scorecardresearch

भाव-भजन

वरपंग बडिवारापेक्षा परमार्थाच्या प्रांतात सर्वाधिक महत्त्व भावशुद्ध भजनाला असते, या वास्तवाकडे संकेत आहे तुकोबारायांचा.

भाव-भजन

– अभय टिळक agtilak@gmail.com

‘‘भगवत्प्राप्ती नेमकी कशाने व कशी करून घेता येईल?’’ असा प्रश्न तुकोबांना बहुधा त्यांच्या समकालीन एखाद्या मुमुक्षूने विचारला असावा. त्या प्रश्नाला उत्तर देताना तुकोबारायांनी एक मोठी गंमत केलेली दिसते. परमेश्वरप्राप्तीचा हमखास उपाय ‘भावें गावें गीत। शुद्ध करूनियां चित्त। तुज व्हावा आहे देव। तरि हा सुलभ उपाव’ अशा शब्दांत तुकोबाराय त्या साधकाला विदित करतात. वरपंग बडिवारापेक्षा परमार्थाच्या प्रांतात सर्वाधिक महत्त्व भावशुद्ध भजनाला असते, या वास्तवाकडे संकेत आहे तुकोबारायांचा.

साधना ‘किती’ केली यांपेक्षाही ती ‘कशी’ केली, हे महत्त्वाचे. ‘कांही न लगे एक भावचि कारण। तुका म्हणे आण विठोबाचीं’ हे तुकोबांचे शब्द भावाचे माहात्म्य पुरेपूर अधोरेखित करतात. शुद्ध भाव अंत:करणात नांदत असेल तर वरकड कर्मकांड अप्रस्तुत ठरते आणि सगळी साधनसिद्धी जय्यत तयार असून जर विशुद्ध भावच मुदलात नसेल तर पालथ्या घडय़ावर सपशेल पाणी, हेच तुकोबा सुचवत आहेत इथे. देवप्राप्तीच्या उपायासाठी तुकोबारायांनी वापरलेले ‘सुलभ’ हे विशेषण मोठे अन्वर्थक होय. चित्त निर्मळ बनवून भावपूर्ण भजन चालू झाले की त्या भजनातच देवप्राप्ती ठेवलेली आहे, हा होय तुकोबांच्या कथनाचा इत्यर्थ. भजन हे सर्वसमावेशक आणि सुलभ असल्याचा महाराज इथे देत असलेला निर्वाळा सर्वच उपासकांना आश्वासक वाटावा असाच आहे.

भजन हे उपासना साधन तर स्वरूपत:च संगीतप्रधान. ताल आणि सूर हे होत संगीताचे अनिवार्य असे पायाभूत घटक. तालासुरात आळवलेल्या भजनाद्वारे ब्रह्मरसाची गोडी चाखावयास मिळते, असा दाखला देतात तुकोबाराय ‘लावूनि मृदंग श्रुतिटाळघोष। सेवूं ब्रह्मरस आवडीने’ अशा प्रत्ययकारी शब्दांत. परंतु, ताल आणि सूर हे संगीताच्या क्षेत्रातील अनिवार्य गुण भजनासाठीही तितकेच अत्यावश्यक होत, असे मात्र नाही. एखाद्याच्या पदरी तालसुराचे दान मुळातच पडलेले नसेल तर त्याने भजन आळवायचेच नाही का? इथे पुन्हा आपल्या मदतीला धावून येतात तुकोबारायच.

भजन-कीर्तन ही होय भगवंताची सेवा, तो काही ‘परफॉर्मन्स’ नव्हे! भजनामध्ये सर्वोच्च महत्ता गाजते ती भावाची. मधुर कंठाच्या निसर्गदत्त देणगीपासून वंचित असलेला एखादा अ-सूर साधक भावपूर्ण अंत:करणाने आळवत असेल तर परमात्मा भुलतो सुरांच्या शुद्धतेपेक्षाही त्याच्या भावशुद्धीला. ‘नये जरी तुजला मधुर उत्तर। दिधला सुस्वर नाहीं देवें। नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल। येइल तैसा बोल रामकृष्ण’ हे तुकोबांचे बोल अधोरेखित करतात स्वरमाधुर्याच्या तुलनेत काकणभर सरस ठरणारी भावशुद्धीच. ‘शुद्ध भाव ज्याचा जाला। दुरीं नाहीं देव त्याला’ असा निर्वाळा मुक्ताबाई ‘ताटीच्या अभंगा’मध्ये देतात यांतच सर्व काही आले. हे सगळे आपल्या सगळ्यांनाच, निदान सैद्धान्तिक पातळीवर तरी, चांगले ठाऊक असते. प्रश्न इथे एवढाच आहे व असतो की, शुद्ध भाव कसा प्राप्त करून घ्यावयाचा हा आणि एवढाच! अंत:करणात भाव कसा निर्माण होईल, याची विवंचना सगळ्या मुमुक्षूनाच सतावत असते. भजन आणि भाव यांचे नाते उभयदिश असते असे सांगत अशा साधकांना आश्वस्त करतात नाथराय. ‘भजन भावातें उपजवी। देव भक्ताते निपजवी’ हे नाथांचे शब्द हृदयावर कोरून ठेवावेत असेच होत या संदर्भात.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-10-2021 at 00:06 IST

संबंधित बातम्या