संपुष्ट

नित्यपूजेतील आराध्य दैवताचे पावित्र्य घराबाहेरदेखील जपण्यासाठी ही जी पेटी अथवा संदूक खास तयार केलेली असे तिला म्हणत ‘संपुष्ट

अभय टिळक agtilak@gmail.com
जगणे बदलले की जगण्याची परिभाषादेखील बदलते.  पालटलेल्या परिभाषेचे प्रतिबिंब मग डोकावते प्रचलित शब्दव्यवहारात. नवीन जगराहाटीशी सुसंगत असे नूतन शब्दविश्व मग साकारते भवताली. जुन्या जगण्याशी संबद्ध अशा संज्ञा-संकल्पना पार विरून जातात विस्मरणाच्या खाईत. ‘संपुष्ट’ हा शब्द आज उच्चारला तर कदाचित काहीच उलगडा होणार नाही कोणाला. मात्र, दोन-तीन पिढय़ांमागील दैवतविश्वाशी संलग्न परिभाषेचे ‘संपुष्ट’ हे एक अविभाज्य अंग होते. ‘‘देव संपुष्टात ठेवून प्रस्थान झाले दूरच्या प्रवासाचे..’’, अशा आशयाचे संवाद झडत असत त्या काळी वेळोवेळी. देशाटनावर असताना दररोजची देवपूजा चुकू नये यासाठी घरचे देव बरोबर घेऊनच प्रवासासाठी पाऊल घराबाहेर टाकले जाण्याचा तो काळ. दूरच्या प्रवासादरम्यान मोठीच शक्यता असे बाटविटाळाची. प्रवासादरम्यान पावित्र्यभंग होऊ नये कळत-नकळतदेखील, यासाठी देवांना एका खास करंडय़ात अथवा पात्रात ठेवण्यात येत असे. त्या पेटीला वा करंडय़ाला असे रीतसर झाकण. दोन्ही टोके एकावर एक ठेवून ती पेटी अथवा करंडा बंद करून टाकला की झाले. नित्यपूजेतील आराध्य दैवताचे पावित्र्य घराबाहेरदेखील जपण्यासाठी ही जी पेटी अथवा संदूक खास तयार केलेली असे तिला म्हणत ‘संपुष्ट’. बहुतेक वेळा हे ‘संपुष्ट’ असे तांब्यापासून बनविलेले. तांब्याच्या ठायी शुद्धीकरणाचे सामर्थ्य वसत असल्याच्या धारणेचे अधिष्ठान असे त्या कृतीमागे. शुद्ध तांब्याच्या भांडय़ामध्ये पाणी साठवून ठेवले एक संपूर्ण दिवस-रात्र तर पाण्यातील सर्व प्रकारचे सूक्ष्म जंतू नष्ट होतात, ‘तांबे’ या धातूच्या ठायी वसणाऱ्या गुणवैशिष्टय़ाची जाण होती पूवर्जाना. त्यामुळे, ‘संपुष्ट’ हे सहसा बनवले जाई ते तांब्याचा वापर करूनच. अद्वयाच्या प्रांतात, म्हणूनच, तुकोबा आवर्जून संदर्भ देतात तो याच ‘संपुष्टा’चा. ‘एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टीं राहावें’अशा विलक्षण मार्मिक शब्दांत तुकोबा निर्देशित करतात परतत्त्वाच्या विश्वोत्तीर्ण स्वरूपाचे असाधारणत्व. अनंत रूपांनी अनंत वेष धारण करून विश्वात्मक विलसणारे परतत्त्व, त्याच्या इच्छेने, संपुष्टात मावण्याजोगे विश्वोत्तीर्ण रूप त्याला हवे तेव्हा धारण करते, हेच शांभवाद्वयाचे गाभातत्त्व स्पष्ट करतात तुकोबा इथे. तर, ‘सांटवला राहे हृदयसंपुटीं । बाहेर धाकुटी मूर्ति उभा’ अशा पराकोटीच्या विलोभनीय शैलीत तुकोबा विदित करतात परतत्त्वाच्या हृदयस्थ अशा विश्वोत्तीर्ण रूपाचे आणि त्याच शिवतत्त्वाच्या विश्वात्मक अशा प्रगट स्वरूपाचे सामरस्य. असंभाव्य असे विराट रूप-स्वरूप धारण करून विश्वरूपाने विलसणारा परमशिवच धाकुटा होऊन हृदयरूपी संपुष्टात प्रतिष्ठित होतो, हा स्वानुभव होय तुकोबांचा. दोन्ही ठायी दर्शन आहे एकाच तत्त्वाचे. अद्वयबोधाचे पूर्ण आणि निखळ दर्शनच हे. मात्र, ही सहजासहजी, जाता जाता साध्य होणारी बाब नव्हे. त्यासाठी सगळ्यांत प्रथम व महत्त्वाचे म्हणजे, साधकाच्या  हृदयाकाशाला संपुष्टाचे पावित्र्य लाभावयास हवे. ‘तुका म्हणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें’ असा रोकडा इशारावजा संदेशच आहे तुकोबारायांचा या संदर्भात तुम्हांआम्हांला. चित्ताला संपुष्टाचे निरपवाद पावित्र्य लाभावे याचसाठी खटाटोप करायचा तपाचरणाचा.

अष्टांगयोगातील ‘नियम’ या दुसऱ्या  क्रमांकाच्या पंचआयामी योगातील ‘तप’ आणि ‘शौच’ या दोन नियमांची आंतरसंगती ही अशी आहे.

 

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta advayabodh article worship of god author abhay tilak zws

Next Story
तपसामुग्री
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी