अभय टिळक agtilak@gmail.com

दयेने अंत:करण अंतर्बाह्य व्यापलेल्या व्यक्तीची गुणलक्षणे वर्णन करताना ‘ज्ञानदेवी’च्या १६ व्या अध्यायातील एका ओवीमध्ये ज्ञानदेवांनी अद्वितीय उपमा सिद्ध केलेली आहे तृणांकुरांना जीवनदान प्रदान करणाऱ्या पाण्याची. पैं जगीं जीवनासारिखें। वस्तु अंगवरी उपखे । परी जातें जीवित राखे । तृणाचेंही ही ती ओवी. ‘उपखा’ हे मूळ ‘उपक्षय’ शब्दाचे तत्कालीन लोकभाषाव्यवहारातील अपभ्रंश बोलीरूप. ‘उपक्षय’ म्हणजे ‘नाश’. पाटातून वाहणारे पाणी वृक्षराजीसह गवतपात्यांना जीवनदान प्रदान करते आणि जमिनीमध्ये मुरून जाते. एका परीने, जमिनीमध्ये मुरून पाणी स्वत:चा क्षय अथवा नाशच घडवून आणत असते. प्रसंगी, स्वत:च्या अस्तित्वाचा विलय अथवा विलोप घडवून आणत पाणी ज्याप्रमाणे जीवनसृष्टीला जीवनदान करत राहते अगदी त्याच न्यायाने दयावंत अंत:करणाच्या विभूती जगरहाटीमध्ये वावरत असतात, हे सारभूत तत्त्व बिंबवायचे आहे ज्ञानदेवांना या ओवीद्वारे लोकमानसावर. इथे, दडलेली आहे एक विलक्षण गंमत आणि संकेतही. वनस्पतीसृष्टीला जीवनदान देण्याच्या आपल्या जीवितकार्याची परिपूर्ती झाल्यानंतर पाणी स्वत:च्या अस्तित्वाचा विलोप घडवून आणते. आपल्या अस्तित्वाचे प्रयोजन संपले की आत्मविलोपन घडवून आणावयाचे हा पाण्याचा अंगभूत गुणधर्म, अद्वयबोधाच्या प्रांगणात प्रवेशते वेळी शब्द अंगीकारतात हा सिद्धान्त ज्ञानदेव मांडतात ‘अनुभवामृता’च्या सहाव्या प्रकरणात. अद्वयबोधाच्या महाद्वारात पाऊल घालते वेळी मन मौनावते आणि वाचा पांगुळते इतकेच केवळ नव्हे तर, आत प्रवेशल्यानंतर सुरू  होणाऱ्या संपूर्ण प्रदेशात आपण सर्वथैव अप्रस्तुतच ठरतो हे अचूक समजून-उमजून शब्दच त्या महाद्वारात स्वत:चा विलय घडवून आणतात, असे कथन आहे ज्ञानदेवांचे. शब्दांची सद्दी चालते ती विश्वात्मकाच्या प्रांगणात. मात्र, विश्वोत्तीर्णाच्या साम्राज्यात प्रवेशण्याची घटिका आली की तो ठरतो अप्रस्तुत आणि अक्षम. आणिक येक शब्दें । काज कीर भलें सिद्धे । परि धिवसा न बंधे । विचारू  येथे असे आहे प्रतिपादन ज्ञानदेवांचे या संदर्भात. ‘धी’ या शब्दाचा अर्थ ‘बुद्धी’. तर, ‘बंध’ म्हणजे ‘रचना’. व्यवहारात शब्द आपल्या बळावर मोठमोठी कामे पार पाडतात यांत, ज्ञानदेव म्हणतात, शंका नाही. कारण, आपला समाजव्यवहार चालतो तो शब्दबद्ध रचनेच्या माध्यमातूनच. मात्र, अद्वयबोधाच्या प्राप्तीचा एक प्रांत असा आहे की तिथे मात्र थिटी पडते मातबरी शब्दांची. अद्वयबोध आणि तो हस्तगत झाल्यानंतरची स्थिती वर्णन करता येईल असा रचनाबंध निर्माण करणे शब्दांच्या ताकदीबाहेरच असल्याने ते बिनबोभाट आत्मविलोपन घडवून आणतात, असा आहे खुलासा ज्ञानदेवांचा. सहाय आत्मविद्येचे। करावया आपण वेंचे। गोमटें काय शब्दाचें।  येकैक वानूं ? अशा शब्दकळेद्वारे ‘शब्द’ या माध्यमाचा महिमा ज्ञानदेव मुक्त कंठाने गातात तो उगीच नाही. अद्वयबोधावर स्थिर होण्यास उपासकाला साहाय्यभूत होण्याचे आपले कार्य सिद्धीस गेल्यानंतर, तृणपात्यांना जीवनदान करून भूमीमध्ये मुरणाऱ्या पाण्यासारखेच, स्वत:चे अस्तित्व वेचून टाकण्याच्या ‘शब्द’ या माध्यमाच्या गोमटेपणाचे किती कौतुक करावे, असा ज्ञानदेवांना पडलेला प्रश्नच किती मार्मिक आहे पहा! शब्दांच्या सामर्थ्यांइतकीच ‘शब्द’ या माध्यमाच्या मर्यादांचीही नेमकी जाण असणाऱ्या विभूतीलाच ‘शब्दप्रभू’ हे बिरुद शोभून दिसते. ज्ञानदेव शब्दप्रभू होत ते याच अर्थाने.