– अभय टिळक agtilak@gmail.com
गीताटीकेच्या निर्मितीस प्रवृत्त होताना, देव्हाऱ्यात अगर मखरात विराजमान होऊन मोदकांचा नैवेद्य स्वीकारणारा गणराज ज्ञानदेवांना अभिप्रेत नाही. त्यांनी ग्रंथारंभी नमन आरंभले आहे ते अक्षरब्रह्माचे. नाम-रंग-रूपात्मक दृश्य जग म्हणजे ‘ॐ’ या ध्वनिबीजाचाच विस्तार होय, अशी पूर्वापारची धारणा असल्यामुळे ‘ॐ’ हेच वर्णमालेतील अक्षरांचे आद्यबीज समजले जाते. ‘ज्ञानेश्वरी’च्या प्रारंभास ज्ञानदेव नमन करतात ते शब्दगणेशाला. गणराय हे तर मूर्तिमंत विद्येचे अधिपती आणि दैवत. साहजिकच, त्यांच्या अंगकांतीद्वारे सूचन घडते ते अंतर्बाह्य़ ज्ञानोपासकाचे. नेमक्या त्याच भूमिकेतून ज्ञानदेव बघतात बाप्पांकडे. ज्ञानाची उपासना हा झाला अवघ्या ज्ञानव्यवहाराचा केवळ एक भाग. कष्टपूर्वक संपादलेले ज्ञान पचविणे, रिचवलेले ज्ञान डोळसपणे व्यवहारात उपयोजणे या झाल्या ज्ञानव्यवहाराच्या पुढील पायऱ्या. ज्ञानोपासकांची खरी कसोटी लागते ती तिथेच. त्यांमुळे, निखळ ज्ञानोपासक आणि अर्जित ज्ञान आपल्या उभ्या अस्तित्वात मुरविलेला ज्ञानवंत यांची लक्षणे गणनायकाच्या अंगोपांगांद्वारे कशी प्रगटतात याचे रमणीय विवेचन म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’च्या सुरुवातीचे गणेशवंदन. असंभाव्य अशा शब्दनिधीमध्ये विहार करताना विवेकमय दृष्टीचा अवलंब अपरिहार्यच ठरतो. अनंत आणि अपार ज्ञाननिधीतील कोणते ज्ञानबिंदू कसे व किती टिपायचे याचे तारतम्य विचारपूर्वक जोपासणे प्रत्येकच ज्ञानोपासकाला अनिवार्य ठरते. हा झाला केवळ एक भाग. संचित ज्ञानाची परिणती विवेकशीलतेमध्ये घडून आली नाही तर काय उपयोग? तसेच ज्ञान व माहिती यांचे व्यवहारातील उपयोजनही विवेकपूर्वकच केले गेले पाहिजे. गणाधीशाची सरळ अशी सोंड ज्ञानी व्यक्तीच्या ठायी अपेक्षित असलेल्या तशा सघन विवेकशीलतेचे सूचन घडविते, हे ज्ञानदेव, देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा अशा विलक्षण उद्बोधक शैलीत मनावर ठसवतात. विवेकाचा स्पर्श झालेली बुद्धी स्वरूपत:च निर्मळ, शुद्ध आणि म्हणून सरळमार्गी असते, हे ज्ञानदेव  इथे स्पष्ट करतात. शब्दज्ञानाची उपासना डोळसपणे केल्याने प्राप्त होणारे महासुख परमानंदकारक असते, हे ज्ञानदेवांचे कथन, शब्दाभ्यासाची एक आगळी शिस्त आणि निर्लेप शब्दोपासनेची सुखानंदामध्ये अपेक्षित असलेली फलश्रुतीच अधोरेखित करते. असा विवेकशील ज्ञानवान एकाकी आयुष्य कधीच व्यतीत करत नसतो. समाजमनाशी त्याचा  बहुस्तरीय संपर्क व संवाद अव्याहत चालू राहतो. नीरक्षीरविवेकपूर्वक साकारणारी उक्ती आणि कृती हाच ज्याचा स्थायीभाव असतो अशा लोकाभिमुख विवेकवंताच्या लोकसंवादाची जातकुळी गजाननाच्या शुभ्र दाताच्या मोठय़ा मार्मिक रूपकाद्वारे ज्ञानोबाराय विदित करतात. तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ही ज्ञानदेवांची ओवी या संदर्भात पराकोटीची मननीय होय. विवेकजन्य समता हा अशा लोकाभिमुख ज्ञानी व्यक्तीचा स्वभावधर्म बनलेला असल्याने भवतालाशी त्याचा नितळ संवाद सहजच प्रस्थापित होत राहतो. अशा संवादाद्वारे ‘स्व-पर’ हिताची जपणूक सदैव होत राहावी यासाठी सजग असणाऱ्या त्या विवेकवंतांच्या सूक्ष्म व सर्वसंचारी बुद्धिमत्तेचे निदर्शक म्हणजे गणनायकाचे लघुनेत्र होत, असे आहे प्रतिपादन ज्ञानदेवांचे. पार्थिव गणेशप्रतिमेच्या माध्यमातून अपार्थिव अशा शब्दगणेशाचे आराधन करण्याची हातोटी अशी शिकवतात ज्ञानदेव आपल्याला.