परमहंस

१०वे- ११वे शतक हा त्यांचा  काळ मानला जात असला तरी त्यांच्या संदर्भातील नि:संदिग्ध तपशीलांचा सर्वत्रच अभाव दिसतो.

अभय टिळक agtilak@gmail.com

‘परमहंस’ हे पद सर्वार्थाने शोभते गोरक्षनाथांना. परमहंस तरी जाणे सहज वर्म। तेथें याती धर्म कुळ नाहीं अशा वैशिष्टय़पूर्ण शब्दकळेने मंडित करतात तुकोबाराय ‘परमहंस’ हे अधिष्ठान. निरपवाद भेदातीत अशीच अस्तित्वाची ती परी होय. गोरक्षनाथांचा उभा जीवनक्रम म्हणजे त्या अवस्थेचा आदर्श वस्तुपाठच जणू. कार्तिक शुद्ध त्रयोदशी हा गोरक्षांचा प्रगटदिन. १०वे- ११वे शतक हा त्यांचा  काळ मानला जात असला तरी त्यांच्या संदर्भातील नि:संदिग्ध तपशीलांचा सर्वत्रच अभाव दिसतो. ‘‘गुणसंचित, रूपसंचित असे अक्षरत्व म्हणजे गोरक्षनाथ’’, हेच त्यांचे स्वरूपवर्णन सार्थ ठरावे. ज्ञानदेवांशी सांप्रदायिक परंपरेने तत्वदर्शनात्मक नाते जडलेल्या गोरक्षांच्या लौकिक कार्यकर्तृत्वाशी नाळ जुळते ती मात्र नामदेवरायांची. शैवपंथीयांच्या एकत्रीकरणाचे  कार्य सिद्धीस नेले गोरक्षनाथांनी. तर, ज्ञानदेवांनी पायाभरणी केलेल्या भागवतधर्मरूपी मंदिराच्या प्रांगणात सर्व वर्ण-समाज-शाखा-परंपरांमधील संतत्व गोळा करण्याचे अलौकिक कार्यकर्तृत्व नामदेवरायांचे. जेणें हे घातली मुक्तीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची या शब्दांत ज्ञानदेवांचा कार्यमहिमा वर्णन करताना तुकोबारायांनी प्रगल्भपणे त्यांत सूचन गुंफलेले आहे ते नामदेवरायांच्या योगदानाचे. मुक्तीचा घास समाजातील सर्वांच्याच मुखी लागावा यासाठी गीताबोधाचे अन्नछत्र मांडणाऱ्या ज्ञानदेवांच्या सोनपिंपळाखाली वैष्णवांचा मेळा गोळा होण्यात प्रेरणा आहे ती नामदेवरायांची. चिकाटीने, सहनशीलतेने योगविषयक ज्ञानाचा प्रचार—प्रसार जीवनभर केला गोरक्षनाथांनी. तर, उत्तरायुष्यातील किमान दोन ते अडीच दशके खर्ची घालत उत्तर भारतातील संतत्वाचे आणि स्थानिक समाजपुरुषाचे वैचारिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक-धार्मिक भरणपोषण घडवत राहिले नामदेवराय. सर्व स्तरांतील जनसमूहांशी थेट संबंध प्रस्थापित करत निखळ मानवतावादाचे संस्कार जनमानसावर घडविण्यासाठी गोरक्षनाथांची भ्रमंती अखंडित चालू राहिली. तर, कर्मकांडांत जखडलेल्या नि:सत्व धर्मचौकटीमध्ये मानवतावादाचे सत्व प्रस्थापित करत प्रबोधनाच्या आद्य पर्वाची पायाभरणी केली नामदेवरायांनी. जातिधर्मवर्णातीत जीवनदृष्टीने समाजमन सिंचित करण्यासाठी लोकभाषेचा अंगीकार, उन्नयन आणि पुरस्कार गोरक्षांनी हिरिरीने केला. तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मऱ्हाटियां केली शब्दसोपानें । रचिलीं धर्मनिधानें । निवृत्तिदेवें या ज्ञानदेवांच्या कथनामध्ये थेट पडसाद ऐकू येतात गोरक्षनाथांकडून संक्रांत झालेल्या त्या प्रेरणेचेच. ज्ञानदेवांकडून प्रवाहित बनलेली नाथसंप्रदायाची परंपरा आणि नामदेवरायांनी विलक्षण गतिमान बनविलेला विठ्ठलोपासनेचा प्रवाह यांचा रम्य संगम घडून येण्याच्या सुवर्णयोगाची बैसकादेखील सिद्ध केलेली दिसेल गोरक्षनाथांनीच. श्रीविठ्ठल हे बालकृष्णाचे उत्तरावतारातील रूपावतरण, ही भागवतधर्मी वारकरी धारणा. नाथसांप्रदायिक शिवोपासनेची धारा कृष्णरूपातील विष्णुतत्वाशी एकरूप करण्याची आद्य प्रेरणा निवृत्तिनाथांना गहिनीनाथांकडून लाभली. परंतु, कृष्णोपासनेची अंतर्खुण प्रत्यक्ष गोरक्षांकडूनच हस्तगत झाल्याचा दाखला निवृत्ति गयनी कृष्ण जप तो अमुप जाण । सांगितली खूण गोरक्षानें इतक्या नितळ शब्दांत स्पष्ट करतात निवृत्तिनाथ. स्थूल दृष्टीला दिसणारे विश्व म्हणजे नाथसंप्रदायाचे अधिष्ठान असणाऱ्या शिवाच्या अंत:करणात चिरंतन ठाण मांडलेल्या कृष्णतत्वाचाच आविष्कार होय, असे निवृत्ति स्वरूप कृष्णरू प आप  विश्वीं विश्वदीप आपरूपें अशा अनुभूतीपूर्ण शब्दांत विशद करत निवृत्तिनाथ सूचन घडवितात ते विष्णू-शिवाच्या अद्वयाचेच. परमहंस गोरक्षांशी जडलेले भागवतधर्माचे नाते असे बहुपदरी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article author abhay tilak worship of krishna zws

Next Story
नित्य-नूतन
ताज्या बातम्या