वस्तुप्रभा

ओहोटी असेल तर मंद व हलक्या आणि भरती असेल तर चढय़ा व आक्रमक लाटांच्या माळांची क्रीडा निरंतर वेल्हावत राहते

(संग्रहित छायाचित्र)

– अभय टिळक

समुद्राच्या किनाऱ्यावर उभे राहिले की तासन्तास कसे आणि केव्हा निघून जातात ते कळतदेखील नाही. समुद्र शांत असो वा उधाणलेला, त्याच्या लाटांचा आपसांतील खेळ अखंड चालूच असतो. ओहोटी असेल तर मंद व हलक्या आणि भरती असेल तर चढय़ा व आक्रमक लाटांच्या माळांची क्रीडा निरंतर वेल्हावत राहते. वस्तुत: प्रत्येक लाट स्वतंत्र. एक दुसरीसारखी नाही. प्रत्येकीचे अंगप्रत्यंग वेगवेगळे. त्यांच्या खेळाचे निरीक्षण करताना मनाला होणारा आनंदही नित्यनूतन असाच. मनाचा अवघा क्षुद्रपणा सागराच्या त्या विशाल दर्शनाने पार धुऊन जातो. औदासीन्याचे मळभ आले असेल मनावर, तर तेही निवारले जाते. हा परिणाम नित्यनूतनत्वाच्या अनुभूतीचा. समुद्राच्या पृष्ठभागावर उमटणारी प्रत्येक लाट ज्याप्रमाणे तिचे ताजे सौंदर्य उधळत येते, त्याच न्यायाने, अद्वयाच्या अधिष्ठानावर स्थिर होऊन भवतालच्या पसाऱ्याकडे बघितले, की ठायीठायी साक्षात्कार घडू लागतो तो स्वरूपत:च अ-नित्य असणाऱ्या सृष्टीद्वारे प्रतिक्षणी प्रगटणाऱ्या विश्वात्मक शिवाच्या नित्यनूतन दर्शनाचा. तो आनंद अवर्णनीयच. ‘‘अवघी आनंदाची सृष्टी जाली’’ असे तुकोबांचे कृतार्थ उद्गार साक्ष पुरवितात ती त्याच आनंदानुभूतीची. पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अनुभवायला येणारे जग, या जगाचे अधिष्ठान असणारे परतत्त्व आणि या विश्वाचा घटक असणारे तुम्ही-आम्ही सगळे यांच्या परस्परनात्याचा उलगडा करण्यासाठी ज्ञानदेवांनी त्यांच्या अक्षरसंचितामध्ये सर्वत्र अधिककरून पाणी आणि पाण्याच्या लाटेचेच दृष्टान्त योजलेले दिसतात ते काही उगीच नाही. ‘‘पाणी कल्लोळाचेनि मिसे। आपणपे वेल्हावे जैसे। वस्तु वस्तुत्वे खेळो ये तैसे। सुखे लाहे।।’’ हे ज्ञानदेवांचे ‘अमृतानुभवा’च्या सातव्या प्रकरणातील कथन यासंदर्भात मननीय ठरते. निखळ क्रीडेचे सुख मिळावे म्हणून पाणीच लाटेच्या रूपाने नटते आणि स्वत:च स्वत:शी खेळत बसते. अगदी त्याच न्यायाने, विश्वाचे मूलद्रव्य असणारी ती अनादी/ अनंत वस्तू- म्हणजेच शक्तिमान शिव अथवा शिवमय शक्ती- स्वत:च नानाविध रूपांनी नटते, हा या दर्शनाचा गाभासिद्धान्त. हा बोध चित्तामध्ये स्थिर झाला की वैविध्याने नटलेल्या जगात औषधालाही भेद सापडत नाही. ‘‘परी भेदाचा नव्हे विखो। तेचि म्हणोनि।।’’ असे ज्ञानदेव नि:शंकपणे सांगतात. एकमात्र असणारी ती शिववस्तूच विश्वरूपाने विलसते आहे, हे सारतत्त्व बुद्धीला एकदा का अवगाहन झाले, की जगात कोठेही कसलाही भेद अनुभवायला येण्याचा विषयच निकालात निघतो. तीच दृष्टी हस्तगत झालेले तुकोबा, जगाच्या या विराट खेळाचे वर्णन मग- ‘‘जीवाशिवाचे भातुके। केले क्रीडाया कौतुके।’’ अशा प्रत्ययकारी शब्दांत करतात. आदिकारण शिवाचे विश्वोत्तीर्ण रूप आणि विश्वात्मक रूप यांचा सहसंबंध आणखी एका प्रकारे ज्ञानदेव हिरा आणि त्याच्यामधून परावर्तित होणारे त्याचे तेज यांच्या माध्यमातून सांगतात. तेज:पुंज हिऱ्यामधून चहूंकडे फाकणारी त्याची प्रभा ज्याप्रमाणे त्या हिऱ्याचे सौंदर्य शतगुणी बनविते, त्याच न्यायाने शिवाचे विश्वात्मक रूप त्याच्या विश्वोत्तीर्ण रूपाचे देखणे दर्शन उधळत राहते, हे ज्ञानदेव- ‘‘यालागीं वस्तुप्रभा। वस्तुचि पावे शोभा।’’ अशा शब्दांत स्पष्ट करतात. दृश्य जगात ‘शिव’नामक एकमात्र वस्तूच ठासून भरलेली आहे, हाच या साऱ्याचा इत्यर्थ!

agtilak@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh article on vastuprabha abn