अभय टिळक agtilak@gmail.com
कृष्णजन्म साजरा केला अथवा कृष्णावतार झाला म्हणून कृष्णभेट आपसूकच घडेल, असे समीकरण मात्र मांडता येत नाही. या दोन अगदी वेगवेगळ्या बाबी होत. कृष्णदर्शन ही सहज साध्य होणारी गोष्ट अजिबातच नव्हे. ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन ही होय पूर्वअट कृष्णभेटीची. तेही साहजिकच नव्हे का! सर्व भोग भोगूनही ‘बालब्रह्मचारी’ म्हणून ज्या नंदनंदनाचा लौकिक त्रिखंडात गाजतो त्याची गाठभेट घ्यायची तर मुमुक्षूच्या ठायीदेखील ब्रह्मचर्याचे अधिष्ठान बळकटच असावयास हवे. ब्रह्मचर्याची सांगड आपण अपरिहार्यपणे आणि तितकीच अकारण घालत असतो लग्न करण्या- न करण्याशी. वास्तविक या दोन बाबींचा परस्परांशी असणारा संबंध तसा फार मर्यादित आहे. ‘लग्न न करता राहणे’ हा, वास्तविक पाहता, ‘ब्रह्मचर्य’ या संकल्पनेचा केवळ एक आणि फार ढोबळ अर्थ झाला. ‘ब्रह्मचर्य’ या संकल्पनेचा सघन, सखोल अर्थ जाणून घ्यायचा तर हात धरावा लागतो नाथरायांचा. जे ब्रह्मचर्याच्या बाबतीत तेच कृष्णाच्याही बाबतीत. ‘कृष्ण’ या अधिष्ठानाचे आकलनही त्यासाठी आवश्यक आहे सर्वंकष असेच. दैवत म्हणून आपले भावविश्व व्यापून असणारा गोपसखा कृष्ण आणि गोपींसहित अवघ्या योगीकुळाच्या अंतर्यामी चिरवसतीस असणारे कृष्ण हे तत्त्व या दोहोंतील सूक्ष्म साम्य आणि फरकही त्यासाठी नीट समजावून घ्यावा लागतो. ‘काळा-सांवळा’ हे ‘कृष्ण’ या संज्ञेचे दोन सरळ अर्थ. मात्र ‘ओढून घेणे’, ‘जिंकणे’ अशांसारख्या अर्थच्छटादेखील कृष्णनामाशी संलग्न आहेत, याचे भान आपल्याला असतेच असे नाही. निळोबारायांची एक ‘गौळण’ नेमके तेच सार बिंबवते आपल्या मनावर. मोठा मधुर प्रसंग निळोबारायांनी वर्णन केला आहे एका अभंगात. दुडदुड धावणारा बाळकृष्ण, ‘मला भूक लागली आहे, काही तरी खायला दे..’ म्हणून ऐन माध्यान्हीला दार ठोठावतो गोकुळवासी एका गोपीचे. मात्र, भुकाळू अशा त्या कृष्णतत्त्वाने कशाकशाचा घास अवचितच घेतला याचे मोठे चित्तवेधक वर्णन भक्षिलें संपत्ती विपत्तीचे भोग। कांहीं नुरवितां कोणाचाही भाग। अवघे भक्षूनियां नुरवी हा माग। नामरूप तेंही नेदीचि उरों सोंग वो अशा मोठय़ा अनुभूतीपूर्ण शब्दकळेद्वारे विदीत करते ती गोपिका. अद्वयबोधाचे अवघे सार एकवटलेले आहे या कथनात. दहीभाताचे घास भरवणाऱ्या गोपिकेच्या ठायी वसणारी अवघी द्वंद्ववृत्तीच त्या बाळकृष्णाने समूळ हरण केली! ‘कृष्ण’ या अधिष्ठानाची उभय रूपे निळोबाराय प्रगट करतात इथे. ‘निर्द्वद्वता’ हे होय ‘कृष्ण’ या तत्त्वाचे सार. ‘कृष्णलाघव’ म्हणतात तेही हेच. निळा म्हणे हा लाघवी हरी। कांहींही न करू नी अवघेंचि करीं। भक्तां द्वेषियां एकेचि परी। निंदा स्तुतीवरी सम देणें अशा शब्दांत निळोबाराय प्रतिपादन करतात ‘कृष्ण’तत्त्वाची तीच गाभाभूत द्वंद्वातीतता. निर्द्वद्व असणे अथवा राहणे हेच ब्रह्मचर्य! नाथांची निरपवाद साक्षच आहे तशी. हा आत्मा हे आत्मी पाहीं। ऐसें मिथुन मुळीं नाहीं। तें निजमूळ पाडितां ठायीं। ब्रह्मचर्य पाहीं अभंग ही नाथांची भागवताच्या तिसऱ्या अध्यायातील ओवी कमालीची उद्बोधक ठरते या संदर्भात. पुरुषाचा तो ‘आत्मा’ आणि स्त्रीची ती ‘आत्मी’ असा, आत्मतत्त्वाच्या संदर्भात लिंगभावाधारित भाषिक भेद कधी तरी करतो का आपण? अशा समतानुभूतीचेच नाव ब्रह्मचर्य योग. ही योगावस्था हाच ज्याचा स्थायीभाव तोच योगेश्वर कृष्ण.