अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुकोबा हे एक अद्भुतच रसायन. उपमाच नाही देता येत दुसरी. सव्यसाची धनुर्धराने भात्यातून एखादा अमोघ बाण अवचितच उपसावा तसे अणुकुचीदार आणि आपल्याला क्षणार्धात अंतर्मुख करणारे प्रश्नरूपी बाण तुकोबा कमालीच्या अलगदपणे सोडतात आपल्यावर. गाथा चाळता चाळता अगदी अचानकच असा एखादा अभंग किंवा अभंगातील एखादा चरण पुढय़ात उभा ठाकतो की पार हडबडूनच जायला होते आपल्याला. ‘तीर्थासी जाऊनि तुवां काय केलें। चर्म प्रक्षाळिलें वरी वरी’ हा असाच अभंगातील एक चरण नेमका याच कोटीतील. तीर्थयात्रेस गेल्यानंतर पुण्यपावन गणल्या गेलेल्या तिथल्या तीर्थात स्नान करणे हा तसा सगळ्यांच्याच परिचयाचा असणारा नित्याचा विधी. अगदी स्वाभाविकपणे सहज आचरला जाणारा. परंतु ‘‘तीर्थामध्ये बुडी मारून तू काय केवळ शरीराचे चामडे तेवढे धुतलेस; पण तुझ्या अंत:करणाचे काय? तिथे साचून राहिलेला मळ तीर्थात शरीर खळबळून काढल्याने गेला का?’’ असा टोकदार प्रश्न तुकोबा विचारतात तेव्हा काय उत्तर असते आपल्यापाशी? उत्तर नसावे हे अपेक्षितच आहे. कारण सोपे आहे. तीर्थामध्ये स्नान करून नेमके काय स्वच्छ धुवायचे याबद्दलच आपण गाफील असतो, हे झाले एक. आणि दुसरे म्हणजे अंत:करण निर्मळ करायचे असेल तर शरीरशुद्धीच्या बाह्य़ कर्माला आणखी कोणत्या आंतरिक कृतीची जोड पुरवायची असते याबाबत तर आपण पूर्णत: अनभिज्ञच असतो आणि राहतो. तराजूची दांडी सरळ ठेवत असतानाच महाभारतातील तुलाधार वैश्याच्या मनालाही सरलत्व प्राप्त झाले, कारण तोलाईच्या बाह्य़ कर्मात तुलाधाराने त्याचे चित्त ओतलेले होते. शरीराच्या स्तरावर बाह्य़ कर्माचरण चालू असताना त्या कर्माचा इष्ट व अपेक्षित परिणाम अंत:करणावर घडून येण्यासाठी आंतरिक पातळीवर त्याला ज्या क्रियेची जोड पुरवावी लागते तिला म्हणतात ‘विकर्म’! श्रीमद्भगवद्गीतेमधील तिसऱ्या व चौथ्या अध्यायांदरम्यानची आंतरसंगती स्पष्ट करतेवेळी ‘विकर्म’ ही संज्ञा वापरतात विनोबाजी. बाह्य़ कर्माला तितकीच पूरक अशा विकर्माची आंतरिक जोड नसेल तर तिथे साकारते निव्वळ शुष्क कर्मकांड, हेच आहे इथे अध्याहृत. ‘त्रिवेणीसंगमी नाना तीर्थे भ्रमी । चित्त नाहीं नामीं तरी ते व्यर्थ’ असे मार्मिक निरीक्षण ‘हरिपाठा’मध्ये नोंदविणारे ज्ञानदेवही इशारा करत आहेत तो कर्म आणि विकर्म यांच्या साहचर्याकडेच. नामचिंतन हे विकर्म होय, हेच सुचवत आहेत ज्ञानदेव इथे. त्रिवेणी संगमात स्नान करणाऱ्या यात्रिकाने नामस्मरणाच्या विशुद्ध आंतरिक प्रवाहात खळबळून त्याचे चित्तही जर निर्मळ बनविले नाही तर ते तीर्थाटन व्यर्थच नव्हे का, अशी आहे ज्ञानदेवांची सूचक विचारणा. यज्ञयागादी होमकृत्यांचा घाट यथासांग घालणाऱ्या, परंतु होमकुंडात हवन नेमके कशाचे करायचे याचाच पत्ता नसलेल्या याज्ञिकांना ‘तीळ जाळिले तांदुळ। काम क्रोध तैसेचि खळ’ अशा शेलक्या शब्दांत भानावर आणणाऱ्या तुकोबांचा कटाक्ष पुन्हा आहे तो विकर्माची सम्यक् जोड कर्माला पुरविण्यावरच. कर्म आणि विकर्माची सांगड नसेल तर वरकरणी धर्माचरण भासणारे सारे कर्मकांड अंतिमत: नि:सत्वच शाबीत होते, हेच, ‘तुका ह्मणे चुकलें वर्म। केला अवघाची अधर्म’ इतक्या सडेतोड शब्दांत बजावणाऱ्या तुकोबांचे आपल्याला आवाहन आहे ते कर्माइतकेच विकर्माबाबतही दक्ष राहण्याचे. देणार का त्याला प्रतिसाद आपण?

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh holy ritual zws
First published on: 26-05-2021 at 00:24 IST