– अभय टिळक agtilak@gmail.com
निव्वळ शब्द म्हणजे भाषा नव्हे. ते तर होय भाषेचे मूलद्रव्य. भाषेद्वारे प्रगटन होत असते संस्कृतीचे. साहजिकच, उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांमधून व्यक्त होतात बोलणाऱ्याच्या मनबुद्धीवर झालेले संस्कार. संतपरंपरेने तुमचा-आमचा लोकव्यवहार संस्कारित केलेला आहे, अशी आपली धारणावजा श्रद्धा आहे. परंतु, आपला भाषाव्यवहार त्याची पोचपावती देतो का? या संदर्भात विनोबाजींची साक्ष काढणे उद्बोधक ठरेल. ‘ज्ञानेभरी’संदर्भात विनोबाजींनी अनेक वर्षांपूर्वी नोंदविलेल्या एका निरीक्षणानुसार, ‘‘आपल्याकडे मराठीत जी भाषा रूढ झाली आहे, ती अगदी प्रखर, हाणून पाडणारी, मारक, बोचक, दाहक अशी आहे. ज्ञानदेवांचा शब्द कसा पडतो आणि आमचा शब्द कसा पडतो ते पाहा. ते किती सौम्य शब्द काढीत असतात आणि विषयाची मांडणी दुसऱ्याला यित्कचितही क्लेश होणार नाही अशा कुशलतेने कशी करतात ते पाहण्यासारखे आहे..’’ किती मार्मिक बोलतात पाहा विनोबाजी. अंतर्मुख होऊन विचार केला तर ध्यानात येईल की, विनोबाजींचा सारा रोख इथे दिसतो तो शाब्दिक हिंसेकडे. संतविचार आणि मूल्यांचा प्रदीर्घ वारसा लाभलेल्या मराठीच्या व्यावहारिक स्वरूपामध्ये बोचरी प्रखरता कशामुळे फोफावली असावी, असा प्रश्न पडतो विनोबाजींना. संतांच्या वारशाद्वारे भाषेचे शाब्दिक रूप जपले जाणे आणि शब्दांच्या माध्यमातून प्रगट होणाऱ्या अंतर्मनाचा पोत संतप्रवर्तित मूल्यांच्या अभिसिंचनाद्वारे पालटणे या दोहोंत महदंतर नांदत असल्याची सखोल खंतच व्यक्त होते विनोबाजींच्या निरीक्षणाद्वारे. शारीरिक पातळीवर घडणाऱ्या हिंसेपेक्षाही वाचिक हिंसा अधिक सूक्ष्म परंतु अपरिमित हानी पोहोचविणारी असते. ज्ञानदेवांचा दाखला द्यायचा झाला तर, जें बीज भुई खोविलें। तेंचि वरी रूख जाहलें। तैसें इंद्रियद्वारीं फांकलें । अंतरचि या न्यायाने मुळात हिंसेची भावना मनोभूमीत तरारू न अंकुरते आणि मगच वाणीद्वारे साकारते. हिंसेचे बीजारोपण घडले की यथावकाश तिचे रूपांतर महावृक्षामध्ये घडून येणारच. मनामध्ये ठाण मांडण्यास हिंसेला अवसरच मिळू द्यायचा नाही, हा होय ज्ञानदेवप्रणीत अहिंसायोग. पैं मानसींच जरी। अहिंसेची अवसरी। तरी कैंची बाहेरी। वोसंडेल असा बिनतोड सवाल विचारतात ज्ञानदेव या संदर्भात. महात्मेनि प्रियवक्तेय होआवें हे चक्रधरस्वामींचे वचन अभ्यासले की त्यांचे ज्ञानदेवांशी या बाबतीत असणारे प्रगाढ साम्य प्रकर्षांने प्रतीत होते. पद्मनाभीदेव नावाचा स्वामींचा एक शिष्य होता. परमाणुभवदेव नामक एका अन्यपंथीय विभूतीचा उपहास घडला पद्मनाभीदेवाच्या मुखाने. त्यांवर, हा प्राणियाचें चैतन्य पोळउनि आला असे : आतां एथौनि याचें मुख न पाहिजे हे चक्रधरस्वामींचे उद्गार शाब्दिक हिंसेसंदर्भातील त्यांचा कठोर कटाक्षच निर्देशित करतात. इथे ‘चैतन्य’ या संज्ञेने स्वामींना अभिप्रेत होय परमाणुभवदेवांचे हृदय. आपल्या शिष्याने अन्य कोणा संन्याशाचे हृदयदाहक वचनांनी पोळून काढावे, ही बाब चक्रधरस्वामींना वेदनादायक ठरली. वाचिक हिंसेच्या तीव्र निषेधाचा हाच वारसा पुढे चालवितात ज्ञानदेव. आणि जगाचिया सुखोद्देशें।    शरीरें वाचा मानसें । राहाटणें तें अहिंसें । रूप जाण ही ‘ज्ञानदेवी’च्या १६व्या अध्यायातील ज्ञानदेवांची ओवी अहिंसेची शारीरिक, वाचिक आणि मानसिक अशी तीनही परिमाणे अधोरेखित करते. विनोबाजींनी मुखर केलेली खंत आता तरी आपल्याला भिडावी.