यायाने प्रपंचामधून निवृत्त होणे, अशा प्रकारच्या कल्पनांचे पेव या साऱ्या दिशाभूलींतूनच फोफावते. कीर्तनाची परिणती निष्क्रियतेमध्ये घडून येणे संतपरंपरेला व त्याहीपेक्षा संतविचाराला कधी तरी अभिप्रेत होते का, असा साधा विचारही आपल्या कोणाच्याही मनात कधीच कसा उमटत नाही? ‘कीर्तनाचा पूर्वरंग साधना-कोटींतील लोकांना उपयोगी पडेल असा दाखविला जाऊन तो उज्ज्वल स्वरूपाचा व प्रवृत्तिपर असा असावा’ हे लोकमान्यांचे सूत्र या संदर्भातील यच्चयावत भ्रामक समजुतींचा निचरा करणारे ठरावे. ऐहिक जीवनाची आणि लौकिक प्रपंचाची निकोप धारणा घडविणारी जीवनदृष्टी कीर्तन संस्थेद्वारे समाजामध्ये रुजावी, या लोकमान्य टिळक प्रणीत भूमिकेचे अकुंरण घडलेले आपल्याला गवसते ते भागवत धर्मविचारामध्ये. कीर्तनीं स्वधर्म वाढे। कीर्तनीं जोडे चित्तशुद्धि  हे नाथरायांचे वचन खणखणीत उच्चार करते त्याच बीजसूत्राचे. कीर्तनभक्तीद्वारे समाजमनावर प्रवृत्तिपूरक अशा स्वधर्माचरणाची प्रेरणा सिंचित बनावी, ही भूमिका आहे भागवत धर्माने शिरोधार्य मानलेल्या भक्तितत्त्वाची.किंबहुना म्हणूनच, हें ऐसें असे स्वभावें। म्हणोनि कर्म न संडावें। विशेषें आचरावें। लागें संतीं  असे ज्ञानदेव साक्षेपाने बजावतात ‘ज्ञानेश्वरी’च्या तिसऱ्या अध्यायात. ‘संत’ या कोटीमध्ये विराजमान झालेल्या विभूतींनी लौकिक कर्माचा त्याग करताच कामा नये, उलट निष्काम कर्माचरणाचा आदर्श संतप्रवृत्तींनी आपल्या जीवनरहाटीद्वारे समाजाच्या पुढय़ात उभा करावा, अशी अपेक्षा आहे ज्ञानदेवांची. संतविचार आणि भागवत धर्माने प्रवर्तित केलेला भक्तिविचार निखळ प्रवृत्तिपर आहे तो याच अर्थाने. वाटय़ाला आलेले अगदी बारीकसारीक क्षुल्लक कामदेखील प्रत्येकाच्या हातून परिपूर्ण आणि कामनाविरहित भूमिकेमधून घडावे यासाठी पायाभूत आणि अनिवार्य असणारी चित्तशुद्धी साध्य करण्यासाठीच कीर्तनभक्तीचा अवलंब भागवतधर्माला अपेक्षित आहे आणि अध्यात्मही. कीर्तनभक्ती व जबाबदार ऐहिकता यांचा संबंध असा जैविक व इतका घनिष्ठ आहे. कीर्तनाद्वारे अंत:शुद्धी एकदा का हस्तगत झाली, की ‘लौकिक’ आणि ‘पारलौकिक’ हा आपणच करत असलेला भेदही लयाला जातो. हरिकिर्तनें चित्त शुद्ध। जाय भेद निरसुनी  हे नाथांचे उद्गार निर्देश करतात त्याच मौलिक तत्त्वाकडे. डोळसपणे आचरलेल्या कीर्तनभक्तीची परिणती अशा प्रगाढ एकात्मदृष्टीत घडून येणे अभिप्रेत आहे संतपरंपरेला. सर्वाभूतीं समदृष्टी। पाहे सर्व एकमय सृष्टी। तरी ऐक्य कीर्तन गोठी। परमानंदे आल्हाद  असा नाथांचा जो सांगावा आहे त्याचे सारतत्त्व हेच. मुळात, कीर्तनाचा हेतू काय हेच जर अचूक कळले नाही तर सगळेच मुसळ केरात! प्रेम आणि निर्द्वद्वता हे होय कीर्तनाचे फलित आणि हेतूही. धरीं प्रेम सदा वाचे। कीर्तनरंगीं तूं  नाचें। मीतूंपण साचें। अंगी न धरीं कांहीं या नाथरायांच्या उपदेशाचे मर्म तेच होय. कीर्तन का करायचे अथवा ऐकायचे याचे गमक जर नीट आकळले तर कीर्तनभक्तीत अपेक्षित असणारी आंतरिक शिस्त आपसूकच अंगी बाणावी. श्रोता वक्ता होऊनी सावधान। परनिंदा परपीडा टाकून । कीर्तन करावें श्रवण। रामकृष्ण नामें उच्चार  ही ती शिस्त.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak purpose of kirtan spirituality zws

Next Story
शिडी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी