आत्मनिवेदन

चारही मुक्तींच्या गाथा ही आत्मनिवेदन पर्यवसायी अभेदभक्ती डौलाने मिरवते, असे नाथराय म्हणतात ते काय उगीचच!

अभय टिळक agtilak@gmail.com

शिवरायांच्या जन्माच्या वेळी तुकोबा होते वयाच्या विशीमध्ये. तर, तुकोबांनी वैकुंठगमन केले त्यादरम्यान स्वराज्यस्थापनेचे मनसुबे साकारत होते शिवरायांच्या आंतरविश्वात. तुकोबांचे विलक्षण संवेदनशील असे तरल मन त्या सर्व भावभावनांची आंदोलने किती दक्षपणे टिपत होते याची साक्ष पुरवितात ‘पाइकी’चे त्यांनी निर्मिलेले अभंग. ‘पाईक’ या शीर्षकाखाली तुकोबांच्या गाथ्यात असणाऱ्या एकंदर ११ अभंगांची जातकुळी आगळीच आहे. साधनेच्या परमोच्च बिंदूवर स्थिरावण्यासाठी देहाच्या उपाधीचादेखील अंतिमत: त्याग करण्यास सिद्ध झालेला पाईक म्हणजे तुकोबांच्या व्यक्तिमत्त्वातील अनासक्त उपासकाचे रसरशीत प्रतीकच जणू. वीरश्री गाजवत रणांगणावर देह ठेवण्याद्वारे पाइकास लाभणारी कायामुक्ती आणि देहजाणिवेच्या पाशातून सुटत परमानंदाशी तादात्म्य पावण्याद्वारे साधकाला साधणारी सायुज्यमुक्ती तुकोबांच्या लेखी समतुल्य होत. देहाची आणि देहभावनेची सर्वोच्च उपाधी त्यागण्याचा तो एक निर्वाणीचा क्षण जिंकला, की सताड खुले बनते महाद्वार जीवनमुक्तीच्या साम्राज्याचे. ‘तुका म्हणे एका क्षणांचा करार। पाईक अपार सुख भोगी’ हे तुकोबांचे उद्गार लौकिकातील रणांगणावरील पाईक आणि पारलौकिकाच्या प्रांतातील आंतरिक संघर्षांत युद्धमान असणारा उपासक यांची समकक्षताच जणू अधोरेखित करतात. हे युद्ध लहानसहान नसते. ध्येयाप्रति असणारा भक्तिभाव त्यासाठी असावा लागतो परमशुद्ध. तर, साधनेचा वसा उतलामातला जाऊ नये यासाठी पाइकाच्या पोटी असावा लागतो अपार धीर. आंतरशुद्धी आणि अतुलनीय धैर्य ही पाईक आणि अध्यात्ममार्गी उपासक या दोघांच्याही गाठी आवर्जून असणे अगत्याचे ठरावे अशीच गुणसंपदा. तिचा आधार लाभला, की अनुभव येतो उभयतांना केवळ आणि केवळ परमसुखाचाच! ‘पाइकांनीं सुख भोगिलें अपार। शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं।।’ अशा शब्दांत तुकोबा निर्देश करतात त्याच गुणसंपदेकडे. देहजाणिवेचे कुंपण एकदा का ओलंडले की पाऊल पडते प्रदेशात तादात्म्याच्या. ‘स्वामी- सेवक’ भावाचीदेखील घडून येते परिसमाप्ती त्या आसमंतात. सगळा प्रांतच अभेदाचा. द्वंद्वाला वावच नाही तेथे अणुमात्रही. ‘तृणवत तनु सोनें ज्या पाषाण। पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी’ अशा अनुपम शब्दकळेद्वारे तुकोबा वर्णन करतात त्या विराट सामरस्याचे. स्वामीच्या अधिष्ठानावर स्थिर होत स्वामीशी पूर्णत: ऐक्य पावणे, हा पाइकाच्या अवघ्या साधनेचा ठरतो चरमबिंदू. नवविधा भक्तीच्या प्रांतात याच अवस्थेला म्हणतात, ‘आत्मनिवेदन’! ही नववी भक्ती म्हणजे संपूर्ण समर्पण. ‘तूं माझा स्वामी मी तुझा रंक। पाहता न दिसे वेगळिक। मी तूं पण जाऊंदे दुरी। एकाचि घोंगडें पांघरुं हरी’ अशा शैलीत ज्ञानदेव महिमा गातात त्या अद्वयपरिणत आत्मनिवेदनाचा. या अवस्थेलाच नाथराय म्हणतात, ‘अभेदभक्ती’. एकाच तत्त्वाची दर्शनानुभूती सर्वत्र सदासर्वकाळ येणे, ही ठरते हुकमी खूण अशी अभेदभक्ती परिपूर्ण हस्तगत झाल्याची. ‘भगवद्भाव सर्वाभूतीं। यां नांव गा ‘अभेदभक्ती’। हे आकळल्या भजनस्थिती। अहंकृती उरेना’ अशा शब्दांत गातात नाथराय श्रीमंती अभेदभक्तीची. चारही मुक्तींच्या गाथा ही आत्मनिवेदन पर्यवसायी अभेदभक्ती डौलाने मिरवते, असे नाथराय म्हणतात ते काय उगीचच!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak self expression devotion zws