– अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीमद्भगवद्गीता हे वेदांचे सुसेव्य रूप होय, असे ज्ञानदेवांचे प्रतिपादन. इथे ‘सुसेव्यता’ या संज्ञेचा ज्ञानदेवांना अभिप्रेत अर्थ ‘सर्वसमावेशकता’. वेदांद्वारे मूर्त झालेल्या अक्षरब्रह्माच्या माध्यमातून परब्रह्माच्या साधनेचा अधिकार तत्कालीन व्यवस्थेने नाकारलेल्या वर्णाच्या आत्मिक उन्नतीचा मार्ग महर्षी व्यासांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या माध्यमातून खुला आणि प्रशस्त केला, याबाबत ज्ञानदेव ऋण व्यक्त करतात व्यासांचे. भागवतधर्मी संत परंपरेच्या उपक्रमशीलतेद्वारे परमार्थाच्या लोकशाहीकरणाचे जे पर्व तेराव्या शतकापासून प्रकाशमान झाले, त्यांचा प्रेरणास्रोत ठरला तो गीताप्रणीत कर्मप्रधान भक्तियोग. भक्तीचे भागवत धर्माने प्रवर्तित केलेले शास्त्रही सुलभ आणि व्यापक होते. एकान्तापेक्षाही लोकान्तामध्ये आचरण करता येईल आणि  यावे असाच साधनक्रम पुरस्कारला त्या वैष्णवांनी. सर्वसंगपरित्याग करून वनी-कपारी समाधीसाधन करण्यापेक्षा जनसंपर्कात भजनाचा निनादता घोष अनुभवत भजन समाधीची लज्जत अविरत चाखणे अधिक प्रिय मानले या परंपरेने. पराकोटीची चंचल बुद्धी महत्प्रयासाने स्थिर करून चराचर व्यापणाऱ्या परतत्त्वाची अनुभूती अंत:करणात अविछिन्नपणे घेणे हा ‘समाधी’ या ‘योगसंकल्पने’चा गाभा. ही सहजच साध्य होणारी बाब नव्हे. मग कठोर इंद्रियनिग्रह आणि चित्तवृत्तीनिरोध ज्याला जमणार नाही त्याला समाधिसुखाचा अनुभव येणारच नाही का? इथे मदतीला येतात नामदेवराय. सर्वत्र अंतर्बाह्य़ व्यापून असलेल्या ‘हरी’तत्त्वाची अनुभूती टाळ- मृदंगाच्या गजरात कल्लोळणाऱ्या भजनामध्येही हस्तगत होते, असा दिलासा  नामा म्हणे सुफळ भजनचि करी। सर्वाभूती हरी भजनभावो अशा शब्दात देतात ते. भजन समाधी हे योग्यांच्या एकांत समाधीचे सुसेव्य रूप होय, हा मुख्य गाभा होय त्यांच्या या कथनाचा. परंतु त्याच वेळी एक मार्मिक मेखही मारून ठेवतात ते. ‘भाव’ या शब्दाचा एक अर्थ आहे ‘अवस्था’. दृश्यमान सृष्टीमध्ये सर्वत्र एका ‘हरी’तत्त्वाचे दर्शन प्रत्येक क्षणी होणे, हा ‘भजनभाव’ म्हणजे ‘भजन’ या क्रियेची परिणती असणारी ‘अवस्था’ हस्तगत झाली की भजनसेवा सुफळ झाली असे समजावे, असा इशारावजा सांगावा होय नामदेवरायांचा. म्हणजेच, बुद्धी सम होणे हा जो समाधियोगाचा गाभा तिथेपर्यंत साधकाला नेऊन पोहोचविणे हाच भजनसाधनेचा मुख्य हेतू. पर्यायाने समाधी हेच ठरते भजनाचे अंतिम  ध्येय आणि तीच भजनानंदाची सर्वोच्च परिणती! भजनाचा अधिकार सर्वानाच आहे. तिथे एकांताची अट नाही. ती तर अवघ्यांनाच सुसेव्य अशी समूह साधना.  लावूनि मृदंग श्रुति टाळघोष। सेवूं ब्रह्मरस आवडीनें  ही तुकोक्ती निर्देश करते भजनसमाधीच्या फलश्रुतीकडेच. समाधीच्या सुखामध्ये निमग्न योग्याला सतत श्रवण होत राहतो अनाहत नाद. अनाहत चक्राच्या ठायी अखंड चालू असणाऱ्या हृदयाचे ठोके कोणत्याही आघाताखेरीज होत असतात. तोच प्रकार अनाहत नादाचा. या नादानुसंधानामुळेच योग्याचे चित्त एकाग्र होत जाऊन त्याला अनुभूती प्राप्त होते परमानंदाची. त्या अवस्थेत मनाचाही विलय होऊन योगी स्थिर होतो ब्रह्मभावात. भजनामध्ये रममाण झालेल्या साध्याभोळ्या वारकऱ्याला तिथे उमटणाऱ्या टाळघोषात प्रचीती येते अनाहताची आणि त्या भजनसमाधीची परिणती होते तन्मयावस्थेमध्ये असा रोकडा दाखलाच आहे नामदेवरायांचा. अनुहात वाजती टाळ। अनुक्षीर गीत रसाळ।  अनुभव तन्मय सकळ। नामा ह्मणे केशव कृपाळू गा, हे नामदेवरायांचे प्रमाण म्हणजे सुसेव्य अशा भजनसमाधीयोगाचे शब्दांकनच जणू तंतोतंत!

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh author abhay tilak right to worship zws
First published on: 17-11-2021 at 03:41 IST