– अभय टिळक agtilak@gmail.com
‘वैष्णव’ हे संबोधन विष्णुभक्तांचेच. पंढरीनिवासी पांडुरंग हा विष्णुकृष्णरूप असल्यामुळे वैष्णव हे ‘संबोधन’ शोभून दिसते वारीकरांनाही. वारी हा वैष्णवांचा मेळा ठरतो तो याच न्यायाने. पताका, गरुडटके मिरवत दिंडीमधून पंढरीक्षेत्राकडे वाटचाल करणाऱ्या वारकऱ्यांचे ‘कुं चे पताकांचे भार । आले वैष्णव डिंगर’ अशा शब्दांत नेमके वर्णन ज्ञानदेव करतात ते याचमुळे. अवघे वैष्णव ही पंढरीरायाची लेकरे असल्याचे स्पष्ट सूचित करत आहेत ज्ञानदेव इथे. हा वैष्णवमेळा जिथे विसावतो ती पंढरीपेठ साहजिकच मग ठरते वैष्णवनगरी.  ‘दिंडी टाळ घोळ गरु डटकियाचे भार । वैष्णवांचे गजर जिये नगरी’ हे ज्ञानदेवांचे पंढरीवर्णन यथार्थच होय त्या अर्थाने. ‘विष्णू’ हे दैवतनाम आहे मोठे अन्वर्थक. व्यापक असणे तसेच क्रियाशील असणे या उभय अर्थच्छटा सूचित करणाऱ्या ‘विश्’ या धातूपासून सिद्ध झालेले आहे हे दैवतनाम. जे तत्त्व व्यापक अथवा व्यापनशील आहे, जे तत्त्व क्रियाशील आहे असे तत्त्व ‘विष्णू’ या अभिधानाने प्रतिष्ठित आहे आपल्या परंपरेमध्ये. ‘विष्णुदास’ अशी उपाधी मिरविणाऱ्या वैष्णवांच्या ठायी याच दोन गुणांचे वास्तव्य आणि परिपोष भागवतधर्माला अपेक्षित आहे आणि अभिप्रेतही. ‘संत’ अथवा ‘भगवद्भक्त’ हे दोन्ही अर्थ आहेत ‘दास’ या संकल्पनेचे. ‘विष्णू’ या व्यापनशील आणि क्रियाशील तत्त्वाप्रमाणेच त्या तत्त्वाचे उपासक म्हणविणारे दासही व्यापक, प्रसरणशील व्यक्तिमत्त्वाचे असावेत ही आहे येथे अपेक्षा. भागवत धर्मविचाराला अपेक्षित असणारे संतत्व या दोन्ही गुणवैशिष्टय़ांनी मंडित असेच आहे. ‘मधुरा वाणी ओटीं । तुका म्हणे वाव पोटीं’ अशा शब्दांत तुकोबाराय निर्देशित करतात वैष्णवांच्या ठायी नांदणारी असीम दया आणि तिच्याद्वारे अंत:करणात उमलणारी अक्षय सर्वसमावेशकता. मुद्राधारण, पूजा, जप, ध्यान, नामस्मरण, कीर्तन, श्रवण, नमस्कार हा होय वैष्णवांचा नित्य आचार. आराध्य दैवताला जी चिन्हे अतिप्रिय होत ती अंगावर धारण करणे, हा तर वैष्णवांचा नेम. ‘तुळसीमाळा शोभती कंठीं । गोपीचंदनाच्या उटी । सहस्रविघ्नें लक्ष कोटी । बारा वाटा पळताती’  अशा शब्दांत ज्ञानदेव वर्णन करतात वैष्णवांच्या दिंडीचे. समूहाने नामघोष करत पंढरीस निघालेल्या वैष्णवमेळ्याच्या धाकाने अनंत विघ्ने दशदिशांना परागंदा होतात, असा आहे दाखला ज्ञानदेवांचा. अशी निरामय निर्विघ्नता जिथे चिरंतन वास करते अशा वैष्णवांच्या संगतीचे परमसुख ‘न लगे जाणावें नेणावें । गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें । वैष्णवांचें संगती’ अशा मोठय़ा आनंदभरित शैलीमध्ये विदित करतात तुकोबाराय. परंतु, केवळ मणिमाळा गळ्यामध्ये धारण केल्याने अथवा गोपीचंदनाच्या मुद्रा मुद्रेवर उमटविल्याने कोणी वैष्णव बनत नाही, हेही ठाऊक आहे ज्ञानदेवांना. ‘सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ज्याचे ह्रदयकमळीं । शांति क्षमा तया जवळी । जीवें भावें अनुसरल्या’ इतक्या नि:संदिग्ध शब्दांत वैष्णवांची अंतर्लक्षणे ज्ञानदेवांनी नोंदवून ठेवलेली आहेत ती त्यासाठीच. वारीमध्ये चालणारा वारिकर वैष्णव अशा उभय लक्षणांनी अंतर्बाह्य़ समृद्ध असावा, हेच अभिप्रेत आहे भागवत धर्मपरंपरेला. वैष्णव बनणे म्हणजे समर्पित होणे. ‘वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया । नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन’ अशी व्याख्या करतात तुकोबा वारीकर वैष्णवांची. वारकरी होणे अजिबात सोपे का नाही, ते आता तरी यावे ध्यानात!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh article lord vishnu zws
First published on: 06-07-2021 at 01:09 IST