अभय टिळक agtilak@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘चरित्र-व्यक्तिमत्त्व-कर्तृत्व’ या तीनही बाबतींत तुकोबांचे वर्णन करावयाचे झाल्यास ‘अलौकिक’ हे एकच विशेषण डोळ्यांसमोर येते आणि सार्थही ठरते. गुरुपदेशाचा तुकोबांच्या जीवनातील प्रसंगही याच कोटीत जमा होणारा. मुळात, तुकोबांची आणि गुरुतत्त्वाची भेट घडून आली ती स्वप्नात. अनुग्रह प्राप्त झाला तो रस्त्यात आणि दीक्षाविधी पार पडला कोणतेही सोपस्कार न होताच. सगळेच अ-साधारण. स्नानासाठी नदीवर निघालेल्या तुकोबारायांची रस्त्यातच गाठ पडली बाबाजी चैतन्यांशी. अनुग्रहासाठी परिपक्व असलेली तुकोबांची अंत:करणस्थिती पुरेपूर जाणून बाबाजींनी त्यांना तिथेच गुरुमंत्र देऊन कृपांकित केले. ‘बाबाजी आपलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि’ अशा शब्दांत वर्णन करतात तुकोबाराय तो सारा मंत्रदीक्षाविधी. वारकरी संप्रदायाचा महामंत्रही तोच. हा सगळा घटनाक्रम ‘असाधारण’ म्हणावा असाच. ‘मंत्र’ या संज्ञा-संकल्पनेशी निगडित गुह्य़तेच्या पारंपरिक संकेताशी पूर्णपणे विसंगत ठरणारा. ‘गुह्य़भाषण’ हा अर्थ ध्वनित करणाऱ्या मूळ धातूपासून ‘मंत्र’ या संज्ञेची निर्मिती. मात्र, परंपरेतील दोन समाजाभिमुख लोकोत्तरांनी फेडली गौप्यतेची ती बुंथी. गहिनीनाथ हे त्यांतील पहिले तर, बाबाजी चैतन्य हे दुसरे. आदिगुरू शंकरांपासून चालत आलेला गुरुबोधाचा विस्तार यच्चयावत जीवमात्रांसाठी खुला करण्याचा आदेश गहिनीनाथांनी दिला निवृत्तिनाथांना. तर, मंत्रदीक्षेशी संलग्न गुह्य़तेचा काच पुरता अप्रस्तुत ठरवला बाबाजी चैतन्यांनी. भागवत धर्माचा गाभा असणाऱ्या लोकतत्त्वाशी सुसंगत आणि सुसंवादी असेच हे दोन आदर्श. अंत:करणे निर्मळ बनवत पर्यायाने उभा लोकव्यवहार निकोप बनविण्याचे साधन म्हणून ज्या नाममंत्राचे उपयोजन भागवत धर्म करतो तो नाममंत्र समूहाला पेलेल, पचेल आणि रुचेल असाच असला पाहिजे, हे ओघानेच येते. त्याची दीक्षा एकांतामध्ये नव्हे तर लोकांतामध्येच देता-घेता यायला हवी. असा लोकमंत्र हा त्यामुळे खुलाच असला पाहिजे. ‘उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास’ अशा शब्दांत या लोकमंत्राचे मुक्तपण आणि परिणामकारकता स्पष्ट करत त्याच्या अंगीकाराचे आवाहन करतात तुकोबाराय. लोकमुखाने उच्चारता येण्याजोगा मंत्र हा उघडा हवा, परिणामकारक तर हवाच हवा परंतु त्याच वेळी तो अवघा मंत्रव्यवहार सुटसुटीत आणि आदिअंती सुलभही हवा. मंत्राच्या आवृत्तीचे अथवा उच्चारणाचे कडक संकेत,नियम यांची कुंपणे बळजोर असतील तर जनसमूहाने त्याला भिडावे तरी कसे? ‘आवडीचा मंत्र सांगतिला सोपा । जेणें नव्हे गुंपा कांहीं कोठें’ असे प्रतिपादन करत ही साशंकताही पुरती निवारण करतात तुकोबा. ‘गुंपा’ अथवा ‘गुंफा’ म्हणजे ‘गुंतागुंत’. मंत्रसाधनेदरम्यान मंत्राक्षरांचे उच्चारण सदोष घडले तर अनिष्ट फळ पदरात पडण्याची धास्ती वाटणाऱ्यांना, ‘तुका म्हणे जपा । मंत्र तीअक्षरी सोपा’ असा पुकारा करत समाजपुरुषाला तुकोबाराय दीक्षा देतात विठ्ठलनामाची. सोपा असणारा हा उघडा विठ्ठलमंत्र जसा मुक्तिदायक तसाच अनंत जन्मांचे दोषहरण करणाराही आहे, याची खूण ‘उघडा हा मंत्र विठ्ठल वदा वाचे । अनंता जन्मांचे दोष जातीं’ अशा शब्दांत नाथराय आपल्याला पटवितात. आराध्य दैवत आपलेसे करून घेण्यासाठी ज्या नाममंत्राचा घोष अहर्निश करावयाचा ते दैवतही साधनमंत्रासारखेच खुले, उघडे असावे अशी अपेक्षा अनाठायी ठरेल काय ?

 

मराठीतील सर्व अद्वयबोध बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta advayabodh spirituality zws
First published on: 22-06-2021 at 00:08 IST