‘कानडा’ आणि ‘मऱ्हाटा’ ही दोन्ही विशेषणे सर्वार्थाने शोभून दिसतात पंढरीनिवासी श्रीविठ्ठलाला. ‘कानडा’ ही संज्ञा एकीकडून प्रदेशवाचक, तर दुसरीकडून स्वभाववाचक होय. तर ‘मऱ्हाटा’ हे विशेषण संबंधित आहे ते विठ्ठलाच्या पूर्वावतारातील कर्तृत्वाशी. ‘दुबरेध’ हा झाला ‘कानडा’ या शब्दाचा एक अर्थ. पुंडलिकरायाच्या भक्तिप्रेमाने वेडावलेला विठ्ठल मौन धरून विटेवर उभा ठाकल्याने त्याचे अंतरंग उकलणे दुबरेध होऊन बसते, या आशयाचे सूचन, ‘वेडावला वेडावला। उभा ठेला मौन्यचि’ अशा शब्दांत नाथराय घडवतात. तर विठ्ठलाचे कानडे बोल पुंडलिकरायाला उलगडत नसल्याने २८ युगे दोघांमध्ये बोलाचालीच नाही, अशी मोठी लाघवी आणि गोड उपपत्ती ‘विठ्ठल कानडें बोलूं जाणे। त्याची भाषा पुंडलीक नेणे। युगें अठ्ठावीस झालीं। दोघां नाहीं बोला बोली’ अशा लडिवाळ शैलीत पुरवतात नामदेवराय. सर्वसामान्य उपासकाला नाही उमजत दुबरेध भाषा. त्याला उलगडा अपेक्षित असतो स्पष्ट आणि सुगम शैलीमध्ये. तुमची-आमची अवस्था असते अर्जुनासारखी. आपल्या आकलनाच्या पलीकडे असणाऱ्या काही गोष्टी जाणत्या व्यक्तीला पुसाव्यात आणि तिने जडजंबाल भाषेत विद्वत्प्रचूर विवरण केल्यानंतर अधिकच गोंधळात पडून आपण परत यावे, यात काय हशील? अशीच नेमकी अवस्था झालेला अर्जुन म्हणूनच श्रीमद्भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात त्याचा सखा असणाऱ्या कृष्ण परमात्म्याला ‘म्हणोनि आइकें देवा। हा भावार्थु आतां न बोलावा। मज विवेकु सांगावा। मऱ्हाटा जी’ असे स्वच्छ सांगून मोकळा होतो. ‘स्पष्ट’, ‘सोपे’, ‘सुगम’ हे आहेत अर्थ ‘मऱ्हाट’ अथवा ‘मऱ्हाटे’ या संज्ञेचे. विवेकाच्या चार गोष्टी समजावून घेण्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो आहे, तेव्हा मला समजेल अशा सोप्या, स्पष्ट शब्दांत माझे अजाणतेपण दूर कर, ही अपेक्षा आहे अर्जुनाची. सर्वसामान्यांना आकळता यावे असे सुलभच असले पाहिजे लोकदैवत. श्रीविठ्ठल हा आमचा ‘लोकदेव’ आहे तो याच अर्थाने. किंबहुना, वेदश्रुतींनाही अगम्य असणारे परब्रह्म पुंडलिकरायांसारख्या भक्तराजाने सर्वसामान्यांसाठी सहजसाध्य बनविले, असा निर्वाळा देणारे ‘अनिवाच्र्य ब्रह्म निगम ह्मणती। शिणलें वेवादती अठरा साही। तें हें पुंडलिकें चोहोटां उभें केलें। भावें भुलविलें पंढरीये’ हे नामदेवरायांचे बोल एकाच वेळी विठ्ठलदेवाचे सुगमत्व आणि भक्तीचे सामर्थ्य विदित करतात. किंबहुना, जनसामान्यांच्या पुढय़ात उघड प्रगट होण्यामुळेच विठ्ठलाच्या देवत्वाला अनुपम झळाळी प्राप्त झालेली आहे, अशी पुस्ती ‘उघडा विठ्ठल विटेवरी उभा। अनुपम्य शोभा दिसतसे’ अशा शब्दांत नाथराय जोडतात, त्यामागील रहस्य हेच. उघड प्रगटण्याद्वारे सोपा बनलेला असला तरी पूर्वावतार असणाऱ्या बालकृष्णाचा खटय़ाळपणा विटेवरच्या विट्ठलातही डोकवतोच, अशी साक्ष आहे दस्तुरखुद्द ज्ञानदेवांची. ‘लबाड’ हाही एक अर्थ आहे ‘कानडा’ या शब्दाचा. घोंगडय़ाची लांब-रुंद खोळ डोईवर घेऊन एकीकडे स्वत:चे रूप झाकायचे आणि त्याचवेळी पाव्याच्या सुरांद्वारे आपल्या अस्तित्वाच्या खुणा पालवत राहायचे, असा हा चांगला पक्का लबाड आहे, हेच तर सांगत आहेत ज्ञानदेव- ‘कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु। येणें मज लावियेला वेधु। खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी। आळविल्या नेदी सादू’ अशा भावमधुर शब्दांत आपल्याला. उघडा लोकमंत्र विठ्ठल आणि उघडाच विठ्ठलराय हे लोकदैवत असा हा समसमा संयोग होय.

– अभय टिळक

agtilak@gmail.com