अद्वयबोध : दूण अभेदासी..

निखळ घरगुती संस्कार असलेल्या लग्नविधीचे रूपांतर ‘डेस्टिनेशन मॅरेज’मध्ये घडून आले आणि सगळे कसे बदलूनच गेले.

– अभय टिळक

निखळ घरगुती संस्कार असलेल्या लग्नविधीचे रूपांतर ‘डेस्टिनेशन मॅरेज’मध्ये घडून आले आणि सगळे कसे बदलूनच गेले. पंगती गेल्या आणि त्यांची जागा घेतली ‘बुफे’ने. जेवण्याची केवळ पद्धतच बदलली असे नाही तर खाद्यपदार्थाचे रंगरूपही आरपार पालटून गेले. गरम भाताची मूद, वर पिवळेधम्मक वरण, तुपाची धार, बटाटय़ाची भाजी, अळूची पातळ भाजी, चटणी, कोशिंबीर, मसालेभात, जिलबी, वाटीत मठ्ठा, हा ठरलेला आखीवरेखीव बेत हळूहळू मागे पडत गेला. पंगतीमधील जेवणावळी क्रमाने हिरवळीवरील ‘बुफे’मध्ये रूपांतरित झाल्या आणि खाद्यपदार्थामधील वैविध्य एकदम वाढलेच. एकीकडे चाट, दुसरीकडे सूप्स, तिसरीकडे स्टार्टर्स, एक कोपरा चायनीज् खाद्यपदार्थाचा तर अनेक स्टॉल्सवर पंजाबी डिशेसची रेलचेल. निव्वळ सॅलेड्सचेच पाच—सहा प्रकार. बैठय़ा पंगतीमधील पानांमध्ये आग्रहाने रचली जाणारी जिलब्यांची चळत विस्मरणात गेली खरी पण त्यांची जागा पटकावली ती तीन ते चार प्रकारचे स्वीट्स आणि आइस्क्रीम्स यांनी. या सगळया परिवर्तनाला आपणही सगळे इतक्या चट्दिशी सरावलो की पूर्वीच्या पंगती आता आठवतदेखील नाहीत. बुफेने खाद्यपदार्थाच्या संख्येबरोबरच त्यांच्यामधील वैविध्यही वाढवले..आणि पट्टीचे खाणारे भलतेच खूष झाले. का नाही होणार? जितके पदार्थ अधिक तितके जिव्हालालौल्यही अधिक. रुचिवैचित्र्याला मुबलक वाव. ‘व्हरायटी’ जेवढी अधिक तितकी ताव मारण्यातील लज्जतही अधिकच. पण हे सुख कोणाला..तर, तब्येतीने आडवा हात मारणाऱ्याला. इतरांना त्याचे काय! या सगळ्यांतील अंत:सूत्र ध्यानात आले का? खाद्यपदार्थामधील वैविध्य वाढले, एक पदार्थ दुसऱ्यासारखा नाही, एका पदार्थाची चव दुसऱ्याला नाही. म्हणजेच, वाढत्या विविधतेद्वारे भेद वाढला आणि ज्या प्रमाणात भेद वाढला त्या प्रमाणात जेवणातील आनंदही वाढला. असा हा शतगुणी वाढलेला भोजनानंद आकंठ भोगण्यासाठी चवीने चांगला पट्टीचा जेवणारा हवा. आपल्या जगण्याचेही असेच आहे. जगात पदोपदी भेद आहे. पण अद्वयाची दृष्टी एकदा का लाभली की वाढत्या भेदाबरोबर जगण्यातील लज्जतही वाढतच जाते. एकच तत्त्व अनंतरूपांनी नटलेले आहे, ही अनुभूती एकदा का अंत:करणात स्थिरावली की प्रत्येक रूपात त्याचे दर्शन घेण्याची असोशी मनाला व्यापून उरते. मग, जगातल्या वैविध्याबद्दल, त्यांत अनुस्यूत असणाऱ्या भेदाबाबत तक्रार करण्याची मानसिकता पार मावळून जाते. जगातील वैविध्य आपण ‘एन्जॉय’ करायला लागतो. खाद्यपदार्थामधील वैविध्यापायी जसा जेवणाचा आनंद वाढतो त्याच न्यायाने विश्वातील भेदापायी जगण्याची आपली चवही द्विगुणित होत राहते. बुद्धीला एकदा का अद्वयबोधाचा स्पर्श झाला की हे परिवर्तन सहज साकारते. ‘अमृतानुभवा’त ज्ञानदेव परोपरीने हेच तर आपल्याला सांगत आहेत. द्वैत दशेचे अंगण । अद्वैत वोळगे आपण । भेदू तंव तंव दूण । अभेदासी ।। अशा शब्दांत ज्ञानदेव जगण्याचे हेच सूत्र मांडतात. यांतील प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. ‘दूण’ म्हणजे ‘दुप्पट’. बे दुणे चार, चार दुणे आठ..असे पाढे पाठ करतच तर आपण मोठे झालो. ‘दशा’ म्हणजे ‘अवस्था’ अथवा ‘स्थिती’. ‘वोळगणे’ म्हणजे ‘लगटणे’, ‘भिडणे’ अथवा ‘आश्रय’ करू न राहणे. द्वैताच्या आश्रयानेच अद्वैत नांदत असते. ते जाणण्याची दृष्टी तेवढी आपल्यापाशी हवी. बुद्धीला ते डोळे लाभतात अद्वयाची नजर लाभली की. ‘दशा’ या शब्दाचा एक अर्थ ‘बुद्धी’ असाही आहे. द्वैताला बिलगूनच असलेले अद्वैताचे अस्तित्व एकदा का बुद्धीच्या अनुभूतीला आले की भेदाच्या भावनेचे रूपांतर अभेदाच्या जाणिवेमध्ये होत राहते. भवतालातील भेद जितका अधिक तितकी ती जाणीव बळकट आणि प्रगल्भ बनू लागते. अनंत रूपे अनंत वेषें देखिला म्यां त्यांसी । बापरखुमादेविवरू खूण बाणली कै सी ।। या ज्ञानदेवांच्या उद्गारांमधील आशय आहे तो नेमका हाच. ही खूण मनोमन बाणण्यासाठी जे करावे लागते त्यालाच म्हणतात साधना.

agtilak@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article by abhay tilak abn

ताज्या बातम्या