आनंदभुवन

बंधनेच नाहीत तिथे कोणतीही. जातपात-धर्म-वर्ण-देश-प्रांत सारेच भेद ठरतात तिथे अप्रस्तुत.

– अभय टिळक agtilak@gmail.com
‘‘पावलों पंढरी वैकुंठभुवन। धन्य आजि दिन सोनियाचा।’’ – पंढरीनगरीमध्ये पाऊल घातल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडलेले हे उत्स्फूर्त उद्गार! संतांच्या संगतीने, संतांच्या वचनांचे प्रेमाने गायन करत संतांच्या माहेरात आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी दाखल होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याची भावनाही असते नेमकी अशीच. भूवैकुंठ गणले जाणारे पांडुरंग क्षेत्र म्हणजे मूर्तिमंत आनंदभुवन. ‘‘धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान। आनंदें भवन गर्जतसे।’’ असे दृश्यमय शब्दचित्र रेखाटतात तुकोबाराय आषाढ शुद्ध दशमी आणि एकादशीस नामानंदात अंतर्बाह्य़ न्हाऊन निघणाऱ्या पंढरीक्षेत्राचे. भेदाभेदाची काजळी पार झटकली जाणे ही नामचिंतनाद्वारे अंत:करण निर्मळ झाल्याची रोकडी खूणच जणू. अशा विमल चित्तामध्ये वसत असतो केवळ निरामय आनंद. सुखप्राप्ती ही निष्पत्ती त्या व तशाच आनंदाची. ‘‘अवघी हें पंढरी सुखाची वोवरी। अवघ्या घरोघरीं ब्रह्मानंद।’’ असा निर्वाळाच आहे नामदेवरायांचा. वैकुंठामध्येच मिळू शकणाऱ्या सुखानंदाची प्राप्ती विश्वातील प्रत्येक अस्तित्वाला घडावी याचसाठी आटापिटा केला पुंडलिकरायांनी. वैकुंठप्राप्ती म्हणजे काही साधीसुधी बाब नव्हे. त्यासाठी करावे लागतात तपसायास. ‘कुंठा’ म्हणजे ‘आडकाठी’ किंवा ‘अवरुद्धता’. जिथे कोणताही व कसलाही अडथळा अस्तित्वातच नसतो, तशा स्थानाला म्हणावे ‘वैकुंठ’! अशी समग्र मुक्ती लौकिक जीवनात हस्तगत करणे अवघडच. मुक्तीकडे घेऊन जाणारी पायवाट म्हणजेच भूवैकुंठ पंढरी, अशी संतमेळ्याची धारणा- ‘‘तुका म्हणे सोपी केली पायवाट। पंढरी वैकुंठ भूमीवरी।’’ अशा शब्दांत मुखर करतात तुकोबाराय. भागवत धर्माला अभिप्रेत भक्तितत्त्वाचा गाभा असणारी सर्वसमावेशकता अशी प्रगट होते पुंडलिकरायांच्या कृतीद्वारे, असे प्रतिपादन आहे तुकोबारायांचे. तपसायासांचे पहाड फोडून वैकुंठ जवळ करणे ज्यांना शक्य नाही, अशांसाठी उभ्या पृथ्वीलाच भूवैकुंठ बनविण्याचे महत्कार्य साकारले पुंडलिकरायांनी. खरा आनंद साठवलेला असतो सर्व प्रकारच्या मुक्ततेमध्येच. बंधनेच नाहीत तिथे कोणतीही. जातपात-धर्म-वर्ण-देश-प्रांत सारेच भेद ठरतात तिथे अप्रस्तुत. सर्वसमावेशकता लौकिकात अवतरण्याची ही असते पूर्वअट. पंढरीत आनंदसोहळा नित्य नांदण्यामागील मुख्य रहस्य काही असेल तर ते नेमके हेच. ‘‘आनंद सोहळा त्रलोक्य अगाध। पंढरीये भेदाभेद नाहीं सत्य।’’ अशा शब्दांत ग्वाही देतात त्या वास्तवाची नाथराय. अभेदाची अवीट आणि अखंड अनुभूती प्रदान करणारी अशी मुक्ती हस्तगत करून देणारे साधन म्हणजे विठ्ठलनाम. नामाचा गजर करायचा तो त्याचसाठी. ‘‘नका माझें आणि तुझें। टाका परतें उतरुनी ओझें। एकाजनार्दनीं सहजें। विठ्ठलनामें मुक्त व्हा।’’ असे आवाहन नाथराय करतात तुम्हाआम्हाला ते याच हेतूने. इथे नाथ निर्देश करतात लौकिकातील मुक्तीकडे. पारलौकिक मुक्ती अपेक्षित नाही या ठिकाणी नाथांना. ‘आप-पर’ भावनेमधून मुक्ती हा तर लौकिक जीवन निरामय बनविण्याचा हुकमी महामंत्रच! हे द्वैत एकदा का लयाला गेले की उरते केवळ प्रेम आणि प्रेमच. उभ्या जगतावर प्रेमाची पखरण करण्यासाठीच उभा आहे श्रीविठ्ठल विटेवर पंढरीक्षेत्रात. सगळ्यांना समान वाटा या प्रेमात. ‘‘प्रेमा वाटितो उदार। देतां नाहीं सानाथोर।’’ अशा शब्दांत तुकोबाराय पुष्टी करतात त्याच वास्तवाची. दशेन्द्रियांसह अकरावे मनही अशा प्रेमाने माखून निघते, तोच दिवस म्हणावा एकादशीचा!

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article ekadashi 2021 zws

ताज्या बातम्या