अभय टिळक agtilak@gmail.com

भक्ती आणि शक्ती यांचे नाते मोठे वैशिष्टय़पूर्ण होय. शक्ती असल्याखेरीज मुदलात भक्ती घडणे अशक्यच. वर्धमान महावीरांच्या बोधाचा तोच तर गाभा. आंतरशत्रूंवर विजय मिळवण्यासाठी जो अतोनात संघर्ष अभ्यासकाला करावा लागतो  त्यासाठी गरज असते अपार सामर्थ्यांची. तर, निरलस भक्तीसाधनेद्वारे प्राप्त होणाऱ्या आंतरिक बळाच्या आधारेच साधनापथावरील मार्गक्रमण अबाधित राखता येते साधकाला. इथे, साधना पारलौकिकाची आहे की लौकिकाची हा मुद्दा गौण ठरतो. एकविध अभ्यासाच्या पर्वादरम्यान शारीरिक उपाधींकडे दुर्लक्ष करणे भागच असते विद्यार्थ्यांला. भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास ही तुकोक्ती निर्देश करते त्याच चिरंतन वस्तुस्थितीकडे. एकसारखाच निकराचा लढा द्यावा लागतो भक्तांना आणि पाईकांनाही. भक्त आणि पाईक यांचे आंतरिक नाते हे असे व इतके सरळ आणि नैसर्गिक आहे. किंमत मोजावी लागते दोघांनाही त्यासाठी. हेदेखील एक प्रकारचे सख्यच. मधुर अशा भक्तिव्यवहाराची लज्जत चाखण्यासाठी एकल असणारे परतत्त्वच ‘भक्त’ आणि ‘भगवंत’ अशी दोन स्वायत्त रूपे धारण करून अवतरते आणि भक्तिसुखाचा आस्वाद घेते, ही होय ‘भक्ती’तत्त्वाची अद्वयाच्या प्रांतातील उपपत्ती. तर, पाईक आणि त्याचा स्वामी यांच्यादरम्यान नांदणाऱ्या ‘सेवक-स्वामी’भावातील गोडवा अनुभवण्यासाठी एकच एक असणारे ‘शिव’तत्त्वच ‘पाईक’ आणि त्याचा ‘स्वामी’ या दोन रूपांनी खेळते, असे ज्ञानदेवांचे त्या संदर्भातील प्रतिपादन. एकुचि एकला जाला पैं दुसरा। एकमेकी सुंदरा खेळविती हा ज्ञानदेवरचित ‘पाइकी’च्या अभंगातील चरण दाखला देतो नेमक्या त्याच भूमिकेचा. पारलौकिक साधनेच्या प्रांतात अंतर्गत शत्रूंशी दोन हात करणारा भक्त आणि लौकिकातील समरांगणात स्वामीवर पडणारे वार आपल्या अंगावर झेलणारा सैनिक या उभयतांच्या अंत:करणात नांदणाऱ्या सख्यभक्तीची जातकुळी एकच हेच तत्त्व ठसवतात ज्ञानदेव, नाथ आणि तुकोबाराय. त्या अजोड सख्याचा स्वामीवर पडणारा प्रभाव एकएकेंविणें स्वामीसेवकपणे। मिरविती हे खूण स्वामी जाणे अशा शब्दांत मांडतात ज्ञानदेव. रणांगणात तळपणारा पाईक आणि आपण स्वत: अभिन्न असल्याची जाण खुद्द स्वामीलाच पुरेपूर असते, असे समीकरण सिद्ध करतात ज्ञानदेव या संदर्भात. स्वामी आणि सेवक, भक्त आणि भगवंत, राजा आणि पाईक यांच्या दरम्यानचे हे सख्यत्व सूर्य आणि त्याचे किरण यांच्यामधील नात्याच्या कोटीतील होय, असा सांगावा नाथराय देतात ज्ञानदेवांना अनुसरत. ‘एकनाथी भागवता’च्या १९व्या अध्यायात नाथांनी त्यासाठी शब्दचित्र रेखाटलेले आहे ते उद्धव आणि कृष्ण यांच्या मृदुगोड संवादाचे. भक्तिप्रधान भागवतशास्त्राचे मर्म श्रवण करतेवेळी भावविभोर उद्धवांना भान आवरत नाही एवढेच केवळ नाही तर, ते कथन करताना उचंबळून आलेल्या खुद्द कृष्णपरमात्माची अवस्था हांव न बाणेचि दों करीं। मग चारी भुजा पसरी। उद्धवातें हृदयावरी। प्रीतीं थोरीं आलिंगीं अशा विलक्षण रसमय शैलीत वर्णन करतात नाथराय. परस्परांच्या प्रगाढ मिठीमध्ये विसावतात दोघेही बराच काळ. बाह्य़ अलिंगन सुटले तरी उभयतांमधील आंतरिक अभिन्नत्व अभंग असल्याचे प्रतिपादन सूर्यापासूनि फांकती किरण। तेसें सुटलें आलिंगन। कृष्ण उद्धव जाहले भिन्न। परी अभिन्नपण मोडेना अशा मोठय़ा प्रत्ययकारी शब्दकळेद्वारे करतात नाथराय. सख्यभक्तीचे हे होय आगळे दर्शन!