अभय टिळक

जे. कृष्णमूर्ती यांची एक विलक्षण आठवण एका मुलाखतीदरम्यान पुपुल जयकर यांनी कथन केली होती. कृष्णमूर्ती यांच्याशी प्रदीर्घ काळ स्नेह होता पुपुल जयकर यांचा. आपले सगळे जगणे कसे व किती स्वकेंद्रित असते, याबद्दल नित्याच्या विवेचनादरम्यान कृष्णमूर्ती यांनी एकदा भाष्य केले. श्रोत्यांमध्ये पुपुल जयकर बसलेल्या होत्या. व्याख्यान आटोपल्यानंतर कृष्णमूर्ती यांच्याशी इकडचे-तिकडचे बोलताना पुपुल जयकर यांनी- ‘स्व’रहित जगणे ही खरोखर केवळ कठीणच नव्हे तर जवळपास किती अशक्यप्राय अशी गोष्ट आहे, अशा आशयाचे एक विधान केले. कृष्णमूर्ती जवळच बसलेले होते. ‘स्व’चे पूर्ण विसर्जन घडवून आणून दैनंदिन जीवन जगणे ही अक्षरश: असाध्य बाब हस्तगत व्हावी अशी अपेक्षा तरी तुम्ही कशी धरता, असा प्रश्न पुपुल जयकर यांनी विचारताच, शेजारी बसलेल्या कृष्णमूर्ती यांनी विलक्षण मायेने पुपुल जयकर यांचा हात आपल्या हातात घेतला व कमालीच्या स्नेहाद्र्र नजरेने त्यांना न्याहाळत प्रेमभावाने भिजलेल्या स्वरात कृष्णमूर्ती उत्तरले, ‘‘होय, पुपुल ती असाध्य गोष्टच साध्य करण्याचा आग्रह मी धरतो आहे..’’ सगळी मेख आहे ती नेमकी इथेच! आपण कोणी तरी वेगळे आहोत या कल्पनेतच ‘स्व’च्या जाणिवेचे बीजारोपण होते व तिथेच ‘आप-पर’ या भावनेचा पहिला हुंकार उमटतो, असा सांगावा आहे मुक्ताबाईंचा. ‘‘एक आपण साधु जालें। येर कोण वायां गेलें।’’ असा अतिशय टोकदार प्रश्न, कुटीचे दार लावून आत बसलेल्या ज्ञानदेवांना विचारतात मुक्ताबाई. अद्वयाच्या दृष्टीने बघितले तर विश्वात सर्वत्र अनुभूती येईल साधुत्वाचीच. मात्र, आपण साधू आहोत म्हणजे इतरांपेक्षा कोणी तरी वेगळे आहोत, असा ग्रह मनामध्ये पक्का झाला की द्वैताचा घाला पडलाच म्हणून समजा, असे अंजन ज्ञानदेवांचे निमित्त करून तुमच्यामाझ्या डोळ्यांमध्ये घालतात मुक्ताई. भेद हा अपार विविधतेने नटलेल्या विश्वाचा स्थायिभावच होय. अद्वयाचे लेपन दृष्टीला असेल तर सृष्टीमध्ये अंतर्बाह्य़ सर्वत्र एका परमशिवाचीच अनुभूती येईल. परंतु ‘स्व’चा सवतासुभा मांडला रे मांडला की द्वैताची झडप पडलीच म्हणून समजावे, हे वर्म निवृत्तिनाथ- ‘‘करितां उपाधि द्वैत तें उपजे’’ अशा मार्मिक भाषेत उघड करतात. निवृत्तिनाथांचे हे वचन अत्यंत महत्त्वाचे आहे. द्वैतभावनेचा उगम नेमका होतो तरी कोठे आणि कसा, याचे रहस्य ते उकलून सांगतात. ‘उपाधी’ या संज्ञेला अर्थाचे अनेक पदर-उपपदर जडलेले आहेत. ‘उपाधी’ या संकल्पनेचा एक अर्थ आहे ‘लचांड’ असा. स्वत:बद्दलच्या अचाट कल्पनांचे लचांड चिकटवून घेतले की त्यातून द्वैताचा उगम हा ठरलेलाच असतो, असा कार्यकारणभाव निवृत्तिनाथ स्पष्ट करतात. ‘उपाधी’ या शब्दाचे ‘त्रास’, ‘अडचण’, ‘आपत्ती’, ‘संकट’ हेही अन्य अर्थ होत. म्हणजे हे दुष्टचक्रच जणू. उपाधीमुळे द्वैताची निर्मिती आणि द्वैतातून निपज पुन्हा उपाधीचीच. यातून सुटकाच नाही. समाजशिक्षकाचे व्रत अंगीकारलेल्या संतविभूतींना तरी या दुष्टचक्राचे फटके बसू नयेत म्हणूनच- ‘‘कल्पनेची बाधा न हो कोणे काळीं। हे संतमंडळी सुखी असो।’’ असे पसायदान नामदेवरायांनी पांडुरंगाकडे मागितले असले पाहिजे.

agtilak@gmail.com