अभय टिळक agtilak@gmail.com

संतमहिमा गाणारा तुकोबारायांचा एक अप्रतिम अभंग आहे गाथेमध्ये. अभंग आहे अवघ्या तीनच चरणांचा. परंतु त्यांत ओतप्रोत भरलेला आशय मात्र आहे चांगलाच औरसचौरस आणि सखोल. संतांच्या पदांबुजांचे दर्शन झाल्यामुळे आपल्या तनमनाची झालेली अवस्था तुका म्हणे वाचा राहिली कुंटित। पुढें जालें चित्त समाधान अशा आशयगर्भ शब्दांत मांडतात तुकोबाराय तिथे. अतीव मार्मिक बोलतात महाराज या एकाच चरणामध्ये. चित्ताला समाधान लाभणे, ही तुकोबारायांच्या लेखी ठरते संतभेटीची पहिली खूण. ही खूण हेरायची ज्याची त्यानेच. मुख्य म्हणजे, संतविभूतींची भेट होऊन चित्त समाधान पावल्याची पुढील अंतर्खूण म्हणजे वाचा मावळणे, या तुकोबारायांच्या प्रतिपादनात अद्वयबोधाचा सारभूत गाभा समग्रपणे साठवलेला आहे. वाचा केवळ मौनावणेच नव्हे तर वाणीची वाटचाल विलयाकडे चालू होणे, हे बोधाचा दारवंटा समीप आल्याचे लक्षण गणले जाते. वाणी विरामावस्थेकडे सरकू लागते कारण बोधाच्या उंबरठय़ानजीक पोहोचले की मनाचा पोतच लागतो पालटायला. आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडणे ही शारीर पातळीवरील क्रिया होय. परंतु त्याआधी अंतर्विरोधात दोन सूक्ष्म घटना साकारलेल्या असतात. काही तरी बोलायचे आहे अथवा सांगायचे आहे अशा ऊर्मीचा तरंग प्रथम उमटतो मनाच्या पृष्ठभागावर. त्याला विचाराचे आवरण चढते बुद्धीच्या माध्यमातून आणि बाह्य विश्वात तो विचार साकारतो वैखरीवाणीद्वारे. पण मुळात मन:पटलावर ऊर्मीचा तरंगच उठला नाही तर ? काही तरी व्यक्त करण्याची प्रेरणा ठायीच जिरायला लागली की प्रथम मौनावते ते मन. ज्ञानदेवांच्या धाकटय़ा बंधूंनी, म्हणजे सोपानदेवांनी, या संदर्भातील त्यांचा नेमका तोच अनुभव सोपान तिष्ठत रामनामीं लीन। मन तेथें मौन्य एकपणें अशा दिव्य शब्दांमध्ये प्रगट केलेला आहे. मनाच्या ठायीच मौन्य साकारावे, ही कल्पनाही झेपणार नाही आपल्याला. विश्वात्मक शिवतत्त्वाशी समरस झालेल्या मनाला अंतर्बाह्य एकत्वाची अनुभूती आल्यामुळे ‘मी-तू’ हा भाव मावळला आणि ‘दुसरा’ असा कोणी चराचरात आता शिल्लकच राहिलेला नसल्याने वैखरीद्वारे काही प्रगट करण्याची गरजच अप्रस्तुत बनली, हा होय इत्यर्थ सोपानदेवांच्या कथनाचा. अद्वयबोधाची परिपूर्ण स्थिती हीच म्हणायची. या अवस्थेमध्ये शब्द अप्रस्तुत ठरण्याचाही मग प्रश्न उरत नाही. कारण, त्या स्थितीमध्ये मुदलात विलय घडून आलेला असतो वाणीचाच. ही अ-साधारण अवस्था नेमकी कशी अवतरते याचे नितांत रम्य स्पष्टीकरण देहासवे हातपाये। जाती मनासवे इंद्रिये। कां सूर्यासवे जाये। किरणजाल अशा उद्बोधक शब्दांत मांडतात ज्ञानदेव ‘अनुभवामृता’च्या तिसऱ्या प्रकरणामध्ये. अद्वयबोधाचे पूर्ण अधिष्ठान अंत:करणात स्थिर झाले की अज्ञानाचे ठाणे अस्तित्वामधून पाय काढता घेते. मात्र, अज्ञान एकटे जात नाही तर ते वाणीलाही बरोबर घेऊ न जाते, असा आहे ज्ञानदेवांचा सांगावा. मावळतेवेळी सूर्य आपल्या किरणांचा आसमंतात पसरलेला पसारा घेऊन अंतर्धान पावतो, तशीच होय ही प्रक्रिया. वाणीचाच विलय घडून आल्याने हे सारे बोलून दाखवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हे अवस्थांतर जाणायचे असते केवळ खुणांद्वारे. त्या खुणाही उमगत नाहीत येरागबाळय़ाला. ते सामर्थ्य योग्यांचेच. तुका म्हणे तेंहि वाचे बोलवेना। योगियाची खुणा योगी जाणे इतक्या थेट आणि निरपवाद शैलीत तुकोबाराय तेच तर सांगत आहेत आपल्याला.

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री