अंत:सूत्र

भजनाद्वारे हस्तगत होणाऱ्या भावबळाने सक्षमीकरण घडून येते समाजाच्या सर्वच स्तरांतील लहानथोर उपासकांचे

– अभय टिळक agtilak@gmail.com

नामदेवरायांच्या कुटुंबाशी समरस झालेल्या माउली जनाबाई आणि तुकोबांचे शिष्यत्व लाभलेल्या बहेणाबाई यांच्यात विलक्षण मधुर असे आंतरिक नाते आहे. त्या नात्याचा पदर गुंफलेला आहे तो विठ्ठलाशी. भक्ताच्या अंत:करणातील भावाची चोरी करण्यास सोकावलेल्या पंढरीच्या त्या चोराला शिताफीने पकडल्याचा डिंडिम जनाई धरिला पंढरीचा चोर। गळां बांधोनिया दोर अशा अन्वर्थक शब्दकळेद्वारे चहूदिशांना गाजवतात. तर, माउली जनाबाईंनी नेमका कोणता दोर त्या सांवळ्या आणि लोभस चोराला जेरबंद करण्यासाठी वापरला याचा खुलासा भावार्थाचे दावे देवाचिया गळा । तयासी मोकळा कोण करी अशा पराकोटीच्या मार्मिक शब्दांत करतात बहेणाई. भजनाचा भाव (म्हणजे सामर्थ्य) हा असा अमोघ होय. सर्वसमावेशकता हे भजनाचे दुसरे तितकेच आगळे असे बलस्थान. भजनाद्वारे हस्तगत होणाऱ्या भावबळाने सक्षमीकरण घडून येते समाजाच्या सर्वच स्तरांतील लहानथोर उपासकांचे. जन्मजात वर्णाधिकाराची बात मग ठरते सपशेल अप्रस्तुतच. स्त्रीशुद्रादि आघवें । घालूनियां ये नावे । एकेच खेपे स्वयें न्यावे । भजनभावें परतीरा हे ‘एकनाथी भागवता’च्या दुसऱ्या अध्यायातील नाथांचे कथन भजनभावाच्या त्याच वैशिष्टय़ाचे अधोरेखन करते. विवेक, वैराग्य, षटसंपत् आणि मुमुक्षूत्व या चारांचे मिळून बनते ‘साधन चतुष्टय़’. ते साधल्याखेरीज ‘साधक’ ही कोटी साध्य होणेच दुष्कर. शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान अशी सहापदरी गुणसंपदा ही होय साधकाच्या मनाची खरी संपत्ती. मनाच्या या षटसंपत्तीमधील सगळ्यांत वैशिष्टय़पूर्ण वैभव म्हणजे ‘समाधान’. अष्टांगयोगातील ‘नियम’ या दुसऱ्या योगांगामधील ‘संतोष’ या उपांगाशी समाधानाचे नाते फार निकटचे. आंतरिक अथवा बाह्य़ अशी कोणत्याही स्तरावरील कितीही प्रतिकूलता वाटय़ाला आली तरी तिचे सावट मन:पटलावर अणुमात्रही न पडणे, आणि यदाकदाचित तसे ते पडलेच तरी त्यापायी चित्त कणभरही विचलित न होणे, हा ‘समाधान’ या संपत्तीचा गाभा. साधायला आणि सांभाळायला विलक्षण अवघड अशीच ही संपदा! योग्यांचेही एक वेळ राहू दे, साध्या संसारी मनुष्यालादेखील अप्राप्य वाटावे असाच हा मनाचा गुण. मात्र, एरवी पाऱ्याच्या गोळीसारखे हुलकावणी देणारे समाधान हुकुमी प्राप्त करू न देणे हे ठरते भजनाचे सर्वांत वरिष्ठ वैशिष्टय़. एका जनार्दनीं भजन । भजनीं पावे समाधान हे नाथांचे स्वानुभवजन्य उद्गार थेट निर्देश करतात भजनाच्या त्याच असाधारण अधिकाराकडे. पुढे जाऊन, भजन व भजनाद्वारे प्राप्त होणारे समाधान यांच्या दरम्यानचे अंत:सूत्र आणि या दोहोंची परस्परपूरकता मना होतां समाधान । समाधानें अधिक भजन । पूर्ण बाणलें अनुसंधान । ध्येय-ध्याता-ध्यान समरसें भजें अशा अ-साधारण शैलीत वर्णन करतात ‘एकनाथी भागवता’च्या दुसऱ्या अध्यायात नाथ. भजनाद्वारे सर्व प्रकारच्या त्रिपुटीचा लय झाल्यानेच समाधान हस्तगत होते, हे गाभातत्त्व इथे सूक्ष्मपणे सूचित करतात नाथराय. भजनाचा, भजनाद्वारे निष्पन्न होणाऱ्या भावाचा, त्रिपुटीच्या लयाचा आणि समाधानाचा अंत:संबंध नेमका कोणत्या सूत्राद्वारे ओवला जातो, याचा उलगडा भाव तेथे भक्ति, भक्ति तेथे ज्ञान । ज्ञाने समाधान होय चित्ता अशा शब्दांत करत या सगळ्या अंत:सूत्राचा चरमबिंदू गाठतात बहेणाबाई. ‘भागवत धर्ममंदिरावरील तुकोबारूपी कळसाशेजारी झळकणारी ध्वजा’ हे बहेणाबाईंचे स्थान सर्वतोपरी यथार्थ ठरते ते असे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Loksatta advayabodh author abhay tilak empowerment gained through bhajan zws

Next Story
स्थिर नाहीं एकवेळ
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी