कीर्तनपीठ

कीर्तनपीठाद्वारे हीच विश्लेषणक्षमता लोकव्यवहारात संवर्धित होणे अभिप्रेत आहे नामदेवरायांना.

अभय टिळक agtilak@gmail.com

निव्वळ माहितीलाच ज्ञान समजण्याची गफलत व्यवहारात सर्रास होत असते. माहिती विस्फोटाच्या आजच्या युगात तर ‘माहिती’ आणि ‘ज्ञान’ यातील सूक्ष्म, महत्त्वाचा गुणात्मक फरक लोपतच चाललेला दिसतो. वास्तविक माहिती अथवा तिचे संकलन ठरते ज्ञानाचे मूलद्रव्य. माहितीच्या प्रांतात महत्त्व असते संकलनाला आणि संकलित माहितीच्या व्यवस्थापनाला. तर, ज्ञानाच्या प्रांगणात ते असते संकलित माहितीच्या विश्लेषणाला. माहितीच्या विश्वात कळीची ठरते स्मरणशक्ती तर ज्ञानाच्या गाभाऱ्यात उपासना करावी लागते ती विश्लेषण क्षमतेची. त्यासाठी गरज असते निसर्गदत्त बुद्धीवर संस्कार घडविण्याची. ज्या समाजव्यवस्थेमध्ये ज्ञानसंपादनाच्या चाव्याच मूठभरांच्या मुठीमध्ये बंदिस्त असतात तिथे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाची प्रक्रिया जटिल होते. ज्ञानदेव-नामदेवरायांना सामना करावा लागला तो १२-१३व्या शतकातील तशाच बंदिस्त समाजव्यवस्थेचा आणि तिच्यातील विषमतापूर्ण ज्ञानविश्वाचा. मठा-पीठांत कोंडले गेलेले ज्ञान सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणायचे तर ज्ञानसंपादनाचीच नव्हे तर ज्ञानसंवाहनाचीदेखील निराळीच संस्थात्मक व्यवस्था आणि व्यासपीठे निर्माण करणे अनिवार्यच होते. ज्ञानप्रसारणाची खुली व्यासपीठे म्हणून ‘कीर्तन’ व कीर्तनकार या दोन प्राचीन संस्थांची नव्याने ओळख प्रस्थापित करण्याद्वारे नामदेवरायांनी त्या कार्याची पायाभरणी केली. नाचूं कीर्तनाचे रंगीं। ज्ञानदीप लावूं जगीं या त्यांच्या घोषवाक्याचे गाभासूत्र तेच होय. कीर्तनकार  लोकशिक्षक असतो, असावा ही जाणीव दृढावली ती याच प्रक्रियेद्वारे. त्याचसाठी कीर्तनकार पाठांतर आणि विश्लेषण क्षमता या गुणांनी मंडित असावा लागतो. लौकिक-पारलौकिक व्यवहारांतील मार्मिक सिद्धान्त मांडून त्यांचे विवरण-विश्लेषण सर्वसामान्यांना कळेल-उमजेल-पचेल अशा शैलीत करण्याची साधना त्याच्यासाठी अत्यावश्यकच ठरते. न लगे नाना युक्ती व्युत्पत्तीचें वर्म। हरीचें कीर्तन सोपें बहु असे उद्गार दक्षिण काशी म्हणून गौरविल्या गेलेल्या पैठण क्षेत्रनिवासी नाथरायांसारख्या संतहृदय पंडिताने काढावेत यातच सर्व काही आले. श्रोत्यांच्या आकलनशक्तीचे संगोपन-संवर्धन-पोषण व्हावे याचसाठी जटिल सिद्धान्तांचे वर्म कीर्तनकाराने सोपे करून सादर करावयाचे असते, याकडे रोख आहे नाथांचा. एकटय़ाने वेदांची आवृत्ती करणे आणि वेदवाक्यांचे वर्म कीर्तनाच्या गादीवरून विवरून मांडणे या दोहोंत मुख्य फरक कोणता असेल तर तो हाच. वेदाचा अर्थ न कळेची पाठका। कीर्तनीं नेटका भाव सोपा अशा शेलक्या शब्दांत नाथराय स्पष्ट करतात कीर्तन-प्रवचनकारांवरील जबाबदारी. वेदपाठकाला तो म्हणत असलेल्या ऋचांचा अर्थ कळला नाही तरी एक वेळ भागून जाते. मात्र, कीर्तनश्रवणाला बसलेल्या श्रोत्यांना समजेल अशा नेटक्या पद्धतीने आपल्या प्रतिपाद्य विषयाचे मर्म उकलून सादर करणे हे कीर्तनकाराचे अंगभूत उत्तरदायित्व ठरते. श्रवणाबरोबरच श्रोत्यांच्या मनोविश्वात विश्लेषणाच्या प्रक्रियेचेही अंकुरण घडत राहावे, याचे भान म्हणूनच सतत जागृत असावे लागते कीर्तनकारांच्या ठायी. वेदवाङ्मयाच्या पठणात सर्वोच्च महत्ता गाजते ती निर्दोष शब्दोचारणाची. तर, कीर्तनाद्वारे अपेक्षित आहे भरणपोषण समाजपुरुषाच्या सारासार विवेकशक्तीचे. श्रुतीचेनीं मतें पाहे तो उच्चार। परी सारासार विचार कीर्तनीं हे नाथांचे उद्गार आजही तंतोतंत प्रस्तुत ठरतात ते त्यामुळेच. कीर्तनपीठाद्वारे हीच विश्लेषणक्षमता लोकव्यवहारात संवर्धित होणे अभिप्रेत आहे नामदेवरायांना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak responsibility of kirtan preachers zws

Next Story
प्रबोधनपुरुष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी