– अभय टिळक

शब्द हे अर्थाचे वाहक होत. साहजिकच, ज्ञानप्राप्तीचे साधन शब्दच ठरतात. विद्यार्थीदशेमध्ये शब्दब्रह्माची उपासना करायची ती त्यासाठीच. परंपरेमध्ये म्हणूनच ब्रह्मचर्या श्रमामध्ये शब्दाध्यायन महत्त्वाचे मानलेले आहे अथवा असावे. ‘‘ब्रह्मचारी धर्म घोकावें अक्षर’’ हा तुकोबांचा दाखला त्याच जीवनक्रमाचे सूचन घडवतो. ‘घोकावें अक्षर’ या शब्दसंहतीचा निखळ पारंपरिक अर्थ ‘वेदपठण’ असा होतो. परंतु व्यापक पातळीवर अक्षरब्रह्माची उपासना हा या शब्दकळेचा इत्यर्थ. इथे एक चकवा आहे. केवळ घोकंपट्टी केल्यामुळे ज्ञान सहजच होते, असे मात्र मुळीच नाही. ‘‘घोडें काय थोडें वागवितें ओझें। भावेंविण तैसें पाठांतर।।’’ अशा विलक्षण अर्थगर्भ शब्दांत तुकोबा निर्देश करतात, नेमक्या त्याच चकव्याकडे. ‘भाव’ या शब्दाला अक्षरश: अनंत छटा आहेत. ‘अर्थ’ ही त्यातीलच एक. पाठ करून असलेल्या शब्दांचा अर्थच कळत नसेल, तर असे निरर्थ पाठांतर आणि पाठीवर ओझे वाहणाऱ्या घोड्याचे कष्ट यांचे व्यवहारात: मूल्य एकच, असे अंजन तुकोबा आपल्या डोळ्यांत घालतात. त्यामुळे अर्थासह शब्दाचे आकलन व्यवस्थित होणे ही ज्ञानव्यवहारातील पहिली पायरी ठरते. अर्थात, हेही पुन्हा सोपे नाही. कारण मोजक्या दिसणाऱ्या शब्दामध्ये अपार अर्थवत्ता ठासून भरलेली असते. ‘‘जैसें बिंब तरी बचकें एवढें। परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें। शब्दाची व्याप्ती तेणें पाडें। अनुभवावी।।’’ अशा मार्मिक प्रकारे ज्ञानदेव शब्दांचे सामर्थ्य स्पष्ट करतात. आकार, रंग, अवयव, रूप असे काहीच न लाभलेल्या शब्दाला ‘अमृतानुभव’मध्ये ज्ञानदेव उपमा देतात आकाश-पुण्याची. ‘‘आपण तंव खपुष्प। परि फळ ते जगद्रूप। शब्द मवीतैं उमप। कोण आहे?।।’’ असा प्रश्न ज्ञानदेव तिथे विचारतात. रंग- आकारहीन असणारा, परंतु अखिल जगाचे रूप-स्वरूप उलगडून सांगणारा शब्द असा आणि इतका व्यापक व सामर्थ्यवान आहे, की त्याच्या शक्तीचे मोजमाप करणे कोणाला तरी शक्य आहे का, हा आहे ज्ञानदेवांचा सवाल. शब्दसामर्थ्याचे मोजमाप जरी अशक्यप्राय असले तरी शब्दाच्या अंतरंगात शिरकाव करून घेण्याची युक्ती हस्तगत झाली, तर ज्ञानाच्या महालांची कवाडे सताड उघडी होतात, हे ठाऊक असलेले ज्ञानदेव त्यासाठी आवश्यक असलेली गुरुकिल्लीही आपल्या हाती सुपूर्द करतात. ‘‘तैसें शब्दाचें व्यापकपण। देखिजे असाधारण। पाहातयां भावाज्ञां फावती गुण। चिंतामणीचें।।’’- ही ती गुरुकिल्ली! आपण वाचत अथवा अभ्यासत असलेल्या शब्दांचे अचूक ज्ञान होण्याची गुप्तकळच जणू ज्ञानदेव जगापुढे उघड मांडत आहेत. शब्दाचे जे मूळ रूप आहे, त्याचा जो मूळ धातू आहे, त्याचे नेमके आणि यथार्थ ज्ञान झाले, की त्या शब्दाच्या पोटामध्ये एकवटलेली सारी अर्थवत्ता बुद्धीमध्ये मोहरून प्रगटते. हा ‘पाहातयां भावाज्ञां’ या ज्ञानदेवांच्या शब्दसंहतीचा सम्यक अर्थ! धात्वर्थासह शब्दाचे अंतरंग आकळले, की ज्ञानाचा प्रकाश अंत:करणात फाकून हाती जणू चिंतामणी रत्न लागल्याचा आनंद अभ्यासकाला होतो, असा ज्ञानदेवांचा निर्वाळा आहे. मक्याच्या कणसाची साल फेडल्याखेरीज आतील दाण्यांचे दर्शन होत नसते, तशीच ही शब्दार्थाला भिडण्याची प्रक्रिया. लौकिक काय अथवा पारलौकिक काय, ज्ञानसंपादनाच्या प्रांतात शब्दांचे आणि पर्यायाने भाषेचे पायाशुद्ध ज्ञान अनिवार्य ठरते ते यापायीच. ‘बाप उपेगी वस्तु शब्दु’ असे ‘अमृतानुभव’च्या सहाव्या प्रकरणाच्या प्रारंभीच ज्ञानदेव जे म्हणतात, त्याचे रहस्य हेच नाही का!

in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १२ महिन्यानंतर गुरू राशीमध्ये प्रवेश करणार सूर्यदेव, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

agtilak@gmail.com