अभय टिळक agtilak@gmail.com

‘महाभारतातील हा प्रवृत्तिपर नारायणीय धर्म आणि भागवतपुराणांतील भागवत धर्म मूळांत एकच आहेत.. परंतु भागवत धर्मातील कर्मपर प्रवृत्ति-तत्त्वाचें समर्थन करणें हा भागवतपुराणाचा मुख्य उद्देश नाहीं. हें समर्थन महाभारतांत किंवा विशेषत: गीतेंतच केलेलें आहे.. गीतेंत अर्जुनास केलेला उपदेश भागवत धर्माचा असून, सदर धर्म प्रवृत्तिपर असल्यामुळें तो उपदेशहि महाभारतकार प्रवृत्तिपरच समजतात हें उघड होतें..’- १०१ वे स्मृतिवर्ष सुरू असणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे हे विवेचन. मंडालेतील कारावासात सिद्ध केलेल्या ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ या प्रबंधाच्या पहिल्याच प्रकरणातील लोकमान्यांचे हे विवेचन दोन अर्थानी मननीय ठरते. तत्कालीन आर्यावर्तातील बलशाली कुळाच्या समूळ नाशाची कहाणी शब्दबद्ध करणाऱ्या महाभारतासारख्या ग्रंथात श्रीमद्भगवद्गीतेचा समावेश होण्यामागील रहस्य लोकमान्य इथे प्रगट करतात. दुसरे म्हणजे, किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाला युद्धसन्मुख बनविणाऱ्या धर्मसिद्धान्ताचे अंतरंगही टिळकांनी उलगडून तिथे मांडलेले दिसते. निखळ प्रवृत्तिपरता हा महाभारतीय कथाभाग आणि गीताबोधाचा गाभा यांचे परस्पर साहचर्य प्रस्थापित करणारा घटक होय, हे वास्तव अधोरेखित करतात लोकमान्य. केवळ व्यक्तिगतच नव्हे, तर सार्वजनिक जीवनाची ऐहिक धारणा निकोपपणे घडून यावयाची असेल तर निरामय प्रवृत्तिपरतेची कास धरणे अगत्याचे ठरते, हा होय गीताधर्माचा गाभा. परतत्त्वाच्या स्वरूपाचे सम्यक आकलन झाल्यानंतर तशा अनुभूतीसंपन्न साधकाने भवतालातील प्रचलित लौकिक व्यवहाराशी कशा प्रकारचा संबंध ठेवायचा, हा या संदर्भातील सगळ्यात कळीचा मुद्दा. कर्मसंन्यासाची कास धरणारे निवृत्तिमार्गी स्मार्त उपासक त्या टप्प्यावर आग्रह धरतात नैष्कम्र्याचा. तर, ‘ज्ञानानें ज्ञानी पुरुष जर परमेश्वररूपी होतो, तर परमेश्वर जें काम करितो तें परमेश्वराप्रमाणें म्हणजे नि:संग-बुद्धीनें करण्याची आवश्यकता ज्ञानी पुरुषास तरी कशी सुटणार?,’ असा प्रश्न करत लोकमान्य पुरस्कार करतात भागवत धर्मप्रणीत प्रवृत्तिपर कर्मयोगाचा. जगरूपाने जगदीश्वरच नटलेला आहे, या भागवतधर्मीच्या मनीमानसी दृढ वसणाऱ्या धारणेचे अधिष्ठान लाभलेले असते त्या कर्मयोगप्रधान जीवनदृष्टीला. गीताबोधाचा नेमका हाच गाभा- ‘‘न कळे याची माव कैसा आहे भाव। सर्वाभूतीं देव गीता सांगें।’’ अशा शब्दांत व्यक्त करतात नामदेवराय. विश्वरूपाने विलसणाऱ्या परमतत्त्वाच्या विश्वात्मक रूपाची प्रचीती साधकाला पुरेपूर आणून देणे ही नामसाधनेची अंतिम व सर्वोच्च परिणती होय, हाच वेदान्ताचा व पर्यायाने वेदान्ताचे सार असणाऱ्या भगवद्गीतेचा सांगावा आहे, असे नि:संदिग्ध प्रतिपादन- ‘‘सार पैं सांगत उपनिषद तुम्हां। वाचे रामनामा जप करा।’’ अशा शब्दांत करतात नामदेवराय. कर्मसंन्यास आणि कर्मयोग यांची सुविहित सांगड घालणारे हुकमी साधन हे ठरते अनुपम्य वैशिष्टय़ नामजपाचे. अविरत वाहणाऱ्या नामौघात कर्त्यांचे पूर्णत: विसर्जन होण्यातून साकारतो कर्मसंन्यास. तर, कर्मरूपी फुलांनी अखंड पूजन होण्यातून कर्मशील साधकाला अविरत अनुसंधान राहते परमतत्त्वाचे. लोकसंपर्काचे वावडे उरत नाही भगवद्भक्ताला साहजिकच मग. लोकसंग्रह हा अशा साधकाचा स्थायिभाव बनतो. हाच तर गाभा गीताधर्माचा. नामदेवरायांचा उभा जीवनक्रम म्हणजे गीताबोधाच्या याच रहस्याचे प्रगट आणि मनोज्ञ दर्शन.