अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘धारणा’ हा शब्द आहे मोठा वैशिष्टय़पूर्ण. अष्टांगयोग आणि समाजव्यवहार या दोन्ही प्रांतांत चालते त्याची सद्दी. ‘एकाग्रता’, ‘एकत्रित करणे’, ‘स्थिर करणे’ अशा विविध अर्थच्छटा लाभलेल्या आहेत या संज्ञेला अष्टांगयोगाच्या क्षेत्रात. तर ‘योग्य पद्धत’, ‘सरळ मार्गाचा दृढ अवलंब’ यांसारखे अर्थातराचे पदर त्याला लगडलेले दिसतात समाजव्यवहाराच्या प्रांतात. योगाच्या परिक्षेत्रात उपयोजन घडत असताना ‘धारणा’ ही संकल्पना निर्देश करते मनोव्यापारांच्या नियमनाकडे. तर लोकव्यवहाराच्या संदर्भात ‘धारणा’ ही संज्ञा सूचन घडविते आचरणाबाबतच्या सूक्तासूक्ततेचे. ‘धर्म’ या संकल्पनेचे जैविक नाते धारणेशी जुळलेले असावे, या वस्तुस्थितीचे आता मात्र आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ‘धारणा करतो तो धर्म’ ही तर ‘धर्म’ या संकल्पनेची प्रख्यात आणि प्रतिष्ठित व्याख्या. ‘लोकसंस्था’ अशी जी मोठी गोड आणि तितकीच अर्थवाही संज्ञा ज्ञानदेव योजतात ‘समाज’ या चिरपरिचित संकल्पनेसाठी, तो समाज स्थिर राहावा, काही आचारविचारसूत्रांनी तो एकत्र बांधलेला असावा, विखरून तो सैरभैर बनू नये, विस्कळीतपणापायी समाजव्यवस्थेला दिशाहीनता येऊ नये याकरिता जे काही विधिनियम अस्तित्वात येतात अगर आणले जातात, त्यांना ‘धर्म’ असे संबोधले जावे यांमागील रहस्य काही असेल तर ते हेच. समाजमनाला काही एक वळण लावणे, ही काही सोपी गोष्ट नव्हे. ते कर्म मोठे कठीणच. त्यांसाठी अपार खस्ता खाव्या लागतात, कष्ट करावे लागतात. हे शिवधनुष्य जी व्यक्ती हिमतीने पेलते, तिला भागवत धर्म ‘संत’ असे संबोधतो. भागवत धर्माने सिद्ध केलेल्या संतत्वाच्या कसोटीस उतरण्यासाठी जे श्रमसायास करावे लागतात त्यांची केवळ एक झलक- ‘‘धर्म रक्षावयासाठीं। करणें आटी आम्हांसि।’’ या तुकोक्तीमध्ये प्रतिबिंबित झालेली दिसते. संत हे समाजशिक्षकाची भूमिका बजावत असतात, ही भागवत धर्माने प्रतिष्ठित केलेली धारणा याच सगळ्या विचारव्यूहाद्वारे परिणत झालेली आहे. समाजव्यवहारात परिवर्तन घडवून आणण्याची प्रक्रिया नेहमीच सामोपचाराने साध्य होणारी नसते. त्यासाठी प्रसंगी संघर्ष अपरिहार्यच बनतो. त्याला कारणही तसेच असते. लोकव्यवहारात अनेकदा अधर्मच बेमालूमपणे धर्माचे अवगुंठन घेऊन वावरत राहतो. अशा वेळी, तशा त्या धर्मबाह्य़ वर्तनाचा बीमोड करण्यासाठी संतप्रवृत्तीलाही कणखर व कठोर भूमिका घेणे अपरिहार्यच बनते. ‘‘धर्माचें पाळण। करणें पाषांड खंडण।’’ हे तुकोबारायांचे उद्गार म्हणजे त्याच चिरवास्तवाचा रोकडा दाखला. धर्म काय आणि अधर्म काय, याचा निरपवाद वस्तुपाठ समाजपुरुषाच्या पुढय़ात स्वत:च्या आचरणाद्वारे ठेवणे, हे वडीलधाऱ्या समाजमनस्क विवेकी व्यक्तीचे कर्तव्यच होय, अशी नि:संदिग्ध भूमिका ‘ज्ञानदेवी’च्या तिसऱ्या अध्यायात ज्ञानदेव घेतात, तिच्यामागील कार्यकारणभाव हा असा आहे. ‘‘एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेविती। तेंचि येर अनुष्ठिती सामान्य सकळ।’’ हे ज्ञानदेवांचे उद्गार या संदर्भात विलक्षण मननीय ठरतात. समाजपुरुषाच्या वृत्तीमध्ये बदल घडवून आणणे, हा या सगळ्याचा गाभा होय. ‘वृत्ति दंडून सिद्धी होणार नाहीं, झालीच तर वृत्तींस चांगलें वळण लावून त्यांचा क्षोभ कमी करून होणार आहे; हाच भागवतधर्माचा विशेष; हेंच भागवतधर्माचे खरें स्वरूप होय..’ – अशा शब्दांत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे भागवत धर्माची आत्मखूण विशद का करतात, त्याचा उलगडा यावरून व्हावा.

 

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh nature of religion concept of religion zws
First published on: 14-06-2021 at 00:04 IST