इहमुक्ती

ज्ञानदेवांना मात्र या सगळ्याची अंमळ गंमत म्हणा अथवा विस्मय वाटत असावा याचे सूचन घडते आपल्याला त्यांच्या या अभंगात.

अभय टिळक agtilak@gmail.com

प्रशांत तेवणाऱ्या समईच्या वातीला वाऱ्याची झुळूक स्पर्शू नये यासाठी दक्षता घ्यायची असते ती वात तेवत असते तोवरच. एकदा का वाऱ्याचा झोत येऊन समई शांत झाली की वातीसाठी आडोसा करण्यासाठी कितीही झाकपाक केली तरी काय हशील? मुद्दा आहे की नाही बिनतोड ?.. असे काही तरी विलक्षण मार्मिक बोलतात ज्ञानदेव त्यांच्या अभंगांत अवचितच एखाद्या ठिकाणी. तुकोबाही तसेच. मेल्यानंतर आपल्याला मोक्ष मिळावा यासाठी धडपडणाऱ्यांच्या त्या खटाटोपातील वैय्यर्थ अधोरेखित करण्यासाठी ज्ञानदेव देतात हा दृष्टान्त. एरवी कमालीची हळुवार, मृदुमुलायम, सात्त्विक असणारी ज्ञानदेवांची वाणी, अशा वेळी, एकदम धारण करते सडेतोड बाणा. ‘मोक्ष मेल्या पाठीं आम्हांसी होईल। ऐसें जे म्हणतील अतिमूर्ख’ ही ज्ञानदेवांची या संदर्भातील अभंगपंक्ती म्हणजे त्याच वास्तवाचा रोकडा पुरावा. ‘मोक्ष’नामक चौथ्या पुरुषार्थाचे एकंदरीनेच सर्वसाधारण श्रद्धाळू मनाला केवढे तरी प्रचंड अप्रूप वाटत असते. जपतप, उपासतापास, तीर्थतीर्थाटन, होमहवन, मंत्रतंत्र, व्रतवैकल्ये यांची असोशी भाविक मन जोपासत राहते ते मोक्षप्राप्तीसाठीच. देह पडल्यानंतर मोक्ष मिळावा यासाठीच हा सारा साधनसंभार. ज्ञानदेवांना मात्र या सगळ्याची अंमळ गंमत म्हणा अथवा विस्मय वाटत असावा याचे सूचन घडते आपल्याला त्यांच्या या अभंगात. ‘अतिमूर्ख’ असे तीक्ष्ण विशेषण, ज्ञानदेव, त्यांखेरीज वापरते ना. एवढी सगळी साधना करूनही, मेल्यानंतर मोक्ष मिळेलच याची खातरी कोणी द्यावी? मग, देह धड आहे तोवरच मुक्तीसाठी नेटाने साधन का करू नये, असा प्रश्न विचारतात ज्ञानदेव यच्चयावत मुमुक्षूंना. ‘जंववरी देह आहे तंववरी साधन। करूनियां ज्ञान सिद्ध करा’ असा निरलस सल्ला आहे ज्ञानदेवांचा या बाबतीत सगळ्यांनाच. त्यालाही कारण आहे तसेच सबळ. ते कोणते याचा उलगडा करायचा तर उघडावा लागतो गाथा तुकोबारायांचा. आयुष्यभर केलेल्या उपासनेचे फळ म्हणून देवाकडून मोक्षाची प्राप्ती होईल, असा गोड (गैर) समज जर कोणाचा असेल तर, ‘मोक्ष देवापाशीं नाहीं। लटिक्या घांई विवळतों। काय खरें न धरी शुद्धी। गेली बुद्धी भ्रमलें’ अशा रोखठोक शब्दांत तुकोबा करतात भ्रमनिरास आपला. मोक्ष म्हणा अथवा मुक्ती, याच जन्मात याच देहाच्या माध्यमातून पदरात पाडून घेणे शक्य आहे आणि तेच करायचे असते, हाच ज्ञानोबा-तुकोबांच्या या बोलांचा इत्यर्थ. किंबहुना, ज्ञानदेवांना विचारावे तर ‘बंधन’ आणि ‘मोक्ष’ या परस्परसापेक्ष संकल्पनाच मुदलात निर्थक होत, असा खडखडीत पवित्रा ते धारण करताना दिसतात ‘अनुभवामृता’च्या पाचव्या प्रकरणामध्ये. ज्या जगात आपण राहतो ते जग हे परमशिवाचे विलसन असल्यामुळे ते वस्तुत: शुद्ध, सत्य आणि अंतिम असेच आहे. वाटय़ाला आलेले जीवन नीतीपूर्ण रीतीने जगणे हेच होय इथले अंतिम साध्यसाधन. त्यामुळे, ‘मोक्ष’ हे ठरत नाही कोणतेही गन्तव्य. तर, ‘मुक्ती’ ही होय जगण्याची एक विशिष्ट रीत. ती जीवनरीत आपल्याला शिकवतात तुकोबाशिष्या बहेणाबाई. ‘नाना परी जन कल्पिताती मोक्ष। परी तो प्रत्यक्ष नसे कोणा। वासनेच्या क्षये मोक्ष तो सापडे। तत्त्वमसे जोडे आत्महित’ हे बहेणाबाईंचे वचन म्हणजे ज्ञानदेवांच्या कथनाचा खुलासाच जणू. ‘मोक्षसाधना’ या संकल्पनेचा अर्थ आता आकळेल का आपल्याला अचूक?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak salvation zws

ताज्या बातम्या