– अभय टिळक agtilak@gmail.com

पंढरी क्षेत्राचे असाधारणत्व गर्जून सांगताना त्या क्षेत्राची एक आगळी वैशिष्टय खूण स्पष्ट करतात चोखोबाराय. ‘सकळ संतांचा मुगुटमणि देखा । पुंडलिक सखा आहे जेथें’ हे चोखोबांचे त्या संदर्भातील सूचन विलक्षण अर्थवाही होय. पुंडलिकरायांचे अलौकिकत्व आहे दुपेडी. त्यांतील एकाचा संबंध आहे पंढरीनाथाशी तर दुसऱ्याचे नाते आहे पंढरीरायाच्या डिंगरांशी. ‘डिंगर’ म्हणजे लेकरू. पुंडलिकरायांसारख्या मातबराच्या साधनेमुळेच केवळ परतत्त्व पंढरीत अवतरले अन्यथा येरागबाळाचे ते कामच नोहे, असा निर्वाळा ‘पितृभजन जरी पुंडलिक न करिता । तरी का हा झोंड येता पंढरीसी’ अशा शैलीत देतात नामदेवरायांचे सुपुत्र विठामहाराज. मोजकी सेवा करणाऱ्यांना पावण्याइतपत हे दैवत स्वस्त नाही, हेच जणू ‘झोंड’ हे विशेषण पंढरीनाथाला लावून सुचवत आहेत विठामहाराज. सर्वसामान्यांना कोठून झेपावी एकांतिक निष्ठा पुंडलिकरायासारखी? भोळ्या-भाळ्या भाविकांसाठी देवत्व अप्राप्यच राहाणार का? जनसामान्यांना आकळण्याजोगे सुलभसोपे बनवून परतत्व विटेवर उभे करणे, हे पुंडलिकरायांचे अक्षय ऋणच जणू उभ्या विश्वावर. ‘न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें’ अशा शब्दांत त्या भक्तराजाला धन्यवाद देतात तुकोबाराय. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या चार वाणींनाही जे तत्त्व दुर्लभ आहे, अशा परतत्त्वाला त्याचे थोरपण विसरायला भाग पाडणे हे पुंडलिकरायाच्या साधनेचे आद्य सामर्थ्य  ‘आपुलें थोरपण । नारायण विसरला’ अशा शब्दांत गौरवांकित करतात तुकोबा. उत्कट साधनेचे बळ निश्चयाने हस्तगत करणे ज्या सर्वसामान्य प्रापंचिकांना दुष्कर आहे, अशांसाठीच परमात्मा पांडुरंग विटेवर उभा आहे, असे सांगत तुकोबा अधोरेखित करतात पंढरीक्षेत्राचे लोकतीर्थत्व! मात्र इतक्यानेही भागत नाही. साधनप्रवीण मार्गदर्शकाचे निकट साहचर्य आवश्यक असते साधना परिपक्व होण्यासाठी. तशा अधिकारसंपन्न गुरुत्वापासून वंचित राहिलेल्यांची काळजी वाहाण्यासाठीच पुंडलिकरायांसारखा लोकसखा पंढरी क्षेत्रामध्ये विराजमान असल्याची ग्वाही देते संतांची मांदियाळी. इंद्रियांवर विजय मिळविणे हे कर्म तर दुष्करच. अन्यथा, आपण इंद्रियांच्या अधीन असलेले दुर्बळच. ‘इंद्रियांची दिनें । आम्ही केलों नारायणें’ असे तुकोबा जे म्हणतात ते पुरेपूर लागू पडते सगळ्यांना. देहेद्रियांच्या सत्तेपुढे हीनदीन झालेल्यांचा सोयरा पंढरपुरामध्ये विराजमान असल्याची ग्वाही  ‘दीनाचा सोयरा पांडुरंग’ अशा शब्दांत देतात तुकोबाराय. त्याला भेटण्यासाठीच जायचे पंढरीला. भावभक्तीरूपी भीमेच्या पैलतीरावर उभा आहे तिथे परमात्मा. तेथे पोहोचलेल्या साधकांनी प्रवाहात उतरून पैलतीर गाठणे तेवढेच काय ते बाकी. अर्थात भक्तीच्या का होईना, पण सशक्त प्रवाहात टिकून राहणे हीदेखील एक कसोटीच. साधकांच्या मदतीसाठी प्रवाहात म्हणूनच उभे आहेत पुंडलिकराय. आजही पंढरीक्षेत्रामध्ये पुंडलिकरायांचे राऊळ प्रतिष्ठित आहे चंद्रभागेच्या पात्रातच. साधकाला आधार देत पैलतीराला लावण्यासाठीच पुंडलिकराय प्रवाहात खडे आहेत, अशी साक्ष ज्ञानदेव देतात ती याच कार्यकारणभावाचा उलगडा घडविण्यासाठी. किंबहुना, ‘तारक पंढरी प्रसिद्ध भीमातीरीं । ब्रीदें चराचरीं बोले वेदु’ असा निवृत्तिनाथ वर्णन करतात तो पंढरीनामक लोकतीर्थाचा डिंडिम सर्वत्र दुमदुमतो तो पुंडलिकरायांसारखा तारक लोकसखा तिथे दक्ष असल्यामुळेच !