scorecardresearch

शिवदर्शनाचा सोहळा…

शिव आणि शक्ती, पाणी आणि पाण्याची लाट, सोने आणि सोन्याचे अलंकार, बीज आणि त्याचेच महद्रूप असलेला वृक्ष…

शिवदर्शनाचा सोहळा…
(संग्रहित छायाचित्र)

शिव आणि शक्ती, पाणी आणि पाण्याची लाट, सोने आणि सोन्याचे अलंकार, बीज आणि त्याचेच महद्रूप असलेला वृक्ष… यांच्याप्रमाणेच मन आणि बुद्धी हेदेखील अद्वयाचेच एक दर्शन होय. पदार्थ एकच, मात्र अवस्थांतरानुसार त्याला भिन्न भिन्न अभिधाने प्रदान होतात, इतकेच काय ते. एकच अस्तित्व ज्या वेळी दोलायमान स्थितीमध्ये असते, तेव्हा त्याच्या त्या अवस्थेला नाव दिले जाते – ‘मन’! तर तेच अस्तित्व ज्या वेळी निश्चयात्मक बिंदूवर स्थिर होते, तेव्हा त्या स्थितीलाच संबोधन लाभते- ‘बुद्धी’! या दोहोंमध्ये नांदणारे अद्वयाचे हे नाते अचूकपणे हेरणे यालाच ज्ञानदेव शब्द योजतात- ‘योगसार’! ‘‘अर्जुना समत्व चित्ताचें। तेंचि सार जाण योगाचें। जेथ मन आणि बुद्धीचें। ऐक्य आथी।’’ ही ‘ज्ञानेश्वरी’च्या दुसऱ्या अध्यायातील ओवी म्हणूनच मोठी मननीय शाबीत होते. भावनामयता हा मनाचा गुण, तर तर्कनिष्ठता हा बुद्धीचा स्थायिभाव. आपला सगळा ऐहिक लोकव्यवहार भावना आणि तर्क यांच्या संतुलनाद्वारे साकारावा, हाच सांगावा ज्ञानदेव ‘योगसार’ या मार्मिक शब्दसंहतीद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवतात. परमार्थ अथवा अध्यात्म हा मनाचा प्रांत होय, तिथे तर्काला अथवा बुद्धीला खेळण्यास फार वाव देऊ नये… अशांसारख्या आपल्या धारणा, ज्ञानदेवांचे हे प्रतिपादन बघितल्यानंतर, अंमळ तपासून घेणे भाग पडते. किंबहुना, बुद्धिपुरस्सर साधना करणारे उपासक सर्वकाळ आणि सर्वत्र दुर्मीळच असतात, असे आपले रोकडे निरीक्षण- ‘‘हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ। वाचेसि सुलभ रामकृष्ण।’’ अशा नितांत अर्थगर्भ भाषेत ज्ञानदेव ‘हरिपाठा’मध्ये नमूद करतात. जप आपल्यापैकी अनेक जण करत असतात. परंतु मुखाने होणारा जप हरिरूप झालेल्या बुद्धीमधून प्रसवला आहे किंवा नाही, हे तपासून बघणारे मूठभरच सापडतात, हा ज्ञानदेवांच्या कथनाचा इत्यर्थ. ज्या जगामध्ये आपण जगतो आहोत ते जग म्हणजे एकाच तत्त्वाचे बहुविध प्रगटीकरण होय, या जाणिवेतून व्यवहार करणारी बुद्धी म्हणजे ‘हरि बुद्धी’. एकच एक तत्त्व सर्वत्र समान व्यापलेले असल्याने त्या तत्त्वाच्या अस्तित्वाची अनुभूती लाभलेली बुद्धीही तशीच समतेने वर्तत राहते, हेच तुकोबांचेही अनुभवसिद्ध कथन होय. ‘‘मनाचे संकल्प पाववेल सिद्धी। जरी राहे बुद्धी याचे ठायीं।’’ अशा शब्दांत तुकोबाराय ते रहस्य विदित करतात. इथे महाराज निर्देश करतात तो विटेवर उभ्या ठाकलेल्या समचरण पांडुरंगाकडे. विठ्ठलाच्या समचरणांशी स्थिर झालेली बुद्धी समत्वाने मंडित होईल अथवा मंडित व्हावी, हेच तुकोबांना अभिप्रेत आहे. बुद्धिपुरस्सर केलेल्या प्रयत्नांमुळेच मनाचे संकल्प पूर्ततेस जाऊ शकतात, हा व्यावहारिक अनुभव असल्यामुळेच, बुद्धीप्रमाणेच मनही समतेने अलंकृत व्हावे यासाठी- ‘‘समचरणदृष्टि विटेवरी साजिरी। तेथें माझी हरि वृत्ति राहो।’’ हेच मागणे तुकोबाराय पंढरीशाकडे मागतात. विचारांचा अविरत वाहणारा प्रवाह म्हणजे ‘मन’. समत्वाचा गुण लाभलेली विचारशक्ती आणि समतेशी स्थिरावलेली बुद्धी एकदा का हस्तगत झाली की उभे जग म्हणजे शिवदर्शनाचा सोहळाच बनते. ‘‘एºहवीं आडोळलिया डोळा। शिवदर्शनाचा सोहळा। भोगिजे भलते वेळां। भलतेणें।’’ हे ज्ञानदेवांचे ‘अमृतानुभवा’मधील कथन म्हणजे मन आणि बुद्धीच्या अद्वयाचेच शब्दरूप जणू!

agtilak@gmail.com

मराठीतील सर्व अद्वयबोध ( Advayabodh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta shivdarshan ceremony advayabodh article abn

Next Story
भांडवल