अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अद्वय’ आणि ‘अद्वैत’ हे दोन केवळ शब्द नव्हेत. या दोन्ही होत बीजसंज्ञा. विशाल असा शाल्मली वृक्ष इवल्याशा बीजामध्ये असतो अव्यक्तपणे पहुडलेला. अगदी त्याच न्यायाने, जीवनदृष्टी घडविणाऱ्या दोन प्रगल्भ अशा तत्त्वधारांचे महावृक्ष अंकुरतात या दोन बीजसंज्ञांच्या कुशीतून. अद्वैताचा अनुबंध आहे वेदान्ताशी तर अद्वयाचे नाते आहे शैवागमाशी. अद्वैताचे व्याकरण आकळते ब्रह्मसूत्रांच्या माध्यमातून. तर, शांभवाद्वयाचे सूत्र उलगडते शिवसूत्रांच्या गुंफणीद्वारे. आपल्यापैकी अनेकांची निदान तोंडओळख तरी झालेली असते अद्वैताशी. परंतु, अद्वय मात्र त्या मानाने आजही राहिलेले आहे अ-लक्षित आणि म्हणूनच अत्यल्प परिचित. ‘अद्वैत’ आणि ‘अद्वय’ या मुळात परस्परांपेक्षा गुणात्मकरीत्या प्रचंड भिन्न असलेल्या दोन संज्ञा-संकल्पना होत, ही बाबदेखील कित्येकांना अ-ज्ञातच आहे. या उभय संज्ञा समानार्थी होत, अशीच दिसते बहुसंख्यांची धारणा. भलेभलेही सुटलेले नाहीत या चकव्यातून. परिणामी, ज्ञानदेवांचे आणि पर्यायाने भागवत धर्मप्रधान वारकरी संप्रदायाचे जीवनदर्शन अद्वैताच्या विचारव्यूहात बसवण्याचा परिपाठ सर्वत्र सर्वदूर प्रतिष्ठित आहे. गोल डब्याचे झाकण मारून-मुटकून चौकोनी डब्याला बसवण्याच्या खटाटोपासारखाच हा सारा प्रकार! या गोंधळापायी घडून येणाऱ्या दिशाभूलीबाबत सगळेच जण त्यांमुळे साहजिकच असतात अनभिज्ञ. निवृत्तिनाथांपासून ते निळोबारायांपर्यंतच्या भागवतधर्मी संतपरंपरेने समृद्ध बनविलेल्या मूल्यविचारविश्वात अनंत ठिकाणी विलसणारे अद्वयाच्या विचारव्यूहाचे काही कवडसे निरखण्याचा नम्र प्रयत्न प्रस्तुत सदराच्या माध्यमातून आजवर आपण केला तो त्यासाठीच. आपण आणि ज्या जगात आपला नित्यव्यवहार चालतो ते भवतालातील विश्व यांच्या परस्परनात्यासंदर्भातील निगम आणि शैवागम या दोन दर्शनांचे कथन मूलभूतरीत्याच वेगळे आहे. अद्वैताला आकर्षण आहे ते व्यक्तिगत साधनेद्वारा दृश्य प्रपंचाच्या या पसाऱ्यातून मुक्त होण्याचे. तर, अद्वयाला असोशी आहे ती परतत्त्वाच्या विश्वात्मक विलासाद्वारे क्षणोक्षणी नव्याने साकारणाऱ्या क्रीडेचा आनंद सामूहिकरीत्या आकंठ उपभोगण्याची. अद्वैताच्या लेखी दृश्य जग म्हणजे मायेच्या अध्यासापायी परब्रह्माचे व्यक्त असे विवर्तरूप. तर, अद्वयाच्या लेखी लौकिक-भौतिक जग हा तर शक्तिमय शिवाचा रम्य विलास. परिणामी, मायेचा पडदा दूर सारून ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घेणे हे ठरते अद्वैतोपासकाचे अंतिम ध्येय. तर, भवतालातील प्रत्येक आविष्कारामधून विलसणाऱ्या परमशिवाची अनुभूती हरतऱ्हेने घेत या खेळात मनसोक्त रंगून जाणे, हा बनतो अद्वयोपासकाचा स्वभाव. हार-जीत, हसू-आसू, चढाई-नरमाई, आक्रमण-माघार अशा बहुविध सापेक्षता हा तर कोणत्याही क्रीडेचा अविभाज्य भागच. मात्र, जाणीव-नेणिवेच्या द्वैतापल्याड जात मनसोक्त खेळण्याचा आनंद त्यांतील यच्चयावत सापेक्षतांचा विलय घडवून आणत दशांगुळे वर उरणारा असाच नसतो का! तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें। जालें तुझें सुख अंतर्बाह्य असे समाधानाचे हर्षोद्गार आमच्या तुकोबारायांच्या मुखातून उमटतात तो खेळ अटीतटीने खेळल्यामुळेच. शिवशक्तीच्या अभिजात ऐक्याद्वारे रंगणाऱ्या या विश्वक्रीडेची अनुभूती आली की होणारी अवस्था तेव्हां सागरीं गंगा जैसी। आत्मा मीनल्या बुद्धि तैसी। अद्वयानंदाची आपैसी। खाणी उघडे अशा प्रत्ययकारक शब्दकळेद्वारे प्रगट करतात ज्ञानदेव. त्याच क्रीडेचे शब्दरूप न्याहाळण्याचा उपक्रम केला आपण इथवर. आता, खेळ अनुभवायचा ज्याचा त्याने. त्यासाठी गरज नाही शब्दांची.

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh author abhay tilak god of knowledge vision of life zws
First published on: 31-12-2021 at 00:34 IST