– अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भावयुक्त भजनाद्वारे साधकाला अद्वयानुभूती प्राप्त होते, असे प्रतिपादन करत भजनरूपी सेवेचा अद्वयबोधाशी असलेला जैविक संबंध विशद करतात नाथराय. भजनामुळे उपासकाच्या अंत:करणात भाव निर्माण होतो, ही झाली पूर्वावस्था. तर, ‘ऐसा भजनेंचि देव केला। भक्त वडिल देव धाकुला’ अशी या कार्यकारणभावाची उत्तरावस्था नाथराय उलगडून मांडतात. भजनाद्वारे साधकाच्या उभ्या अस्तित्वात साकारणाऱ्या आमूलाग्र परिवर्तनाचे सम्यक स्वरूप नाथ विदित करतात अवघ्या आठ शब्दांत. ‘भाव’ या शब्दाचा एक अर्थ होय ‘सामर्थ्य’. प्रेमयुक्त भजनाच्या आळवणीने संतुष्ट झालेल्या अनाम, अरूप, निरुपाधिक अशा परतत्त्वाला भजनानंदाची अवीट लज्जत चाखण्याची असोशी अनिवार होऊन ते तत्त्व त्याच्या विश्वोत्तीर्ण अवस्थेचा विलय घडवून आणत देवत्व धारण करते. स्वत:च्या अप्रगट स्थितीचा त्याग करून ते इंद्रियगोचर बनते आणि साधकाच्या पुढय़ात साकारते. म्हणजे, एका परीने, भक्तच देवाला आकार बहाल करतो. निर्मिक हा निर्मितीपेक्षा श्रेष्ठ अथवा वडील ठरत असल्याने, साहजिकच, भक्तापुढे देव धाकला शाबीत होतो असे मोठे हृद्य आणि गोड विवरण सिद्ध करतात नाथराय या ठिकाणी. भज्य, भजक आणि भजन या त्रिपुटीचा संसर्ग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही इथे. साधकाच्या अंत:करणात भजनाद्वारे निपजणाऱ्या भावाचे सामर्थ्य हे असे बिनतोड होय. त्रिपुटीचा विटाळ अणुमात्र न होताही भजनानंदाची गोडी आकंठ उपभोगता येणे शक्य असल्याने एकच एक असणारे अंतिम तत्त्व देव आणि भक्त, भक्त आणि देव या उभय रूपांत आलटून-पालटून प्रगटपणे नांदत स्वत:शीच क्रीडत राहते, हा सारा आशय नाथांच्या अभंगोक्तीमध्ये सामावलेला आहे.                  ‘नवल भजनाचा भावो। स्वतां भक्तची होय देवो’ अशा शब्दांत नाथराय वर्णन करतात परतत्त्वाचा स्वत:शीच अविरत चालू असणारा तो भजनविलास. अखिल विश्वाचा स्थायिभाव असणाऱ्या याच अभेदाची अनुभूती येणे हीच भजनाची अंतिम परिणती अपेक्षित आहे नाथांना. भजनासाठी साधने अथवा वाद्यादी उपकरणे कोणती व किती वापरली आहेत यांपेक्षाही भजनाची निष्पत्ती नाथांच्या लेखी सर्वाधिक मोलाची होय. सार्वत्रिक अभेदाचा चिरंतन अनुभव ही होय संतमंडळाला अपेक्षित असलेली भजनाची फलश्रुती. ‘नैसर्गिक स्थिती’ अथवा ‘धर्म’ किंवा ‘स्वभाव’ वा ‘प्रकृती’ ही होत ‘भाव’ या शब्दाची अन्य अर्थातरे. अद्वयदर्शनानुसार दृश्य जगत हे एकमात्र अशा परमशिवाचे विलसन असल्यामुळे मुळात भेदाला जागाच नाही कोठे. अद्वयबोधाची बैसका दृढ असेल तर जगात सर्वत्र सदासर्वकाळ प्रचीती येत राहते ती अभेदाचीच. जगाच्या त्या वास्तव स्वरूपाचे आकलन होणे अथवा करून घेणे हा भजनाचा ठरतो अंतिम हेतू. आणि, जगाची नैसर्गिक स्थिती अथवा धर्म असलेल्या अभेदाची अनुभूती साधकाच्या ठायी चिरंतन स्थिर करणे, ही नाथांच्या लेखी, होय भजनाची अमोघ अशी शक्ती. ‘कायावाचा आणि मन। एक करूनी करीं भजन। हाचि मुख्य भजन भावो। सांडीं भेद अभेदाचा ठावो’ अशा विलक्षण मार्मिक शब्दांत नाथराय स्पष्ट करतात तेच अंत:सूत्र. सार्वत्रिक अभेदाची जाणीव अंत:करणात एकदा का बिंबली की द्वंद्व-द्वैताच्या भावनेचे अधिष्ठानच हरपते. अशी संपूर्ण, निरपवाद व निखळ निर्द्वद्वावस्था उपासकाला प्रदान करणे हेच भजनाचे सामथ्र्य. हाच तो भजन-भाव!

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh author abhay tilak musical instruments for bhajan zws
First published on: 26-10-2021 at 01:29 IST