विरळ समाधी

‘आपण साधू आहोत’ या जाणीवरूपी उपाधीचा त्याग करणे अपरिहार्यच ठरते.

अभय टिळक agtilak@gmail.com

समाजसमक्षता हे अद्वयबोधाचे उपयोजित परिमाण जसे आहे तसेच ते भागवतधर्माच्या भक्तितत्त्वाचे गाभासूत्रदेखील होय. भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या ‘संत’ या अधिष्ठानाचे प्रधान लक्षण म्हणजे संतांच्या ठायी वसणारी समाजसमक्षता. समाजाला  वगळून संत या कोटीची कल्पनाच करता येत नाही. आत्ममग्न योगी समाजमग्नही बनल्याखेरीज त्याच्या योगीपणाला परिपूर्णत्व प्राप्त होत नसते. हा दंडक प्रस्थापित करणे, हे मुक्ताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनन्यसाधारण व क्रांतिकारक असे वैशिष्टय़ ठरते. योग्याच्या योगीपणाची  परीक्षा त्याच्या लोकसंपर्काद्वारेच सिद्ध होत असते, असे निरपवाद मार्गदर्शक सूत्र निर्देशित करत ‘योगी’ या संकल्पनेच्या पारंपरिक अर्थगाभ्यात पूर्ण परिवर्तनच घडवून आणतात मुक्ताबाई ताटीच्या प्रसंगाद्वारे.  ‘योग’ आणि ‘योगी’ यांचा आशयच बदलल्यानंतर योग्यांशी संबंधित अन्य संकल्पनांचीदेखील यथोचित अशी पुनव्र्याख्या करणे हे ओघानेच येते. आत्ममग्नता सोडून समाजमग्न बनायचे तर, ‘आपण योगी आहोत. योगारूढ असल्यामुळे आपण सर्वसामान्यांपेक्षा केवळ वेगळेच नाही तर श्रेष्ठ आहोत,’ या जाणिवेचा लोप घडून येणे अनिवार्यच ठरते. साधुत्वाचा ध्यास घेतलेल्या संन्यस्ताने त्यासाठी, ‘आपण साधू आहोत’ या जाणीवरूपी उपाधीचा त्याग करणे अपरिहार्यच ठरते. सांडी कल्पना उपाधी। तीच साधूला समाधी अशा मार्मिक शब्दांत मुक्ताई नेमका तोच सूचक संदेश, ज्ञानदेवांच्या मिषाने, देतात उभ्या योगीसमुदायाला. ‘आपण साधू अथवा योगी आहोत,’ या जाणीवरूपी उपाधीचा समूूळ विलय हाच साधुत्वाचा निकष, हे ठणकावून सांगतानाच तसे निरुपाधिक अस्तित्व म्हणजेच म्रू्तिमंत समाधी, अशी ‘समाधी’ या संकल्पनेची नवव्याख्याही प्रवर्तित करतात मुक्ताई माउली. स्थळ-काळ- आसन- मुद्रा यांसारख्या बाह्य़ लौकिकातील एकाही बाबीशी ‘समाधी’ या अवस्थेचा संबंध ठेवत नाहीत मुक्ताई या नवव्याख्याद्वारे. एकासनावर एकांतात रुजते ती समाधी आत्ममग्न योग्याची. तर लोकांतामध्ये निरुपाधिक वापर हीच चिरसमाधी समाजमग्न संतयोग्याची, हेच अंत:सूत्र मुक्ताई अधोरेखित करतात या सगळ्याद्वारे. विलक्षण योगायोग म्हणा अथवा विस्मयचकित करणारी बाब म्हणा, चोखोबा विधिनिषेध भेणें न मोडे समाधी। तुटली उपाधी लिगाडाची अशा शब्दांत ‘समाधी’ या संकल्पनेची नेमकी तशीच उपपत्ती सिद्ध करतात! योग्यायोग्यता, इष्टनिष्टता, सूक्तासूक्तता यांसारख्या भेदकारक द्वंद्वाचे लिगाड आणि अशा जंजाळाच्या उपाधीपासून अस्पर्शित राहणे, याचा अर्थ ‘समाधिवस्था’ हेच अभिप्रेत आहे चोखोबारायांना या ठिकाणी. आपल्या उभ्या अस्तित्वाला सदोदित चिकटून असलेली ‘स्व’ची जाणीव लय पावली की जी अवस्था उरते तीच ‘समाधी’. ‘स्व’चा विसर पडला, की अंत:करण बनते पूर्णत: निर्द्वद्व. चित्ताला परमशुद्धी लाभते ती तशा निर्द्वद्वतेद्वारेच. ती द्वंद्वरहित अवस्था हेच समाधीचे ठरते अचल असे अधिष्ठान. कितीही लोकसंमर्द अंगावर कोसळला तरी अणुमात्रही धस लागत नसतो त्या समाधीला. चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी करण हें असे त्या समाधीचे अ -साधारणत्व वर्णन करतात चोखोबाराय. लोकांतामधील अशी समाधीवस्था अनुभवण्यास मिळणारा खरोखरच लाखांत एखादाच. चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा। जाणे तो विरळा लक्षामाजी हे चोखोबारायांचे उद्गार यथार्थच नव्हेत का!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak samadhi concept of yogi zws