अभय टिळक agtilak@gmail.com

कार्तिकातील वद्य पक्षाला प्रारंभ झाला की अवघ्या वैष्णवमेळ्याला वेध लागतात आळंदीयात्रेचे. कार्तिक वद्य त्रयोदशी हा ज्ञानदेवांचा समाधिदिन.  कार्तिक वद्य अष्टमीपासूनच समाधिप्रसंगाशी निगडित उपचार—उपक्रमांना अलंकापुरी क्षेत्रामध्ये सुरुवात होते. सन १२९६ हे ज्ञानदेवांच्या समाधीचे वर्ष. म्हणजेच, २०२१ सालातील येत्या कार्तिक वद्य त्रयोदशीला ज्ञानदेवांना समाधिस्थ होऊन ७२५ वर्षे पूर्ण होतात. किती विलक्षण योगायोग पाहा ! २०२१ सालातील कार्तिक शुद्ध एकादशी हा ठरला नामदेवरायांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अवतारदिवस; त्यानंतर अवघ्या पंधरवडय़ातच अवतरतो आहे ज्ञानदेवांच्या संजीवनसमाधीचा सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव. १३व्या शतकातील महाराष्ट्रात भागवत धर्माच्या वैचारिक कुशीतून अवतरलेल्या प्रबोधन पर्वाचे ज्ञानदेव आणि नामदेव हे दोघेही आद्य उद्गाते. कीर्तनभक्तीसारखे लोकशिक्षणाचे खुले व्यासपीठ गतिमान बनवत नामदेवरायांनी ज्ञानाचा दीप प्रज्ज्वलित केला. तर, समाजपुरुषाच्या निरंतर प्रबोधनाची वाट प्रकाशमान बनविणाऱ्या अशा प्रकाशदीपांच्या ज्ञानज्योतींवर प्रसंगवशात काजळी जमा झाली तर ती फेडण्याच्या जबाबदारीचे उचित भान संतयोग्यांना स्वत:च्या जीवनक्रमाद्वारे आणून दिले ज्ञानदेवांनी. ज्ञानमार्गे समाजातील यच्चयावत घटकांचे सक्षमीकरण घडवून आणणे, हे ठरते नामदेवरायांच्या लेखी ज्ञानदेवांचे सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ कार्यकर्तृत्व. ज्ञानसंपादनापासून वंचित राखल्या गेलेल्या समाजगटांना, ज्ञानाचे लोकशाहीकरण घडवून आणत नवसंजीवनी प्रदान करण्याची अचाट ख्याती ज्ञानोबारायांनी संपादन केली, असा जो दाखला नामदेवराय देतात त्यामागील कार्यकारणभाव हाच होय. ज्ञान हें अंजन साधी संजीवनी । नामा म्हणे यांनीं ख्याती केली हे नामदेवरायांचे उद्गार विलक्षण अर्थपूर्ण ठरतात या संदर्भात. संतमंडळाने ज्ञानाचे लोकशाहीकरण घडवून आणले, या वास्तवाचा निर्देश गहिवरल्या कंठाने वारंवार केला जातो. परंतु, या प्रक्रियेची पायाभरणी करत असताना ज्ञानोबारायांनी नेमके काय काय केले याचा लेखाजोखा मात्र तितक्याच साक्षेपाने मांडला जात नाही. नामदेवरायांनी आपल्याला निरंतर ऋणाईत करून ठेवलेले आहे ते नेमके याच बाबतीत. ज्ञानदेवांच्या समाधिप्रसंगाचे वर्णन करत असताना त्यांच्या महत्कार्याचे अवघे पैलू नामदेवरायांनी विलक्षण हळुवार प्रज्ञेने आणि पराकोटीच्या प्रगल्भ प्रतिभेने उलगडून मांडलेले आहेत. सांकेतिक, जडजंबाल भाषेच्या फोलपटांतून निक्या सत्वांशाचे कण वेचून ते सामान्यांना समजणाऱ्या शब्दकळेद्वारे मंडित करून समाजमनाच्या आवाक्यात आणून ठेवणे, ही ज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी प्रयत्नशील बनू पाहणाऱ्या लोकाभिमुख विद्वानांची केवळ आद्यच नव्हे तर प्रधान व चिरंतन जबाबदारी ठरते. प्रगट हें गु उकलीलें गाबाळ । केलें करतळमळ ज्ञानयानें हे नामदेवरायांचे कथन निर्देश करते ज्ञानदेवांच्या त्याच असाधारण कामगिरीकडे. ज्ञानदानाच्या प्रक्रियेचा जणू गाभाच ठरणाऱ्या उदार, सर्वसमावेशक मानवी जाणिवेचा कोंभच ज्ञातेपणाच्या जहरापायी कोळपून गेलेला असेल तर अध्ययन—अध्यापनाची व्यवस्था लोकाभिमुख होणेच अशक्य. मूर्तिमंत ज्ञानसूर्यच जणू शोभावेत असे ज्ञाते तापहीन असावेत, या ज्ञानदेवांच्या चंद्रमें जें अलांछन । मरतड जे तापहीन। तें सर्वाहि सदा सज्जन । सोयरे होतूं अशा शब्दांत ‘पसायदाना’मध्ये प्रगट झालेल्या भावनेमध्ये द्योतन घडते ते त्याच अपेक्षेचे. ज्ञानमाहितीचा विस्फोट झालेल्या आजच्या युगात सर्वाधिक वानवा जाणवते ती तशा तापहीन, सकणव, लोकाभिमुख ज्ञानमरतडांचीच!

Dr. Babasaheb Ambedkar and Buddhism
विश्लेषण: ‘या’ जाती बौद्ध धर्म का स्वीकारतात? त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान काय?
avimukteshwaranand saraswati
VIDEO : “गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळवून देऊ”, नववर्षानिमित्त शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींनी व्यक्त केला संकल्प!
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?