विश्व-मंदिर

दैनंदिन लोकव्यवहाराद्वारे अभिव्यक्त होणाऱ्या त्या दर्शनाचा अन्वयार्थ लावण्यासाठी उभारावा लागतो शब्दांचा व्यापार.

loksatta advayabodh article abhay tilak

अभय टिळक agtilak@gmail.com

निरोपाची पानसुपारी शब्दांना दिल्यानंतरच अद्वयबोधाच्या गाभाऱ्यात पाऊल घालणे शक्य होण्यामागे कारण आहे. रोजचा लौकिक व्यवहार सापेक्षतेने व्यापलेला असल्यामुळेच शब्दांखेरीज आपले पानही हलत नसते. अद्वयबोधाच्या साम्राज्यात सापेक्षतेचेच विसर्जन घडत असल्याने शब्द, भाषा, विचार या बाबी तिथे ठरतात अप्रस्तुत. विश्वात्मक प्रगटीकरणाद्वारे घडणाऱ्या परतत्त्वाच्या दर्शनाला शांभवाद्वय ‘आभास’ असे संबोधन बहाल करते. ‘किंचित दर्शन’ हा ‘आभास’ या संकल्पनेचा शैवागमाच्या विचारव्यूहातील अर्थ. दैनंदिन लोकव्यवहाराद्वारे अभिव्यक्त होणाऱ्या त्या दर्शनाचा अन्वयार्थ लावण्यासाठी उभारावा लागतो शब्दांचा व्यापार. मात्र, अद्वयबोधाच्या गाभाऱ्यात प्रवेशले की प्रश्नच उरत नाही ‘आभासा’चा. त्याच जाणिवेमध्ये स्थिरावलेल्या तुकोबांच्या मुखातून निराभासी पूर्ण जालों समरस। अखंड ऐक्यास पावलों आम्ही असे उद्गार उमटावेत, हे स्वाभाविकच. निखळ सामरस्याच्या त्या अवस्थेत ‘भक्ती’लाही मग निराळीच अर्थवत्ता लाभते. किंबहुना, अणुरेणू व्यापून प्रगटलेल्या परमशिवाशी परमैक्य साधलेल्या त्या अवस्थेमध्ये सापेक्षतेचा मागमूसच नसल्याने भक्ती केली काय अथवा न केली काय, भजन केले काय अथवा न केले काय यासारख्या बाबीही ठरतात अप्रस्तुत. म्हणोनि भजतां भजावें। मा न भजतां काय नव्हे। ऐसें नाहीं स्वभावें। श्रीशिवुचि या शब्दकळेद्वारे ज्ञानदेव वर्णन करतात अस्तित्वाची ती कोटी ‘अनुभवामृता’च्या नवव्या प्रकरणामध्ये. उपाधीचा डाग किंचितही लागलेला नसल्याने तो अवघाच आसमंत असतो निरंजन. अद्वयबोधामुळे उभे अस्तित्व परिष्कृत बनलेला अद्वययोगी निरंतर निवासासाठी निवडतो तोच ठाव. निरंजनीं आम्ही बांधियेलें घर। निराकारी निरंतर राहिलों आम्ही असा तुकोबा सांगतात त्यांच्या तिथे बांधलेल्या घराचा पत्ता. ‘मी’ आणि ‘मी’च्या सापेक्ष उद्भवणारा ‘तू’ या उभय उपाधींचा प्रादुर्भाव अणुमात्रही नसल्याने तिथे नांदते केवळ आणि केवळ परमशुद्धी. अशी साधनापूर्वक हस्तगत केलेली शुद्धी हीच ठरते अनिवार्य पूर्वअट परतत्त्वाशी तादात्म्य पावण्याची. त्या स्थितीच्या वर्णनासाठी अद्वयदर्शनाच्या परिघात संज्ञा योजली जाते ‘भक्ती’ ही. अद्वयातील अशा भक्तीच्या प्रांतातील देव, देऊळ, भक्त, पूजा साहित्य, पूजोपचार सगळे काही पूर्ण एकात्म आणि एकरस असेच. भिन्नत्वाचा डाग इतकाही नाही कोठे. देव देऊळ परिवारू। कीजे कोरुनि डोंगरू। तैसा भक्तीचा व्यवहारू। कां न व्हावा असा प्रश्न विचारत ज्ञानदेव आपल्याला एकाच वेळी उद्बोधित आणि उद्युक्त करतात अद्वयाच्या प्रदेशातील भक्तीचे आगळेपण अनुभवण्यासाठी. एकाच अखंड कातळातून देवळाचा जिवंत देखावा साकारावा, असाच हा भक्तिव्यवहार. सापेक्षतेच्या साऱ्या वाती शांत केलेले असे ते राऊळ उजळलेले असते अद्वयबोधदीपाने. आतां भक्ति अभक्ति। ताट जालें एके पांतीं। कर्माकर्माचिया वाती। माल्हावूनियां अशा शब्दांत ज्ञानदेव वर्णन करतात सामरस्याच्या तेजात न्हायलेल्या त्या मंदिराचे. अनेकविध माध्यमांतून आत्मप्रतीतीसाठी लाचावलेले शिवतत्त्वच विश्वाकार होऊन प्रगटल्याने उभ्या विश्वालाच लाभते पावित्र्य मंदिराचे. झाला देवोचि भक्तु। ठावोचि झाला पंथु। होऊ नि ठेला एकांतु। विश्वाचि हें अशा दिव्य शब्दकळेद्वारे ज्ञानदेव वर्णन मांडतात त्या अलौकिक  मंदिराचे. अद्वयबोधाची उपासना करायची ती त्याच मंदिरात निरंतर विसावण्यासाठी.

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta advayabodh author abhay tilak temples devotees worship zws

Next Story
शब्दमर्यादा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी