– अभय टिळक agtilak@gmail.com

सीमोल्लंघन हा तर विजयादशमीच्या सणाचा गाभा. सर्व मर्यादांची कुंपणे ओलांडून दशदिशांनी आगेकूच करण्याच्या प्रेरणोत्सवाचा आरंभबिंदू म्हणजे दसरा. पहिल्या भासापासूनच आपल्या उभ्या अस्तित्वाला दरुलघ्य आणि अव्यक्त, अदृश्य कुंपण पडलेले असते ‘स्व’च्या संकुचित जाणिवेचे. ओलांडण्यास सर्वाधिक दुष्कर असेच हे बंधन. भेदू म्हणता भेदता येत नाही. ‘आप-पर’ भावाच्या स्वयंपोषित संकुचित पायावर उभ्या राहिलेल्या द्वंद्वद्वैताच्या भिंती जमीनदोस्त करण्याची लढाई ज्या दिवशी आपण जिंकू त्या दिवशी साजरी व्हावी खरीखुरी ‘विजया’दशमी. ते युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असते अमाप बळ. विवेकाला ज्यांचा आसरा आवर्जून घ्यावासा वाटतो अशा संतविभूती म्हणजे, आंतरिक विश्वामध्ये साकारावयाच्या त्या सीमोल्लंघनासाठी आवश्यक असणाऱ्या आत्मबळाचा अक्षय स्त्रोतच जणू. आंतरिक स्थित्यंतराद्वारे संतांच्या भेटीची परिणती दसऱ्याच्या विजयोत्सवामध्ये कशी घडून येते याचा उलगडा आलिंगने सुख वाटे। प्रेम चिदानंदी घोटे। हर्षे ब्रह्मांड उतटें । समूळ उठे ‘मी’ पण अशा मोठय़ा ऊर्जस्वल शब्दांत घडवतात ज्ञानदेव आपल्याला. आपण कोणी तरी स्वायत्त, वेगळे, विशेष आहोत या जाणिवेच्या परिपुष्ट झालेल्या (वास्तवात, आपणच धष्टपुष्ट बनविलेल्या) बैठकीवर मांड ठोकून बसलेला असतो आपला चिवट अहंकार. संतबोधाशी एकदा का मनोमन गळाभेट झाली की, आत्मकेंद्री अशा त्या क्षुद्र जाणिवेच्या चौरंगासकट विसर्जन होते ‘अहं’च्या स्फुरणाचे, हा होय ज्ञानदेवांच्या या कथनाचा गाभासंदेश. संतभेटीची ही फलश्रुती आहे अपेक्षित ज्ञानदेवांना. हे ज्या दिवशी घडेल तोच दिवस दसरादिवाळीचा, मग, पंचांगात लौकिकार्थाने तिथी कोणतीही का असेना! दसरा दिवाळी तोचि आम्हां सण। सखे संतजन भेटतील ही तुकोक्ती सूचन घडवते त्याच संकेताचे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चित्तचतुष्टय़ाचा पोत आरपार बदलणारे असेच असते हे सीमोल्लंघन. ज्ञाताच्या सीमेमध्येच संचार करत असताना मनाने टिपलेल्या अनुभवांनी भरत राहते आपल्या चित्ताची पोतडी. त्यालाच आपण नाव देतो ‘ज्ञाते’पण. ही जाणीव म्हणजेही पुन्हा अहंकाराचेच एक गोंडस रूप. मात्र, विवेकमूर्ती संताच्या आलिंगनाद्वारे विवेकाचा एकदा का स्पर्श झाला मनबुद्धीला की क्षण उगवतो सीमोल्लंघनाचा. तिथवर सान्ताच्या मर्यादेतच घुटमळणारे मन त्या बिंदूवरून उड्डाण घेते ते थेट अनंताच्या साम्राज्यात. त्या भूमीचे सार्वभौमत्व भूषविणारे परतत्व, तशा परिपक्व साधकाला मग, बहाल करते ऐक्याचे सिंहासन. कृपाकटाक्षें न्याहाळिलें। आपुल्या पदीं बैसविलें। बापरखुमादेविवरें विठ्ठलें । भक्ता दिधलें वरदान अशा दिव्य शब्दांत ज्ञानदेव वर्णन मांडतात त्या अ-लौकिक सीमोल्लंघनांती साजऱ्या होणाऱ्या सामरस्याभिषेकाचे. नवविध भक्तीच्या मनोभावे मांडलेल्या नवरात्राची ही होय सफळ परिपूर्ती. पूर्ण निरामय, अभेद, निर्द्वद्व असे ते अस्तित्व. ‘स्वामी-सेवक’ भावाचा विलय घडतो तिथे एवढेच केवळ नाही तर, आपले ‘स्वामी’पदच स्वामी बहाल करतो पाईकाला. तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता अशा उल्हासभरित शब्दांत तुकोबा गातात ती ऐक्यानंदस्थिती. एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहात ध्वनी गगन गर्जे ही होय त्या सिंहासनारोहणाची गाजती-गर्जती घोषणा. अशा त्या अ-लौकिक सीमोल्लंघनाचे आणि अ-साधारण विजयादशमीचे वैभव अधिक काय वर्णावे!