सुख-समाधान

देवाची ते खूण आला ज्याच्या घरा। त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा। ही तुकोक्ती म्हणजे त्याच अंतर्खूणेचे शब्दरूप.

– अभय टिळक agtilak@gmail.com
गोकुळामध्ये रमणारा बाळकृष्णच पुढे पंढरीक्षेत्रामध्ये पुंडलिकरायांसाठी विटेवर उभा ठाकला, ही भागवतधर्मी संतमंडळाची दृढ श्रद्धा तुकोबांनी विठ्ठलाच्या एका ध्यानविशेषाद्वारे गाथेत पहिल्याच अभंगात स्पष्टपणे सूचित केलेली आहे. समचरणदृष्टि विटेवरी साजिरी। तेथें माझी हरी वृत्ति राहो। हे त्या अभंगाचे पहिले चरण. विटेवर विसावलेल्या समचरणांद्वारे आणि विश्वाकडे रोखलेल्या समदृष्टीद्वारे तो पंढरीश, त्याच्या पूर्वावतारामध्ये- द्वापारयुगात बाळकृष्णरूपाने गोकुळात काल्यातून प्रसृत केलेल्या समताबोधाचे स्मरण आजच्या कलियुगात जागवितो आहे, हेच जणू तुकोबाराय सुचवतात. हंडय़ा फोडून काला वाटण्याद्वारे लोकव्यवहारात समता प्रस्थापित होणे भागवतधर्माला कसे अभिप्रेत आहे याचा हा दाखला. पांडुरंगाच्या चरणांवर मस्तक ठेवल्यावर, तुझ्या समचरणांद्वारे दिग्दर्शित होणारी समता हा माझ्या वृत्तीचा चिरंतन भाव बनो, हेच मागणे विठ्ठलापाशी मागायचे असते असा सांगावा तुकोबा समाजपुरुषाला देत आहेत. द्वैतभावामधून उमलणाऱ्या द्वंद्वाचे निराकरण ही ठरते समतेची पूर्वअट. गोकुळाष्टमीच्या दिवशी अगत्यपूर्वक सेवन केलेला काला पचनी पडून अंगी लागल्याची तीच ठरते अंतर्खूण. आचरण समतापूर्ण बनणे हे कृष्णभेटीचे एकमेव गमक. देवाची ते खूण आला ज्याच्या घरा। त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा। ही तुकोक्ती म्हणजे त्याच अंतर्खूणेचे शब्दरूप. ‘मन नावाचे इंद्रिय ज्याला लाभलेले आहे तो मानव’, अशी ‘माणूस’पणाची एक व्याख्या केली जाते. आणि, आवड-निवड, स्वीकार-धि:क्कार, होकार-नकार ही द्वंद्वात्मकता हा तर मनाचा स्थायिभाव. ‘आप-पर’ भावनेचे बीजारोपण घडून येत राहते नेमक्या याच द्वंद्वभूमीत. एकमात्र परतत्त्वच सर्वत्र अंतर्बा विलसत आहे, या अद्वयबोधावर स्थिर होणे ही काल्याचे कवळ मुखी घातल्याची फलश्रुती. देवाची भेट झाल्याची पावतीही तीच. तीच ठरते खूण साक्षात्काराची. देवाची ते खूण करावें वाटोळें। आपणा वेगळें कोणी नाहीं। हे तुकोबांचे कथन निर्देश करते अद्वयबोधाद्वारे आंतरिक विभात साकारणाऱ्या अवस्थांतराकडे. हे स्थित्यंतर तोंडाने सांगता येत नाही. शब्दात मावतच नसते ते. अंतर्विश्वातील त्या परिवर्तनाची चिन्हे उमटत असतात शरीरावर. चिन्हे उमटती अंगीं। शकुना जोगीं उत्तम। अशा शब्दकळेद्वारे तुकोबा व्यक्त करतात ते वास्तव. कृष्णतत्त्वाने अस्तित्वाचा घेतलेला ठाव वृत्तिसहित इंद्रियें परतलीं। कृष्णरूपीं मिळोनियां गेलीं। अशा प्रकारे शब्दबद्ध करतात नामदेवराय. भेदाच्या आणि त्यांद्वारे फोफावणाऱ्या द्वंद्वात्मकतेच्या प्रांतातून मनादिक सारी इंद्रिये विनासायास एकदा का परत फिरली की जिकडे पाहावे तिकडे प्रदेश दिसतो साकल्याचा आणि समतेचा. तिथे थाराच उरत नाही मग विषमतेला. समूळ उच्चाटन घडून आले विषमतेचे की प्रत्यय येतो प्रगाढ शांतीचा. अशा त्या शांतीलाच पारमार्थिक परिभाषेत म्हणतात ‘समाधान’. ते चिरंतन समाधान ही तर मनाची सर्वोच्च संपत्ती. कृष्णतत्त्वाच्या प्राप्तीद्वारे स्वामी बनता येते त्या संपदेचे. समता, शांती, समाधान या सगळ्या गोष्टी केवळ पारलौकिकाच्या प्रांतापुरत्याच प्रस्तुत ठरतात काय? आपले या जगातील रोजचे जगणे किमान निरामय होण्यासाठी त्यांची गरज नाही, असे कोणी तरी म्हणू शकेल काय? द्वंद्वनिवृत्ती, तिच्याद्वारे वाटय़ाला येणारी शांती व समाधान केवळ आणि केवळ कृष्णसुखाद्वारेच शक्य बनते, हेच तर, दिसे तया आप परावें सारिखें। तुका ह्मणे सुखें कृष्णाचिया। अशा शब्दांत सांगत आहेत तुकोबाराय.

 

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta advayabodh article by abhay tilak satisfaction happiness zws

Next Story
काला
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी