अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आषाढीची पंढरीवारी म्हणजे संतांची माहेरभेटच जणू! भागवत धर्माची पताका मिरविणाऱ्या वारकरी सांप्रदायिकांचे आराध्य दैवत असणारा श्रीविठ्ठल हा- आमच्या जनाबाईमाउलींनी त्याला बहाल केलेले विशेषण उसने घ्यायचे तर- ‘लेकुरवाळा’ देव! जसा हरी तसेच त्याचे दास, या तुकोबांनीच सिद्ध करून ठेवलेल्या न्यायानुसार आमचे संतही त्यांच्या आराध्य दैवताप्रमाणे लेकुरवाळेच होत. माहेराला निघालेली माहेरवाशीण आपली लेकरेबाळे सासरी सोडून एकटीच माहेरी जाईल, हे कधी तरी संभवते का? अगदी त्याच न्यायाने, अपार वारकऱ्यांचा मेळा संगे घेऊन संतांची मांदियाळी पंढरीक्षेत्राकडे प्रस्थान ठेवत असते. त्या प्रवासाचेच नाव ‘वारी’. माहेरी पोहोचल्यानंतर आईबापासंगे एकदा का माहेरवाशीण गुजगोष्टींमध्ये रममाण झाली, की तिची लेकरे हुंदडायला मोकळी. चंद्रभागेचे वाळवंट हे तर या लेकरांचे खेळण्या-बागडण्याचे हक्काचे ठिकाण. ज्ञानदेव, नामदेवराय, नाथबाबा, आमचे तुकोबाराय हे सगळे मातबर खेळिये. वाळवंटात दंगामस्ती करायची ती खेळातील निखळ आनंद लुटण्यासाठीच. तिथे जाऊन मिळवायचे तर काहीच नाही आणि नसते. अद्वयानंदाच्या गोळीबंद पाकात घोळलेल्या अक्षय आनंदाचे लाडू मनसोक्त खावयास मिळत असताना मोक्ष-मुक्तीसारख्या चिल्लर वानवळ्याचे अप्रूप वैष्णव डिंगरांना वाटावे तरी का आणि कशासाठी? बघतही नाही वाळवंटात दीनवाणे तोंड घेऊन फिरणाऱ्या मोक्षाकडे कोणीसुद्धा. ‘‘मुक्तिपद देतां न घे फुकासाठीं। तें हिंडे वाळुवंटीं दीनरूप।’’ अशा शब्दांत नाथराय अगतिकता वर्णन करतात, वाळवंटात एकही गिऱ्हाइक नसलेल्या ‘मोक्ष’नामक किरकोळ मिठाईची. हरिदासांना अणुमात्रही आकर्षण नसलेला मोक्ष, अखेरीस हिरमुसला होऊन योग्यांचे दरवाजे ठोठावतो, असे मोठे मनोज्ञ व उद्बोधक वर्णन- ‘‘योगियांचें घर रिघे काकुलती। अव्हेरिलें संतीं म्हणोनियां। दोन्ही कर जोडूनि मोक्ष पाहे वास। म्हणे होईन दास हरिदासाचा।’’ अशा अर्थगर्भ शब्दांत करतात नामदेवराय. पंढरीक्षेत्राचे असाधारणत्व पुन्हा एकवार अधोरेखित होते या ठिकाणी. केवळ पंढरीचेच नव्हे, तर पंढरीनाथाच्या लेकरांचेही अवघे अलौकिकत्व एकवटलेले आहे इथे. मोक्षप्राप्ती हा तीर्थयात्रेमागील एक पुरातन हेतू. पंढरीच्या वारकऱ्याला मोक्षाची मातबरीच वाटत नाही मुदलात. का आणि कशामुळे वाटावी? बंध व मोक्ष या सापेक्षतेच्या कुंपणापलीकडे पोहोचलेला असतो विठ्ठलोपासक. निदान, तशी अपेक्षा तरी आहे व असते. ‘द्वंद्व’ नावाची चीज परिघातच प्रवेशत नाही विष्णुदासांच्या. ‘‘मुक्त कासया म्हणावें। बंधन तें नाहीं ठावें।’’ ही तुकोक्ती म्हणजे खणखणीत साक्षच होय त्या द्वंद्वातीततेची. जो बंधनात असेल त्याच्या पोटी वसावी असोशी मोक्षमुक्तीची. मोक्षप्राप्ती हा वारीचा हेतूच नव्हे मुळात. मोक्षाची वाट बघत टुकत बसणे हे स्वभावात बसतच नसते वैष्णवांच्या. उलट, विठ्ठलाचे प्रेमिक मला कधी भेटतील, अशी ओढ लागून राहते मोक्षालाच. ‘‘संसार तो तयांचा दास। मोक्ष तें पाहातसे वास। रिद्धिसिद्धि देशवटा त्रास। न शिवती यास वैष्णवजन।’’ अशा शब्दांत तुकोबाराय गर्जून सांगतात नि:संगपण वैष्णवांचे. जन्म घेणे हे ज्याला संकट वाटते त्याने करावी आराधना मोक्षमुक्तीची. घ्यावा त्रिदंडी संन्यास त्यासाठी. मात्र, ‘मोक्ष’ संकल्पनेचा संसर्ग मनबुद्धीला कदापिही न होऊ देण्याचा ‘मोक्षसंन्यास’ ज्यांनी स्वीकारलेला आहे त्यांची बातच निराळी. हीच तर खासियत अद्वयबोधाची!

 

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh moksha sanyasa devotee of vitthal zws
First published on: 15-07-2021 at 01:04 IST